नवी मुंबई २१ व्या शतकातील नियोजनबध्द पध्दतीने वसविलेले, मुंबईच्या उपनगरीय हार्बर मार्गावरील महत्वपूर्ण शहर आहे. जगातील एकमेव सर्वात मोठे आणि निसर्ग सौदर्यांनी वेढलेले शहर आहे. नवी मुंबईची वाटचाल ‘मॉडर्न हब’ दिशेने होत असून नॅशनल जॉग्रफी चॅनेलने मेगासिटी म्हणून गौरविलेले शहर आहे. बृहन्मुंबईच्या आकाराने चार पंचमांश एवढे असणारे व औद्योगिक क्षेत्रही बृहन्मुंबईपेक्षा तीन चतुर्थांश असलेले शहर. शहराचे नियोजन २० लाख लोकसंख्येसाठी केले असले तरी हे शहर ४० लाख लोकसंख्या सामावून घेऊ शकते. नवी मुंबईतील रहिवाशांचे सरासरी दरडोई उत्पन्न २५ हजार रुपये असून सुमारे ६४ टक्के कुटुंबांकडे स्वत:चे वाहन आहे. या शहरातील साक्षरतेचे प्रमाण ९८ टक्के आहे. नवी मुंबई शहराची लोकसंख्या २० लाख असून प्रत्येक कुटूंबात साधारणपणे ३ ते ४ व्यक्तींचा समावेश आहे.
या शहराविषयी सविस्तर माहिती ‘सोशिओ इकॉनॉमिक प्रोफाइल ऑफ हाऊसहोल्ड इन प्लॅन्ड नोडस इन नवी मुंबई -२०११’ या अहवालात दिलेली आहे. सिडको अर्थात सिटी ॲन्ड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनने किर्लोस्कर कंसलटंट लिमिटेड यांच्या सहयोगाने हा अहवाल तयार केला आहे. मुख्यमंत्री पृध्वीराज चव्हाण यांच्या हस्ते या अहवालाचे आगरी-कोळी भवनच्या उद्घाटनप्रसंगी नुकतेच नव्या मुंबईत झाले. या समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार, ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री व अपारंपरिक उर्जामंत्री गणेश नाईक, नगर विकास राज्यमंत्री भास्कर जाधव, नव्या मुंबईचे महापौर सागर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
नवी मुंबई परिसरात सिडकोच्या वतीने ३७ टक्के घरे बांधण्यात आली असून खाजगी क्षेत्राने ६३ टक्के घरे बांधली आहेत. यामध्ये कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी (सुमारे २५ चौरस मीटरपर्यंतची घरे) १६.५ टक्के घरे बांधण्यात आली आहेत. याशिवाय मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी (सुमारे २५ ते ५० चौ.मी. आकाराची) ४८.६ आणि (५० ते ७५ चौ.मी. आकाराची) २१.१ टक्के घरे बांधण्यात आली आहेत. उच्च उत्पन्न गटासाठी (७५ चौ.मी.पेक्षा अधिक आकाराची) सुमारे १२.८ टक्के घरे बांधण्यात आली आहेत.
सिडको आणि खाजगी उद्योगानी बांधलेल्या घरातील ८० टक्के घरे लोकांच्या स्वत:च्या मालकीची तर, १७ टक्के घरे भाडे तत्वावरील असून ३ टक्के घरे उद्योजक व कंपन्यानी आपल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध करुन दिली आहेत. नव्या मुंबईत, मुंबईतून गेल्या ११ वर्षात सुमारे ११ टक्के लोकांनी स्थलांतर केले आहे. यातील ७३.४ टक्के नागरिक महाराष्ट्रीयन आहेत. या शहरातील ९८ टक्के नागरिक साक्षर असून त्यामध्ये ९८ टक्के पुरुष तर ९७ टक्के महिला साक्षर आहेत. ३४ टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक पदवीधर आहेत. सुमारे ७६ टक्के नागरिक इंग्रजी जाणतात, २१ टक्के नागरिक मराठी, दोन टक्के हिंदी भाषिक आणि इतर भाषा जाणणारे १२ टक्के आहेत.
