शेती व्यवसाय करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यु ओढवतो. काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तिस झालेल्या अशा दुर्घटनेमुळे कुटूंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या कुटूंबास आर्थिक लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजना कार्यान्वित केली आहे. ही योजना १० ते ७५ वयोगटातील शेतकरी यासाठी लागू आहे.
विम्यामध्ये समाविष्ट असणारे अपघात -
या विम्यामध्ये रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यु, विषबाधा, विजेचा धक्का, विज पडून होणारा मृत्यु, खुन, उंचावरुन पडून होणारा मृत्यु, सर्पदंश अथवा विंचू दंश, नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हत्या, जनावरांच्या हल्यामुळे किंवा चावण्यामुळे होणारे अपघात, दंगल अथवा कोणत्याही अपघाती घटनेमुळे शेतकऱ्यास अपंगत्व आले किंवा त्याचा मृत्यु झाल्यास आर्थिक लाभ मिळू शकतो.
विम्यात समाविष्ट नसलेले अपघात -
विमा कालावधीपूर्वीचे अपंगत्व, आत्महत्या, किंवा आत्महत्येच्या प्रयत्नातन झालेले अपंगत्व, गुन्ह्यांच्या उद्येशाने आणि कायद्याचे उल्लंघन करताना होणारे अपघात, अमली पदार्थांच्या नशेत झालेले अपघात, नैसर्गिक मृत्यु, भ्रमिष्टपणा, बाळंपणातील मृत्यु, शरिरातंर्गत होणारे रक्तस्त्राव, मोटर शर्यतीतील अपघात, युध्द, सैन्यातील नोकरी, लाभधारकाकडून झालेला खुन इत्यादीसाठी आर्थिक लाभ मिळत नाही.
विम्यापासून मिळणारे आर्थिक लाभ -
या विम्यापासून शेतकऱ्यास अपघाती मृत्यु झाल्यास अथवा दोन डोळे, दोन अवयय निकामी झाल्यास अथवा एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास रुपये १ लाख आणि एखादाच अवयव किंवा डोळा निकामी झाल्यास रुपये ५०,०००/- हजार एवढा आर्थिक लाभ देण्यात येतो.हा आर्थिक लाभ धनादेशाच्या स्वरुपात अपंग शेतकरी स्वत: किंवा मृत शेतकऱ्यांची पत्नी किंवा पती अविवाहीत मुलगी, शेतकऱ्याची आई, शेतकऱ्याचे मुलगे, नातवंडे, विवाहीत मुलगी यांना प्राधान्यानुसार देण्यात येतो. एकापेक्षा जास्त लाभधारक असल्यास अर्जदारास दुसऱ्या लाभधारकाचे नो ऑब्जेक्शन शपथपत्र सादर करावे लागते.
विम्याचा दावा करण्याची कार्यपध्दती
विम्याचा दावा अपंग शेतकरी किंवा मृत शेतकऱ्यांच्या लाभधारकांनी विहित नमुन्यात पुराव्याच्या कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी यांचेकडे करावयाचा आहे.आवश्यक अर्जाचे नमूने तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे मिळतील.
लाभधारक शेतकऱ्याने करावयाची पुर्तता
• योजनेमध्ये नमुद केलेली दुर्घटना झाल्यास लवकरात लवकर तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.. अर्जातील कोणताही रकाना मोकळा सोडू नये.
• दाव्याचा अर्ज सविस्तर लिहावाअपघाताचे वेळी अपघातग्रस्त व्य्क्ती वाहन चालवित असल्यास त्याचा वाहन चालविण्याचा परवाना सक्षम अधिकाऱ्याने साक्षांकित केलेली प्रत जोडावी.
• दाव्यास पुराव्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्ण माहिती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून घ्यावी.
• दावा परिपूर्ण कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकाऱ्याकडे सादर करावा. दावा सल्लागार कंपनी अथवा विमा कंपनीस परस्पर टपालाने पाठवू नये.
• . दाव्यास लागणाऱ्या मुळ प्रती आणि साक्षांकित कागदपत्रे योग्य प्रकारे पाठवावी.
• साक्षांकन आवश्यक असल्या स सक्षम अधिकायांने सही आणि शिक्यासह साक्षांकन घ्यावे.
• दावा सादर केल्यानंतर कृषी खात्याच्या छाननीनुसार अपूर्णता असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्याकडून माहिती घेऊन अपूर्ण कागदपत्रे विनाविलंब तालुका कृषी अधिकाऱ्यांस सादर करावी.
