जिल्ह्यातील मुलींचा घटता जन्मदर चिंतनीय ठरल्याने बुलढाणा सिटीझन फोरमने लेक माझी अभियान राबविण्यास सुरुवात केली. त्याला प्रतिसाद देत सर्व तालुक्यातील संस्था, संघटना आणि नागरिकांनी या कार्यात पुढाकार घेतला आहे. राष्ट्रमाता जिजाऊ आणि ताराबाई शिंदे यांचा वारसा सांगणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात स्त्रियांचे घटलेले प्रमाण लक्षात आल्यानंतर लेक वाचवा चळवळ सुरु झाली असून चिखलीकरांनी ऑगस्ट क्रांतीदिनी निघालेल्या रॅलीमध्ये अभूतपूर्व सहभाग नोंदविला. लोक प्रबोधनासाठी सुरु झालेली ही चळवळ प्रत्येक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावोगावी राबविण्यात येणार आहे.
तालुका प्रशासन, तालुका पत्रकार संघ आणि चिखली मेडीकल संघटनेच्या पुढाकारातून जनजागरणासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील सुमारे २० हजारापेक्षा जास्त नागरिकांनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे या अभियानाने लोक चळवळीचे स्वरुप घेतल्याचे दिसून आले. चिखली शहरात सर्वत्र लेक माझी अभियानाअंतर्गत स्त्रिभ्रृणहत्येला विरोध करण्यासाठी आणि स्त्रि जन्माचे स्वागत करण्यासाठी सर्वत्र मोठमोठे बॅनर आणि स्वागत कमानी लावण्यात आल्या होत्या. शहराच्या विविध भागातून रॅली जात असताना नागरिकांनी आणि विशेषत: महिलांनी मोठ्या उत्सहात रॅलीचे स्वागत केले.
शहरातील धनश्री नागरी पतसंस्थेने ९ ऑगस्ट या क्रांती दिनी जन्मलेल्या बालिकेला २१०० रुपयाचे प्रमाणपत्र देण्याचे तर चिखली अर्बनच्या माध्यमातून सुकन्या ठेव योजना आणि रेणूकामाता पतसंस्थेच्या भागधारकांसाठी भाग्यलक्षी योजनेअंतर्गत बालिकेला २१०० रुपयांचे बचत प्रमाणपत्र देण्याचे जाहिर करुन या अभियानात सहभाग नोंदविला. ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामपंचायती या अभियानात सहभागी झाल्यास ही लोक चळवळ ग्रामीण भागात पोहोचून समर्थपणे रुजविली जाणार आहे. ही लोकचळवळ आगामी काळात व्यापक स्वरुप घेणार असून जिल्ह्यातील मुलींचा जन्मदर वाढण्यास यामुळे मदत होईल अशी अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment