अशाच माविमच्या माध्यमातून लावलेल्या रोपट्यांची लागवड म्हणजे मायावती स्वंयसहाय बचतगट! नागपूर जिल्ह्यातील ४५ कि.मी. अंतरावर असलेला कुही तालुका. तालुक्यापासून १५ कि.मी. अंतरावर असलेले मुसळगाव हे छोटेसे गाव! मुसळगाव ग्रामपंचायतीमध्ये ९७६ लोकसंख्या असून महिला आर्थिक विकास महामंडळद्वारे मुसळगाव या गावात ४ गटांची स्थापना झालेली आहे. या गावातील स्वंयसहाय बचतगटाची केवळ बचत करणे एवढाच हेतू समोर न ठेवता गावविकास समितीया माध्यमातून सामाजिक कार्यक्रम तसेच ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेला सतत महिलांचा सहभाग असतो.
प्रथमत: सदर गावातील महिला या अतिशय अशिक्षित, घराबाहेर न पडलेल्या, गावामध्ये दुर्लक्षित म्हणून या महिलांना गावात मान नव्हता,आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची, दुसऱ्यांच्या शेतीवर जाऊन मोलमजुरी करणे एवढेच काम. त्यामुळे सदर महिलांना गावात मानपान नव्हताच. मोलमजुरीमुळे आर्थिक परिस्थिती काय ती जेमतेम होती. त्यातच शिक्षणाचा गंध नसल्यामुळे मुलांच्या अभ्यासावर देखील लक्ष देण्यास वेळ नव्हता. परंतू महिला बचत गट स्थापन झाल्यापासून गावामध्ये या महिलांना ग्रामसभेची नियमित नोटीस पोहचते, तर गावामध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात महिलांचे सहकार्य आवर्जुन घेतले जाते.
मायावती स्वंयसहाय बचत गट! या गटाची स्थापना १९ फेब्रुवारी २००७ रोजी झालेली असून एकूण १२ मागासवर्गीय महिला सदस्यांचा समावेश आहे. या गटाची प्रगती स्थापना झाल्यापासूनच निरंतर सुरु आहे. मायावती स्वंयसहाय बचत गटाला बँकेकडून प्रथम कर्ज रु. २५,०००/- प्राप्त झाले. त्याचा विनियोग त्यांनी सावकाराचे कर्ज फेडणे, मुलांच्या शिक्षणाकरीता, शेतीव्यवसायामध्ये गुंतवणुकीकरीता व आजाराकरीता वापर करुन त्याची बँकेला नियमित परतफेड देखील करण्यात आली. त्यानंतर गटाचे बँकेने द्वितीय ग्रेडेशन करुन त्यांना व्यवसायाकरीता बँकेद्वारे कर्ज रु. १६००००/- मिळालेले असून या कर्जाचा वापर आपण कसा करायचा? हा प्रश्न पडला. अशातच मायावती स्वंयसहाय बचत गटातील सदस्य सौ. कल्पनाताई मेश्राम या लोकसंचालित साधन केंद्र कुही च्या कार्यकारणी सदस्य असून त्यांच्या मनात आपल्या लोकसंचालित साधन केंद्रातून विविध प्रकारच्या प्रशिक्षणापासून व आपल्याला शेतीवर व बिगरशेतीवर आधारित उद्योगांची माहिती मिळाली.
आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार आपण कृषीवर आधारित उद्योग करायला पाहिजे असू गटातील इतर महिलांना मार्गदर्शन केले. स्वंयसहाय बचत गटातील महिलांना वाटले की आपला दैनंदिन व्यवसाय हा शेतीवरच असून आपण शेतीचा व्यवसाय केला पाहिजे! असे महिलांना वाटु लागले. मासिक सभेत सामुहीक शेतीचा विषय ठेवण्यात आला. आपल्या गटाला मिळालेली बँक कर्ज रक्कम सामुहिक शेतीत गुंतवणूक करावी असे सर्व महिलांनी ठरविले. मे २०१० रोजी सामुहिक शेती करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु सामुहिक शेती करतांना गटातील महिलांना भाडेतत्वावर शेतीसाठी अनेक अडचणी आल्या तसेच काही कौटुंबिक अडचणी आल्या. यामध्ये मुख्यत्वे गावातील अन्य गावकरी भाडेतत्वावर शेती करुन देण्यास इच्छुक नव्हते. तसेच या महिलांना शेतीमधील माहिती अपूरी आहे असा गावकऱ्यांचा समज होता. त्यामुळे महिलांना स्वतंत्रपणे शेती व्यवसाय करु देण्यास अडचण येत होती. परंतु या अडचणीवर मात करुन सदर मायावती गटाने एकूण १० एकर जमीन भाडेतत्वावर घेण्याची ठरविले. पाच एकर जमीन ओलिताखाली व पाच एकर जमीन कोरडवाहू पद्धतीने करुन सदर महिलांनी पुरुषासमोर एक आदर्श ठेवला की स्त्रीचे अस्तित्व चुल आणि मुल नाही.
मायावती स्वंयसहाय बचत गटातील महिलांनी खरीप हंगामात सोयाबीन व तूर पिकाची लागवड केलेली असून सध्यास्थितीत या गटाला ५० क्विंटल सोयाबीनचे उत्पादन झाले व एक लाख रुपये उत्पन्न मिळाले. तसेच सध्या स्थितीत या गटाने रब्बी, हरभरा, गहू पिकाची लागवड केली असून बँकेचे कर्जाचे ३० हजार रुपये परतफेड केले आहे.
शेती व्यवसायामुळे मायावती स्वंयसहाय बचत गटातील सर्व महिला आनंदी असून आपण धाडसाने केलेल्या कामाचे यश मिळालेले आहे. तसेच त्यांच्या कौटुंबियांना आनंद झाला असून गटातील सर्व महिलांना कुठल्याही कार्यात सहभाग मिळत आहे.
चिकाटी, सातत्य, जिद्द आणि आवड या चार गुणांचा अवलंब करुन इच्छा तिथे मार्ग ही म्हण मायावती स्वंयसहाय बचत गटातील महिलांनी साकार केलेली आहे. ही बाब निश्चितच इतर स्वंयसहाय बचत गटांना प्रेरणादायी ठरेल.
No comments:
Post a Comment