रोजगार विषयक :
नव्या मुंबईत एकूण ३५ टक्के नागरिक विविध प्रकारची नोकरी करीत असून नोकरी करणाऱ्या पुरुषांची टक्केवारी ८६ टक्के तर, स्त्रियांची टक्केवारी १४ टक्के आहे. प्रत्येक कुटुंबांमागे सरासरी १.३ टक्के कमावती व्यक्ती आहे. कुटूंबनिहाय सर्वेक्षणात ७५ टक्के कुटुंबामध्ये एक व्यक्ती कमावणारी आढळून आली आहे. २० टक्के कुटूंबात दोघे कमावणारे, ४२ टक्के कुटूंबात तीन व्यक्ती कमावणाऱ्या म्हणजे नोकरी करणाऱ्या आढळून आल्या. एक टक्के कुटूंबात ४ किंवा अधिक व्यक्ती नोकरी करणाऱ्याही आढळून आल्या. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये ३० टक्के व्यक्ती व्यवस्थापक पदावर आणि १८ टक्के व्यक्ती या स्वत:चा व्यवसाय करणाऱ्या आहेत. १५ टक्के व्यक्ती या कारकून वा तत्सम पदावर सेवा करणाऱ्या असून कुशल कामगार सुमारे १३ टक्के आहेत. स्वत:चा व्यवसाय करणारे १० टक्के तर इतर व्यवसायात १४ टक्के लोक काम करतात. नोकरी करणाऱ्यांमध्ये ५३ टक्के खाजगी कंपन्या / कार्यालयात काम करतात. १२ टक्के शासकीय कर्मचारीही आहेत. शाळा/महाविद्यालयामध्ये नोकरी करणाऱ्यांची संख्या ७ टक्के आहे. सार्वजनिक उपक्रम बँकामध्ये ५ टक्के औद्योगिक घटकात ५ टक्के, वाणिज्य अथवा व्यापारी संस्थामध्ये ३ टक्के तर बांधकाम उद्योगात १ टक्के आणि इतर क्षेत्रात १० टक्के लोकांचा समावेश आहे.
नव्या मुंबईतून नोकरीसाठी मुंबईमध्ये २० टक्के लोकांना जावे लागते. मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण क्षेत्रात ८ टक्के, ठाणे-कल्याण भागात ४ टक्के लोकांना जावे लागते आणि नवी मुंबईत ६८ टक्के लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
या महानगरातील नागरिकांचे मासिक सरासरी उत्पन्न २४६६८ रुपये असून नेरुळ सारख्या क्षेत्रात ते ३२४१५ रुपयापर्यंत आहे. प्रत्येक कुटूंबाचा मासिक सरासरी खर्च ७२६१ रुपये आहे. या महानगरीतील ६४ टक्के कुटुंबाकडे स्वत:चे वाहन आहे. यामध्ये दुचाकी वाहने ४९ टक्के कुटूंबाकडे आहेत, १८ टक्के कुटूंबाकडे सायकली आहेत. पाच टक्के कुटूंबाकडे स्वत:चे दुकान वा वाणिज्यिक युनिट आहे.
मूलभूत सुविधा:
नव्या मुंबईत नागरिकांसाठी पायाभूत व मुलभूत सुविधा अधिक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. नव्या मुंबईत ७९ टक्के लोकसंख्येला पाणी पुरवठा व ७४ टक्के लोकसंख्येला वीज पुरवठा करण्यात आला आहे. या परिसरात ६७ टक्के रस्त्याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अंत्यसंस्कारासाठी ६७ टक्के व्यवस्था आहे. वाहन पार्कींग व्यवस्थाही ६४ टक्के आहे. मलनि:सारण व्यवस्था ६३ टक्के आहे. नवी मुंबईत ७४ टक्के शालेय शिक्षणाची तर, उच्च शिक्षणासाठी ७० टक्के सोय आहे. आरोग्य सुविधा ६६ टक्के आणि रोजगाराची संधी ६३ टक्के असून सुरक्षा व्यवस्थाही ५५ टक्के आहे.
या महानगरातील ९७ टक्के महिला साक्षर असून २६ टक्क्याहून अधिक महिला पदवीधर आहेत. यामध्ये २८ टक्के महिला व्यवस्थापक वा तत्सम पदावर, १९ टक्के कारकून, ११ टक्के शिक्षकी पेशात आहेत. ९ टक्के महिला व्यापार व्यवसाय उद्योगात आहेत. महिलांचा मासिक सरासरी पगार १३२४७ रुपये एवढा आहे.
No comments:
Post a Comment