कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेचं रोपटं लावून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या मुलांपर्यत पोहोचविली. आज कर्मवीर अण्णांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले असून लाखो विद्यार्थी रयतच्या माध्यमातून घडले आहेत. यामुळेच रयत शिक्षण संस्था ही दर्जेदार शिक्षणासाठी महाराष्ट्रातच नव्हे तर देशात लौकिक प्राप्त केली आहे. रयत शिक्षण संस्थेचा हा लौकिक श्रीलंकेतही पोहचला असून नुकतेच येथील एका शिष्टमंडळाने रयत शिक्षण संस्थेच्या केबीपी इन्स्टिट्यूटची पाहणी करुन या संस्थेला गौरव केला आहे, ही बाब महाराष्ट्र आणि महाराष्ट्रवासीयांच्या दृष्टीने महत्वाची आहे.
श्रीलंकेतील विद्यार्थ्यांना भारतात येऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे. दर्जेदार शिक्षण घेता यावे, म्हणून योग्य संस्थांची निवड करण्यासाठी शासनाने तज्ज्ञांचा अभ्यास दौरा आयोजित केला. त्यात व्यवस्थापन व्यावसायिक शिक्षणासाठी के.बी.पी.इन्स्टिट्यूटची पाहणी करण्यात आली. भविष्यात श्रीलंकेच्या विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेण्याची संधी मिळू शकेल. रयत शिक्षण संस्थेच्या कमवा व शिका योजनेबद्दल श्रीलंकेतील विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल.
ऐतिहासिक साताऱ्याची ओळख हळूहळू विद्येच्या क्षितीजावर लौकिक वाढवत आहे. याची नुकतीच प्रचिती आली. श्रीलंका शासन भारतात जाऊन शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहे. परिपूर्ण शिक्षणासाठी योग्य संस्थांची निवड करण्यासाठी २२ तज्ज्ञांचे शिष्टमंडळ भारतात आले असून त्यांना प्राथमिक, माध्यमिक शिक्षणासाठी पाचगणी येथील काही संस्थांना भेटी दिल्या. तर व्यावसायिक आणि व्यवस्थापकीय शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्थेच्या वर्ये येथील केबीपी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज अँड रिसर्चची पाहणी केली.
यावेळी तज्ज्ञांनी सविस्तर माहिती घेऊन, पाहणी करून या संस्थेत श्रीलंकेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पाठविले जावे, असे शासनास सुचित करण्यात येणार असल्याचे सूतोवाच केले. श्रीलंकेतील शिक्षणपध्दतीत रयत शिक्षण संस्थेच्या कमवा आणि शिका या नाविण्यपूर्ण उपक्रमाचा अवलंब करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे या शिष्टमंडळाने यावेळी स्पष्ट केले.
भविष्यात या संस्थेमध्ये श्रीलंकेतील विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा, त्यांना परिपूर्ण शिक्षण देण्याची ग्वाही शिष्टमंडळाला देण्यात आली. त्यामुळे यापुढे श्रीलंकेत साताऱ्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याच्या लौकिक श्रीलंकेतही पोहोचेल यात मात्र शंका नाही.
No comments:
Post a Comment