Friday, September 30, 2011

एक थेंब रक्ताचा अंकुर फुलवितो जीवनाला!

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे दरवर्षी १ ऑक्टोबर हा दिवस जागतिक ऐच्छीक रक्तदान दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. रक्तदानाचे महत्त्व पटवून देऊन अधिकाधिक व्यक्तींना रक्तदान एक सामाजिक चळवळ होईल. यासाठी सामाजिक वातावरण तयार करणे, हा या जनजागरण मोहिमेमागील उद्देश्य आहे.

विज्ञानाने विस्मयकारक प्रगती केली असली तरी अद्यापही मानवी रक्ताचं पर्याय शोधणे शक्य झालेले नाही. आपल्या शरीरास रक्ताची गरज ही प्रत्येक पेशी पर्यंत प्राणवायू वाहून नेण्यासाठी असते. तसेच रक्तामुळे शरीराच्या तापमानाचे नियमन व रोग प्रतिकारक शक्ती निर्मिती शक्य होते. त्यामुळे रोगजंतू विषाणू यांच्या संसर्गापासून पर्यायाने आजारापासून आपले संरक्षण होते.

अनेक कारणांनी आपल्या शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. आजारपण, क्षयरोग, स्त्रीयांची प्रसूती, अपघातातील जखमा इत्यादीमुळे शरीरातील रक्त शरीरातून वाहून गेल्याने प्रसंगी मृत्यूही येऊ शकतो. अनेक शस्त्रक्रियांच्या प्रसंगी रुग्णांना रक्त देण्याची गरज असते. या सर्व प्रकारातील रुग्णांना ज्यावेळी रक्ताची आवश्यकता असते त्यावेळी त्यांना फक्त मानवी रक्तच उपयोगी पडते.

प्रत्येक जिल्हा रुग्णालयात सरकारमान्य शासकीय रक्तपेढी आधुनिक साधनसामग्रीने सुसज्ज केलेली आहे. ग्रामीण पातळीवर ब्लॉक स्तरावर प्रथम संदर्भ सेवा केंद्र म्हणजे एफआरयु मध्ये सुध्दा रक्त साठवण केंद्र म्हणजे मिनी रक्तपेढी प्रत्येक जिल्हयात सुरु केलेली आहे. राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेला उपजिल्हा रुग्णालय स्तरावर ट्रॉमा केअर युनिट्स सुसज्ज केलेले आहेत. ट्रॉमा केअर युनिटचा व ऑपरेशन, सर्जरीचा उपयोग तात्काळ करुन अपघात ग्रस्त रुग्णांना तातडीने रक्त संक्रमण देऊन प्राण वाचवू शकले आहेत.

एखादया रुग्णाला रक्त लावताना ते सुरक्षित आहे की नाही हे महत्त्वाचे आहे. सुरक्षित म्हणजे एचआयव्ही विषाणू पासून ते रक्त फ्री पाहिजे. जे रक्त ऐच्‍छीक रक्तदानातून गोळा केलेले आहे, असे रक्त जेव्हा सर्व चाचण्यातून, एलआयझातून निगेटिव्ह येते तेच रक्त सुरक्षित समजले जाते. व्यावसयिक रक्तदाते किंवा 'पेड डोनर्स'कडून जबरदस्तीने गोळा केलेले रक्त रुग्णाला बरे करण्यापेक्षा असाध्यव्याधी देऊन जाते. त्यासाठी शासकीय रक्तपेढीत सतत रक्तसाठा उपलब्ध पाहिजे. त्याकरिता ग्रामपातळी पर्यंत ऐच्छीक रक्तदान शिबिरे आयोजित केले पाहिजेत. पंरतू गाव पातळीवर आजही रक्तदानासाठी तरुण समोर येत नाहीत. युवा वर्गाच्या मनात अजूनही रक्तदाना बद्दल गैरसमज आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांनी अशा वेळी शास्त्रीय माहिती सांगून हा गैरसमज दूर केला पाहिजे.

१८ ते ५० वयोगटातील कुठलीही निरोगी वयक्ती (स्त्री/पुरुष) कधीही रक्तदान करु शकते.
५० किलोपेक्षा जास्त वजन असलेला कुठलाही युवक-युवती दर तीन महिन्याला रक्तदान करु शकतो.

