Thursday, September 29, 2011

गृहोद्योगातून भरभराट

इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात ही उक्ती अतिशय सार्थ आहे. याचा प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील केळझर इथल्या सावली स्वयंसहायता महिला बचत गटाच्या कामात येते. सेलू तालुक्यातील केळझर हे गाव इथल्या पांडवकालीन मंदिरांसाठी प्रसिध्द आहे. या गावात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातल्या १२ जणींनी एकत्र येवून ऑगस्ट २००७ मध्ये आपल्या एकीने यशाचा नवा अध्याय लिहिला.

घरात लागणा-या शेवया-पापड्या, सरगुंडे आदींचे उत्पादन करणारा हा गट जिल्ह्यात प्रसिध्द आहे. तो त्यांच्या नाविन्यपूर्ण मार्केटींगसाठी जिल्ह्यात इतर बचतगट अशी उत्पादने विकत आहेत. मात्र सावली स्वयंसहायता गटाच्या महिला वैशिष्टपूर्ण पध्दतीने, आकर्षकपणाने स्टॉल सजवणे, गाडी लावली तर ती गाडी लक्षवेधी ठरेल अशी मांडणे अशा पध्दतीने विक्री करतात.

बँकेचे ३५ हजारांचे कर्ज घेऊन त्याची पूर्ण फेड केलेल्या या गटाकडे ३५ हजारांचे खेळते भांडवल आज आहे. आपल्याला स्थैर्य आलं म्हणजे संपले असे न करता या गटातील महिलांनी गावात इतर महिलांना प्रेरित करुन इतर गटांच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला आहे.

सेलू पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निमजे यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मदतीने त्यांनी आपल्या आयुष्यातून गरिबीचा अंधार कायमचा दूर केला आहे. त्यांचे हे कार्य इतरांनाही प्रेरक ठरले आहे.


  • प्रशांत दैठणकर

  • No comments:

    Post a Comment