Saturday, September 17, 2011

'ऊर्जा'दायी उपक्रम

विजेच्या वाढत्या मागणीमुळे शासकीय कार्यालयांना भारनियमनाला सामोरे जावे लागते. नागरिकांना योग्यवेळी सुविधा पुरविण्याच्यादृष्टीने शासकीय कार्यालये आणि विशेषत: रुग्णालयात विजेची उपलब्धता असणे गरजेचे असते. अपारंपरिक ऊर्जेचा उपयोग केल्यास कार्यालयातील कामे विजेअभावी खोळंबणार नाहीत. हे लक्षात घेऊनच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन सौर तसेच पवन ऊर्जेचा वापर विविध कार्यालये आणि रुग्णालयात सुरू केला आहे.

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत नावीन्यपूर्ण योजनेतून विविध सौर प्रकल्पासाठी निधीची तरतूद करण्यात आली. प्राप्त निधीतून जिल्हाधिकारी कार्यालयात ४० लाख रुपये खर्चाचे सौरऊर्जा युनिट बसविण्यात आले आहे. एकूण ८ किलोवॅट क्षमतेच्या या सौरऊर्जा युनिटसाठी प्रत्येकी १२५ वॅटचे ६४ पॅनल बसविण्यात आले आहेत. वीज संचय करण्यासाठी प्रत्येकी ४ बॅटरीचे १४ पॉवरपॅक बसविण्यात आले आहेत.

सौरऊर्जा पॅनलचे वय कमीत कमी २० वर्षे असल्याने या कालावधीत चांगल्याप्रकारे वीज उपलब्ध होऊ शकेल. विशेषत: पावसाळ्यानंतर अधिक परिणामकारक पद्धतीने वीज पुरवठा होऊ शकेल. जिल्हाधिकारी कार्यालयात तूर्तास ६० कनेक्शन देण्यात आली असून त्यात टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येणार आहे. सूर्यप्रकाश पुरेसा असल्यास साधारण आठ तास बॅकअप मिळणार आहे. सौरऊर्जेशिवाय पवनऊर्जेचे प्रत्येकी ३.२ किलोवॅट क्षमतेचे दोन युनिट उभारण्यात आले आहेत. अशाप्रकारे अपारंपरिक स्त्रोतापासून एकूण १४.४ किलोवॅट वीज उपलब्ध होणार आहे.

याशिवाय सामाजिक न्याय भवन आणि मुलांचे शासकीय वसतीगृह येथे १० लाख ६२ हजार रुपये खर्चाचे एक किलोवॅटचे चार संच बसविण्यात आले आहेत. सौरऊर्जेचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी विविध ठिकाणी सौर पथदीप आणि वॉटर हिटर सिस्टीमदेखील क्रियान्वित करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दहा, सामाजिक न्याय भवन, विभागीय मनोरुग्णालय आणि आयटीआय मुलांचे वसतीगृह येथे प्रत्येकी दोन तसेच शासकीय तंत्रनिकेतन मुलांचे/मुलींचे वसतीगृह येथे सहा वॉटर हिटर बसविण्यात आले आहेत.

सौरऊर्जेचा वापर पथदिव्यासाठीदेखील करण्यात येत आहे. सौरऊर्जेवर चालणारे ८३ पथदिवे जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध कार्यालयाच्या आवारात लावण्यात आले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने रात्रीच्या वेळी कार्यालयाचा परिसर प्रकाशित ठेवण्याचा चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. सौर पथदिव्यांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून ३२ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय आणि सामाजिक न्याय भवन येथील वीजेची मोठ्या प्रमाणात बचत या अपारंपरिक ऊर्जेच्या उपयोगामुळे होत आहे. शासकीय कार्यालयाच्या वीज बिलातही बचत होत आहे. शासकीय रुग्णालयातील रुग्ण आणि वसतीगृहातील विद्यार्थी यांना गरम पाण्याची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. सौर पथदिव्यामुळे भारनियमनाच्या अथवा विद्युत वाहिनीत बिघाड झाल्याच्या स्थितीत रुग्णालय/वसतीगृह परिसरातील पथदिवे अखंडितपणे सुरू राहतील, त्यामुळे विद्यार्थी आणि रुग्णांची गैरसोय या सुविधांमुळे टाळता येणार आहे. महत्त्वाच्या टेबल वरील संगणक संचांना अखंड वीज पुरवठा झाल्याने कामात येणारा व्यत्यय कमी झाला असून त्यामुळे शासकीय कामकाजाची गती वाढण्यास स्वाभाविकपणे मदत होत आहे.

जिल्हा प्रशासनाने शासनाच्या धोरणांना अनुसरून अपारंपरिक ऊर्जेच्या वापरात पुढाकार घेतल्याने या संदर्भातील जनजागृतीसाठी त्याचा उपयोग होणार आहे. या उपक्रमाची उपयुक्तता लक्षात घेता अपारंपरिक ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांसाठी जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम निश्चितपणे 'ऊर्जा'दायी ठरेल.

No comments:

Post a Comment