मानवी शरीरात सुमारे ५.५ लीटर रक्त उपलब्ध असते. रक्ताचा ८० टक्के भाग हा पाण्यापासून व २० टक्के भाग हा पेशीपासून बनलेला असतो. त्यामुळे रक्तदान केल्यावर एका आठवडयात त्याची भरपाई मिळून येते. जरी रक्तदान केले नाही तरी रक्तातील लालपेशींचे आयुष्य फक्त १२० दिवस असते. त्यानंतर त्या नष्ट पावतात व परत नवीन पेशी सतत तयार होतात. त्यामुळे रक्तदान केल्याने तरी एखादयाचा जीव वाचु शकतो.

रक्तदानाच्या वेळी ५.५ लीटर उपलब्ध रक्तातून फक्त ३०० मिली रक्त जमा केले जाते. त्यामुळे निरोगी शरीराचे काहीही नुकसान होत नाही. या २१ व्या शतकाचा एक नवीन नारा युवा पिढीपर्यंत पोहचविला जात आहे.

नव्या शतकाचा नवा नारा
दर वाढदिवसाला रक्तदान करा

युवा वर्गात वेगवेगळ्या पध्दतीने रक्तदान साजरा करण्याची क्रेझ असते. पंरतु रक्तदानाने वाढदिवस साजरा केला तर एक नवा आदर्श निर्माण होऊ शकतो. याकरिता गावपातळी पर्यंत 'बर्थ डे डोनर्स क्लब' स्थापन झाले पाहिजेत. बर्थ डे डोनर्स क्लब म्हणजे एखादा गुरु, राजकीय पुढारी ,आमदार, खासदारांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी, अनुययांनी रक्तदानाने साजरा करणे. मित्रमंडळी सोबत जवळच्या शासकीय रक्तपेढीत जाऊन ऐच्छीक रक्तदान करणे म्हणजे खराखुरा वाढदिवस साजरा करणे होय. जो युवा वर्ग एकदा निर्भयपणे रक्तदान करतो त्याला रक्तदानाची सवय लागते. वर्षातून तो सहजपणे चार वेळा रक्तदान करु शकतो. म्हणूनच विदर्भात ऐच्छीक रक्तदानाचे शतक पार पाडणारे अनेक आदर्श युवक ऐच्छीक रक्तदात्यांच्या गोल्डन लिस्ट मध्ये शामील आहेत.

गोंदिया जिल्हयात आठ ग्रामीण रुग्णालये, दोन उपजिल्हा रुग्णालय, चाळीस प्राथमिक आरोग्य केंद्र व शेजारचा बालाघाट जिल्हा, छत्तीसगड राज्यातील रुग्णांच्या सेवेकरिता फक्त एकच शासकीय बाई गंगाबाई रुग्णालयातील रक्तपेढी उपलब्ध आहे.

प्रसूतिरुग्ण, ऑपरेशन, रक्तस्त्राव, सिझरिन अशा रुग्णामुळे व सिकलसेल, मलेरिया, कॅन्सर सारख्या रुग्णांना देखील तात्काळ रक्त पुरवठयाची गरज असते. महाराष्ट्र शासनाने सिकलसेल रुग्णांना व थॅलेसॅमिया, हिमोफिलीया रुग्णांना मोफत रक्त पुरवठा करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत.

आता १५ ऑगस्ट २०११ पासून कार्यान्वयीत केलेल्या माता बाल संगोपन क्षेत्रास नवसंजीवनी देणाऱ्या जननी नवजात बालक शिशु सुरक्षा योजनेत सुध्दा बाळ बाळंतणीला सर्व उपचार मोफत मिळणार आहेत. त्यानुसार सिझरिनसाठी लागणारे रक्त, गर्भवतीला असणाऱ्या ॲनिमियाच्या उपचारासाठी रक्तपुरवठा किंवा इर्मजन्सी रक्तस्त्रवाचा उपचार (प्लेसेंटा प्रिव्हीया किंवा पोष्ट पॉर्टम हमरेज) रक्तपेढी तर्फे मोफत मिळणार आहे.

परंतु त्याकरिता गरज आहे. सशक्त, सुरक्षित, ऐच्छीक रक्तदात्यांची कारण रक्तपेढीत जर ऐच्छीक रक्तदात्यांच्या मोबाईल नंबर सहीत संपूर्ण पत्यासहीत डिजीटल यादी उपलब्ध असेल तरच आपण रक्ताची वाढती मागणी पूर्ण करु शकु अन्यथा रक्ताची टंचाई तर भासणारच.

रक्तदान श्रेष्ठदान

No comments:

Post a Comment