गुंजरखेडा हे गाव पुलगाव ते आर्वी या रस्त्यावर असून, या गावाची लोकसंख्या दोन हजाराचया वर आहे. येथील दारिद्र्य रेषेखालील १५ महिला एकत येऊन त्यांनी २२ जानेवारी २००३ रोजी रमाबाई महिला बचत गटाची स्थापना केली. तत्पूर्वी या गटाची पहिली बैठक २५ डिसेंबर २००२ रोजी संपन्न झाली होती त्या बैठकीत बचत गटाच्या नावा सोबतच अनेक ठराव घेण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रतिभा अनिल इंगळे व सचिव म्हणून वनिता गौतम सिंगनापूरे यांच्या नावाची निवड करण्यात आली.
बचत गटाची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर अध्यक्ष श्रीमती इंगळे म्हणाल्या की रमाबाई बचत गटातील सर्वाधिक महिला ह्या दारिद्र रेषेखालील आहेत. पुरेसे शिक्षण नसलेल्या बचत गटाच्या महिलांमध्ये जबरदस्त असा आत्मविश्वास आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे रु. ३० मासीक वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. रमाबाई महिला बचत गटाच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र पुलगाव येथे बचतीचे खाते उघडण्यात आले. दोन वर्षात १० हजार ८०० रुपये जमा झाली. या रकमेतून सदस्यांना अंतर्गत कर्ज २ टक्के व्याजावर देण्यात आले. तसेच कर्जाऊ रकमेचे नियमित परतफेड बचत खात्यात जमा होत असल्याने बचत गटाची प्रामाणिकता पाहून १२ जानेवारी २००५ मध्ये महाराष्ट्र बँकेने १५ हजाराचे कर्ज गटाच्या अंतर्गत उलाढाली साठी मंजूर केले.
या बचत गटातील पाच महिलांनी स्वत:चा व्यवसाय उभारला त्यामध्ये नंदा ठाकरे या महिलेनी दोन हजार रुपये कर्ज घेवून बांगड्या व स्टेशनरीचा फिरते व्यवसाय प्रारंभ केला. या व्यवसायातून त्यांना महिन्याला किमान ३ हजार रुपये नफा होत आहे.
मंजू शेंडे या महिलेनी ५ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी टेलरींगचा व्यवसाय स्व:ताच्या घरी सुरु केले. या व्यवसायाला परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना सुध्दा महिण्याला ४ हजार रुपये शुध्द लाभ मिळत आहे.
शालू वडकर या महिलेचा गावातच हॉटेलच्या व्यवसायासाठी ५ हजार रुपये कर्ज दिले. गावातील मुख्य रस्त्यालगत एकच हॉटेल असल्यामुळे व्यवसायात प्रगती सुरुच असून सर्व खर्च वजा जाता किमान ६ हजार रुपये निव्वळ नफा कमवित आहे.
मेंढे या महिलेनी लेडीज गारमेंटचा व्यवसाय स्विकारुन प्रगती साधली आहे. त्यांना सुध्दा महिन्याला ३ हजार ५०० रुपये खर्च वजा जाता शुध्द लाभ मिळत आहे.
या बचत गटाला आंगणवाडीचा आहार पुरविण्याची निविदा मंजूर झाली. त्यांचे संचलन वर्षा खडसे यांना बचत गटाच्या सदस्याला देण्यात आल्यामुळे त्यांना सुध्दा महिन्याकाठी ९०० रुपये मिळत आहे.
छाया खोब्रागडे या महिलेने एक हजार रुपये कर्ज घेतले त्या रकमेतून एक म्हैस घेवून दुग्ध व्यवसाय करीत आहेत.त्यांचा व्यवसाय प्रगती पथावर असल्यामुळे आता त्यांच्याकडे ४ म्हशी झाल्या आहेत. त्यांना सुध्दा सर्व खर्च वजा जाता किमान ७ हजार रुपये नफा मिळत आहे.
बचत गटाचा मूळ व्यवसाय साड्या विक्रीचा होता. प्रत्येक महिलेला कर्जाउ रक्कम दिल्यामुळे त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. कर्जाऊ घेतलेली रक्कम टप्प्याटप्प्याने व्याजासह बचत गटाला परतफेड केली आहे..
साडयाच्या व्यवसायात वंदना बोरकर, मंगला इंगळे, अंजिता कळमकर, वनिता सिंगणापुर, प्रतिमा इंगळे व मंजू शेंडे कार्य करत आहेत. गटातील महिला त्यांच्या परिसरातील गावोगावी जाऊन घर भेटीतून साड्यांची विक्री करीत असतात. त्यांचे परिश्रम वाया जात नाही. उलट त्यांच्या साड्याच्या विक्रीतवाढ सुध्दा होत असते. महिन्याला साड्याच्या विक्रीपासून ६० हजार मिळतात. विक्रीवर २० टक्के कमीशन मिळत असल्याने बचतगटातील ६ महिलांना किमान २ हजार रुपये मिळत आहे असे अध्यक्ष श्रीमती इंगळे यांनी सांगितले.
बचत गटातील महिला त्यांच्या व्यवसाला पारंगत होत असून, त्यांनी त्यांच्या कुटूंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला त्यांनी वाहून घेतले आहे.
अंतर्गत कर्जासाठी बचत गटाने घेतलेली १५ हजार रकमेचा बँकेला परतफेड केल्यानंतर ८ जानेवारी २००७ रोजी पहिला हप्ता ८३,६६२ रुपयाचा, दुसरा हप्ता १६ एप्रिल २००७ रोजी ८४८५ रुपयाचा व तिसरा हप्ता २६ डिसेंबर २०१० रोजी ४८ हजार रुपये असे एकूण २ लाख २० हजार रुपये बँकेने व्यवसायासाठी दिले असून, ४ हजार रुपयाचा विमा सुध्दा बँकेने काढला आहे.
कापड व्यवसायासाठी मिळालेल्या रकमेतून महिलांसाठी साड्या, लुगडी, ड्रेस मटेरीयल, धोतर, लुंग्या इत्यादी बाजारातून घेण्यात आल्या असून ह्या वस्तू घरोघरी जाऊन बचत गटाच्या महिला विक्री करीत आहेत. विक्री झालेल्या माला नंतर नविन माल खरेदी केल्या जात असून, व्यवसाय उत्तम सुरु असल्याची ग्वाही श्रीमती इंगळे यांनी दिली.
No comments:
Post a Comment