Friday, September 30, 2011

ग्रामस्थ दिनात लाखभर प्रश्नांची सोडवणूक

जनतेला आपले प्रश्न गावातच चुटकीसारखे सुटावेत असं मनापासून वाटत असतं. जनतेची ही भावना लक्षात घेऊन शासनाने राज्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख आणि गतीमान करण्याचा प्रयत्न चालविला आहे. लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणारे प्रश्न-समस्यांची गावपातळीवरच सोडवणूक व्हावी, यासाठी शासनाने समाधान योजना राबविली. सातारा जिल्हा तर समाधान योजनेसाठी राज्याला मार्गदर्शक ठरतो आहे. जिल्ह्यातील एकट्या सातारा उपविभागात समाधान योजनेचा एक भाग म्हणून ग्रामस्थ दिनाद्वारे एक लाखाहून अधिक प्रश्नांची सोडवणूक करुन राज्यात एक वेगळा लौकिक निर्माण केला आहे.

सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच शेतमजुरांचा दैनंदिन कामकाज तसेच विविध प्रश्नांच्या संदर्भात महसूल विभागाशी या ना त्या कारणांनी संबंध येतो. त्यांना त्यांच्या रास्त आणि दैनंदिन समस्यांच्या सोडवणुकीसाठी तलाठी, सर्कल, तहसिलदार, जिल्हाधिकारी तसेच शासनापर्यंत जाण्याचा प्रसंगही उद्भवतो. जनतेचा हा त्रास कमी करण्याच्या उद्देशाने राज्यात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाच्या माध्यमातून समाधान योजना गतिमान केली आहे. या अभियानाच्या माध्यमातून लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून कार्यप्रणाली राबविण्यात येत आहे.

यामध्ये प्रामुख्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेतच दाखले देण्याच्या उपक्रमाचा समावेश आहे. तसेच जनतेला लागणारे विविध प्रकारचे दाखले आणि प्रमाणपत्रेही सेवा केंद्राच्या माध्यमातून त्या-त्या सर्कलपातळीवर देणे, गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमित व बंद झालेले पानंद व शेत रस्ते मोकळे करणे, एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यासाठी मंडल मुख्यालयाच्या ठिकाणी फेरफार अदालत घेणे, लोकशाही प्रणालीचा अवलंब करणे, नागरिकांना एका छताखाली सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यासाठी समाधान योजना राबविणे, ई-चावडी, महसूल व अपील प्रकरणे निकाली काढणे, शासकीय कामात संगणकीय अवलंब करणे, नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक तालुक्यात सुविधाकक्ष व बायोमॅट्रिक प्रणालीचा अवलंब करणे या गोष्टींना प्राधान्य देण्यात आले आहे.

सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न गावातच मार्गी लावून लोकाभिमुख व गतिमान प्रशासन करण्यास सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी. एन यांनी प्राधान्य दिले असून समाधान योजने अंतर्गत ग्रामस्थ दिनाच्या आयोजनांचा अभिनव उपक्रम राबविला आहे. सुवर्ण जयंती राजस्व अभियानाचा एक भाग म्हणून नागरिकांना एका छताखाली सर्व सुविधा उपब्ध करुन देण्याच्या उद्देशाने महसूल मंडळाच्या गावी ग्रामस्थदिनाचे आयेाजन करुन जनतेचे सर्व प्रश्न ऐकून घेऊन ते मार्गी लावण्याचा उपक्रम जिल्ह्यात गतीने राबविला जात आहे. जिल्ह्यातील सातारा महसूल उपविभागात येणाऱ्या सातारा, जावली आणि कोरेगाव या तालुक्यांत ग्रामस्थदिनाचा उपक्रम गतीने राबविण्यास उपविभागीय अधिकारी रामदास जगताप यांनी सुरुवात केली आहे.

नागरिकांना एका छत्राखाली सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी समाधान योजना लागू करण्यात आलेली असून या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वप्रथम तालुक्यातील सर्व मंडळाधिकारी व तलाठी यांची संयुक्त बैठक घेऊन या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक मंडळ स्तरावर ग्रामस्थ दिन आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेमध्ये सर्व ग्रामस्थ दिनामध्ये एकसुत्रता यावी म्हणून या महसूल उपविभागामध्ये विषयनिहाय कामांचे नियोजन करण्यात आले आहे.

