रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात बचत गट चळवळीने चांगला वेग घेतला आहे. महिला तसेच पुरुषांनीदेखील बचत गटाच्या माध्यामातून अनेकविध व्यवसाय सुरू केले आहेत. देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या मार्गदर्शनातून या चळवळीत सहभागी महिलांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची प्रक्रीयादेखील तेवढ्याच वेगाने पुढे जात आहे. साडवली गावातील तुळजाभवानी बचत गटाने केलेली प्रगती त्याचेच उदाहरण आहे.
देवरुखपासून दोन किलोमीटर अंतरावर साडवली गावात रस्त्याच्या कडेला तुळजाभवानी बचत गटाचा मोठा फलक दिसतो. या भागात कुणीही या बचत गटाचा पत्ता सहज सांगू शकतो. परिसरात असलेल्या प्रत्येक घरात बचत गटातील सदस्य आहेत. मुख्य रस्त्याच्या डावीकडे आत शिरताच समोरच शेळ्यांचा वाडा दिसतो. एखादी महिला वाड्यातील स्वच्छतेचे काम करीत असते. बचत गटाविषयी बोलताच एका मुलाने पलिकडे जाऊन तरुण महिलेला सोबत आणले. बचत गटाची माहिती घेण्यासाठी कुणीतरी आले आहे हे कळल्यावर या महिलेने उत्साहाने चर्चा सुरू केली.
बचत गटाची स्थापना २००६ मध्ये झाली. तत्पूर्वी गटाच्या सदस्य असलेल्या महिला चिरेखाणीवर मजूरी करण्यास दूरवर जायच्या. बऱ्याचदा काम मिळतही नव्हते. दिवसभर कष्ट केल्यावर ४० रूपये मजूरी मिळत असे. अशातच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका संगीता त्रिभुवने यांनी या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटीत होण्याचा सल्ला दिला. महिलांनादेखील रोजच्या विवंचनेतून सुटका करण्यासाठी नवा मार्ग हवा होता. या महिलांनी ग्रामपंचायतीतून माहिती घेतली. अशातच मातृमंदीर संस्थेने मदतीचा हात दिला. बचत गट सुरू करताना २५ हजार रुपये बिनव्याजी दिले. त्यावर या महिलांनी गटाचा व्यवहार सुरू केला. परिसरातील माळरानावर मुबलक चारा मिळत असल्याने शेळीपालनाच्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली.
बचतगटाची पहिली पतवारी झाल्यावर गटाला ३५ हजाराचे कर्ज मिळाले. त्यातून महिलांनी मातृमंदीर संस्थेची काही रक्कम परत केली आणि प्रत्येकी एक शेळी खरेदी केली. गटाचा व्यवहार चांगला असल्याने आणि कर्जाची नियमित परतफेड होत असल्याने दुसरी पतवारी होवून गटाला २.५ लाख रुपये कर्ज मिळाले. त्यातून महिलांनी प्रत्येकी दोन शेळ्या खरेदी केल्या. शेळ्यांची चांगली देखभाल केल्यामुळे शेळ्यांची संख्या वाढत गेली. दरवर्षी प्रत्येक महिलेला घराचे काम संाभाळून १५ ते २० हजार रुपये मिळू लागले. त्यांच्या राहणीमानात बदल झाला.
बचत गटामुळे मिळालेल्या अनुभवातून या महिला ग्रामसभेला उपस्थित राहून विकासविषयक चर्चेत सहभागी होऊ लागल्या आहेत. गटाच्या सदस्या जयश्री साठे यांच्या तोंडून 'गटामुळे स्टेज डेअरींग वाढले आहे' असं ऐकल्यावर खरोखर कौतुक वाटलं. निरक्षर असल्या तरी या महिला समाजातील विविध विषयांवर आता बोलू लागल्या आहेत. शासनाच्या शेळीपालन योजने अंतर्गतदेखील या गटाने प्रस्ताव दाखल केला आहे. त्यातून काहींनी आशा सेविका पदासाठी प्रशिक्षण घेऊन आरोग्यविषयक कामांना सुरुवात केली आहे. मिळालेल्या आत्मविश्वासाबरोबरच 'स्वावलंबनाच्या मार्गावरून' असेच पुढे जात मोठा व्यवसाय करण्याचे स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर उभे आहे. ते स्वप्न पूर्ण होणे हे पुढच्या प्रयत्नावर अवलंबून असले तरी त्यांनी चार वर्षात केलेली प्रगती पाहता पुढील काळात बचत गटाच्या माध्यमातून या महिला अधिक सक्षम होतील हे मात्र नक्की.
No comments:
Post a Comment