दाव्यांच्या पुराव्यासाठी जोडावयाची कागदपत्रे
शेतकऱ्याच्या नावाचा ७/१२ उतारा,ज्या नोंदीवरुन शेतकऱ्याचे ७/१२ वर नाव आले तो गाव नमुना ६ ड फेरफार,लाभधारकाची वारस नोंद नमुना ६ क -गाव तलाठी / तहसिलदार कार्यालय, तलाठी प्रमाणपत्र - तलाठी, लाभार्थ्याचे २० रु या स्टॅम्पपेपरवर प्रतिज्ञापत्र - कृषी कार्यालय/ कार्यकारी दंडाधिकारी, शेतकऱ्यांच्या वयाच्या पुरावा -जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र किंवा निवडणुक कार्ड (यापैकी एक)- शाळेचे मुख्याध्यापक किंवा ग्रामपंचायत, पोलीस प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, इन्क्केस्ट पंचनामा- शव विच्छेदन अहवाल (पीएम) - संबंधित पोलिस अधिकारी, मृत्यु प्रमाणपत्र - वैद्यकिय अधिकारी, आरोग्य केंद्र, अपंगत्व आल्यास अपंगाच्या टक्केवारीचे प्रमाणपत्र - आरोग्य केंद्र शासकीय इस्पितल, सक्षम अधिकारी : जिल्हाधिकारी, जिल्हा सिव्हील सर्जन, जिल्हा / उपजिल्हा आरोग्य अधिकारी, सरकारी डॉक्टर, तहसिलदार / बीडीओ, स्पेशल एक्झिकेटीव्ही ऑफीसर, जिल्हा / तालुका कृषी अधिकारी.
अपघाताच्या स्वरुपानुसार काही दाव्यात या व्यतिरिक्त अजून काही कागदपत्रे आवश्यक असतात, त्याची सविस्तर माहिती तालुका कृषी कार्यालयाकडून मिळू शकते : जंतूनाशक अथवा अन्य कारणामुळे विषबाधा - रासायनिक विश्लेषण अहवाल,खून - रासायनिक विश्लेषण अहवाल, दोषारोप पत्र, सर्पदंश / विंचू दंश - रासायनिक विश्लेषण अहवाल (वैद्यकिय उपचारापूर्वीच निधन झाल्याने पोस्ट मॉर्टेम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकिय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र शासकीय आरोग्य केंद्र अधिकाऱ्याकडून प्रतिस्वाक्षरीत असणे आवश्यक), नक्षलवाद्यांकडून झालेल्या हत्या - नक्षलवादी हत्येसंदर्भातील कार्यालयीन कागदपत्रे, चावण्यामुळे रेबीज होऊन मृत्यु - औषधपचाराची कागदपत्रे, दंगल- दंगलीबाबतची कार्यालयीन कागदपत्रे.
संपूर्ण कागदपत्रासह हा दावा लाभधारकाने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिल्या नंतर तालुका कृषी अधिकारी कागदपत्रांची छाननी करुन दावा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवितात. जिल्हा कृषी अधिकारी विमा सल्लागार कंपनीच्या प्रतिनिधीच्या मदतीने दाव्याची कागदपत्रे परिपूर्ण करुन घेतात आणि असा परिपूर्ण दावा सल्लागार कंपनी मार्फत संबंधित विमा कंपनीस निर्णयासाठी सादर करतात.
दावा मंजूर झाल्यास विमा कंपनी दाव्याची रक्कम धनादेशाच्या स्वरुपात रजिष्टर पोस्टाने लाभधारकांस अदा करते. दावा नामंजूर झाल्यास विमा कंपनी लाभधारक आणि तालुका कृषी अधिकारी यांना स्वतंत्रपणे पत्रव्यवहाराने कळविते.
या योनजेअतंर्गत नुकसान भरपाई अदा करण्यासंबंधी लाभधारक, विमा कंपनी अथवा शासकीय यंत्रणेत काही वाद निर्माण झाल्यास त्यावर योग्य तोडगा काढण्यासाठी संबंधित जिल्हयात माननिय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे.
शासनाच्या वेगवेगळया महसुल विभागासाठी वेगवेगळया विमा कंपन्याकडे विमा काढण्यात आला आहे. ही योजना राबविण्यासाठी डेक्कन इन्शुरन्स ऍ़ण्ड रिइन्शुरन्स बोकर्स प्रा. लिमिटेड कंपनीस, औरंगाबाद महसूल विभागासाठी विमा सल्लागार म्हण्ून नेमण्यात आले आहे. लाभधारकाला मदत करण्यासाठी सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी ठराविक दिवशी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात हजर असतात.
No comments:
Post a Comment