गाव व मंडळ पातळीवरील सर्व प्रकारचे लागणारे दाखले ( रहिवासी, जात, उत्पन्न, डोमासाईल, शेतकरी ), ज्येष्ठ नागरिकांना ओळखपत्र देणे, शिधापत्रिकेवरील नाव वाढविणे व कमी करणे, खराब झालेल्या व फाटलेल्या, मळकटलेल्या, तेलकट व अवाचनिय अशा शिधापत्रिका बदलून देणे, उत्पन्नावर आधारित केशरी शिधापत्रिका रद्द करुन शुभ्र शिधापत्रिकांचे वाटप करणे, आम आदमी विमा योजना व शिष्यवृत्तीचे अर्ज भरुन घेऊन लाभार्थी निवड करणे, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना, अपंग, विधवा, परितक्त्या योजनेसाठी पात्र लाभार्थीचे फॉर्म भरुन घेऊन लाभार्थींची निवड करणे, गावातील अतिक्रमित पाणंद, पांधण, पानधन, शेतरस्ते, शिवाररस्ते यांबाबतची माहिती तक्रार अर्ज, निवेदने प्राप्त करुन घेणे, ज्या गावी ग्रामस्थ दिनाचे आयोजन केलेले आहे. त्या ठिकाणी आधार कार्डसाठी नोंदणी करणे, खातेउतारे, ७/१२ उतारे, फेरफार उताऱ्याचे वाटप करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.

ग्रामस्थदिन कार्यक्रमाचा त्या त्या गावातील लोकांनी लाभ घ्यावा, यासाठी गावपातळीवर यंत्रणेच्यावतीने प्रभावी जनजागृत्ती आणि प्रबोधन करण्यासही प्राधान्य दिले आहे. याकामी गाव पातळीवर सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून ग्रामस्थ दिनाचा संदेश घरोघर पोहोचविण्यात येत आहे. जनजागृतीचा एक भाग म्हणून वृत्तपत्रे तसेच प्रसार माध्यमाबरोबरच भित्तीपत्रके तयार करुन ज्या मंडळामध्ये ग्रामस्थ दिन होणार आहे, त्या मंडळाच्या अधिपत्याखालील सर्व गावांमध्ये त्याचे वाटप, भित्तीपत्रके चिकटवून त्याची प्रसिध्दी त्या मंडळामध्ये करण्याचे नियोजन केले आहे.

या ग्रामस्थ दिनामध्ये कोणकोणती कामे केली जाणार आहेत याबाबत संबंधित आमदार महोदय, जिल्हापरिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, अन्य प्रतिष्ठित नागरिक यांना मंडळाधिकारी आणि तलाठ्यामार्फत कळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामस्थदिनी कामकाजाचे नियोजन करण्यासाठी ग्रामस्थ दिनामध्ये होणाऱ्या कामकाजासाठी प्रत्येक विषयासाठी तहसिल कार्यालयाचे अधिपत्याखालील सर्व अव्वल कारकून, सर्व मंडळाधिकारी यांची पथक प्रमुख म्हणून नियुक्ती करणेत आली व त्यांना मदतीनस म्हणून त्यांचे अधिपत्याखालील तलाठी व कार्यालयीन कर्मचारी यांची नियुक्ती करुन त्यांना प्रत्येकी एक विषयाचे कामकाज सोपविण्यात आले आहे.

ग्रामस्थ दिनामध्ये अर्जदारांचा अर्ज घेणे, तो नोंदवहीत नोंद करुन घेणे, पुराव्याचे कागदपत्र तपासणी करणे, त्याने मागणी केलेल्या विषयाचे कागदपत्र तयार करुन अर्जदारांना देणे व त्याची पोहोच घेणे अशी कामे सोपविण्यात आलेली आहेत. या योजनेस प्रचंड प्रतिसाद मिळाला असून सातारा उपविभागामध्ये सर्व मंडळामध्ये मिळून एक लाखावर कामकाजाचा निपटारा करण्यात आला आहे. सर्व मंडळ मुख्यालयाचे ठिकाणी ग्रामस्थ दिनाचे कामकाज गेल्या मे पासून प्रभावीपणे करण्यात आले असून या योजनेस जिल्ह्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. ग्रामस्थ दिनामुळे सर्वसामान्य माणसांचे नित्याचे प्रश्न आता चुटकीसरशी निकाली निघू लागल्याने जिल्ह्यातील जनतेच्या चेहऱ्यावर समाधान योजनेमुळे फार मोठे समाधान जाणवू लागले आहे. हीच खरी समाधानाची समाधान येाजना म्हणावी लागेल.

No comments:

Post a Comment