Monday, September 19, 2011

ग्रामपंचायतने उभारली रोपवाटीका

बुलढाणा जिल्हयातील मोताळा ग्रामपंचायतीने चारगाव पाणी पुरवठा योजनेच्या डिडोळा बु. येथील शितकरण केंद्रातील आवारात १० हजार रोपटे असलेली रोपवाटीका स्वत:च्या निधीतून उभारली आहे. या रोपवाटीकेतील रोपे गावकऱ्यांना मोफत वाटण्यात येत असून प्रत्येकी दोन रोपाप्रमाणे ग्रामस्थांना आपल्या घराजवळ लावण्याकरीता उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. बाजारातील नांदूरा मोताळा रस्त्यावरील सरपंच यांच्या वाडयातून पाहिजे ती रोपे मोफत वाटण्यात येत आहेत.

काशीद, कंचन, करंजी, गुलमोहर, बदाम, चिंच, निंबाची रोपे या रोप वाटप केंद्रावर गावकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. पर्यावरण संतुलीत ग्राम समृध्दी योजनेमध्ये गावाची निवड होण्याकरीता ६० टक्के झाडे लावणे बंधनकारक आहेत. याकरीता ग्राममंचायतीने स्वत:च्या उत्पनातून ‍िडडोळा येथील शितकरण केंद्रावर १० हजार रोपे असलेली रोपवाटीका उभारली आहे. ग्रामस्थानी आपल्या घरासमोरील जागेत कमीतकमी दोन रोपे लावायचे असून ही वाढवायची तसेच त्या करीता लागणारा खर्च स्वत: करायचा आहे. ६० टक्के वृक्ष लागवडीसोबत ६० टक्के ग्रामपंचायत वसुली असणे या योजनेकरीता बंधनकारक आहे. शौचालयाची असलेली अट ग्रामपंचायतीने पूर्ण केली आहे. वृक्ष लागवड, वसुली व शौचालयाच्या अटी पूर्ण केल्यास पर्यावरण ग्रामसमृध्द योजनेमध्ये गावाची निवड होवून ३२ लाख रुपयाचा निधी ग्रामपंचायतीला मिळणार आहे.

मोताळा शहरात ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत रोपे मिळणार असल्यामुळें शाळा महाविद्यालय, शासकीय कार्यालय, मंदीर परिसर तसेच शेतातील बांधावर वृक्षारोपण वाढणार आहे. आतापर्यत वृक्षारोपणसाठी बुलढाणा येथील शासकीय रोपवाटीका केंद्रातून रोपे आणून वृक्षारोपण करावे लागायचे. आता नागरिकांची सोय झाली असून त्यांना गावातच रोपे मिळणार आहेत.

No comments:

Post a Comment