रत्नागिरी तालुक्यातील जयगड ते निवळी या भागातून प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला कातळाने व्यापलेला पृष्ठभाग दिसतो. काही ठिकाणी खुरटे गवत आणि पावसाळा असल्याने आकर्षक रानफुले दिसत असली तरी शेती मात्र अभावानेच आढळते. मधूनच डोकवणारी भातशेती या भागातील शेतकऱ्यांची धडपड दाखविण्याइतपतच मर्यादीत आहे. कातळामुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नांनाही मर्यादा येतात. मात्र अशा परिस्थितीवर मात करून कलझोंडी गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शेतात भाजीपाला पिकवितांनाच घरासमोरील परसबागादेखील फुलविल्या आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरील निवळीमार्गे जयगडला जाताना कलझोंडी गाव साधारण २५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील काही महिला आनंदी निंबरे आणि वंदना निंबरे यांच्या प्रयत्नामुळे एकत्र आल्या. त्यांनी श्री चंडीकादेवी बचत गटाची स्थापना २००३ मध्ये केली. दोन्ही गटांचे नाव श्री चंडीकादेवी याच नावाने मात्र अ आणि ब अशा स्वरुपात ठेवण्यात आले. अंतर्गत कर्जाच्या माध्यमातून गटाचे कार्य करतांना या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. लाभही फारसा मिळत नव्हता. त्यामुळे शेवटी बचत गट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र वासुदेव निंबरे यांनी या निर्णयापासून गटाच्या सदस्यांना परावृत्त करीत काहीतरी व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गटाने पुढील वाटचाल सुरू केली.
गटाने प्रथम पतवारीत मिळालेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली. त्यामुळे दोन्ही गटांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रत्येकी तीन लाखाचे कर्ज मंजूर झाले. गटाने भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर विविध प्रदर्शनात घरी तयार केलेल्या वस्तूंची विक्रीदेखील केली. कर्जाचा विनियोग योग्य प्रकारे करताना गटाच्या सदस्यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवला. गावातील ग्रामपंचायतीच्या विहीरीला पाणी होते. मात्र वस्ती उंचावर असल्याने शेतीची कामे करण्यात पाण्याची समस्या होती. मिळालेल्या कर्जातून ४५ हजार लिटरची टाकी उभारण्यात आली आणि विहीरीवर ५ अश्वशक्तीचा पंप बसविण्यात आला.
गटाच्या सदस्यांनी केवळ शेतीसाठी ही सोय मर्यादीत न ठेवता परिसरातील ५० कुटुंबाना नळ कनेक्शन दिले. नळाद्वारे पावसाळ्यात २४ तास आणि उन्हाळ्यात कुटुंबाला १५०० लिटर पाणी दिले जाते. नळ योजनेचे काम १० लाखाचे असतांना स्वत: महिलांनी पुरुषांसोबत काम करून केवळ साडेचार लाखात काम पुर्ण केले. गटाचे काम पाहून श्री गजानन आणि भगवतीदेवी हे दोन बचत गटही या महिलांसोबत काम करायला तयार झाले. या दोन्ही गटांनी शेतीसाठी ५ लाखाचा प्रस्ताव सादर केला आहे. गटातील महिलांनी शेतात भाजीपाला फुलविताना घरासमोर परसबागेत केळी, टमाटा, भेंडी असे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.
बचत गटाकडील एक एकर शेतात पालक, मुळा, फरसबी, दोडकी, भेंडी, मिरची पिकविली जाते. या भाज्यांची जागेवरच विक्री होते. एका सदस्याला महिन्यातून दोन दिवस शेतात काम करावे लागते. घरचे काम सांभाळतांना घरासाठी भाजी मिळण्याबरोबरच कर्जाचा हप्ता जावून २० हजारापर्यंत फायदा होतो. वर्षातून एका मोठ्या प्रदर्शनात सहभाग घेतल्यास ४० ते ५० हजार रुपये फायदा होत असल्याचे सविता निंबरे सांगतात. या प्रदर्शनात गटाच्या नाचणा भागरी आणि मेथी भाजी, खरडी चटणी आणि तुळशी भजीला खुप मागणी असते. बांद्रा येथे भरलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनातही बचत गटाने चांगला व्यवसाय केला होता.
बचत गटातील महिला आता रोहयो अंतर्गत गाळ उपसणे, पाखाडी तयार करणे अशा कामातही सहभागी होत आहेत. शेतीचे क्षेत्र वाढविण्याचे स्वप्न मनात बाळगून त्यांची वाटचाल सुरू आहे. नवे प्रयोग करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांच्या याच धडपड्यावृत्तीमुळे आणि त्यांनी केलेल्या प्रगतीमुळे त्यांना द्वितीय क्रमांकाचा राजमात जिजाऊ पुरस्कारदेखील मिळाला आहे. कष्टाने पाषाणालाही बहर येतो हे या महिलांनी दाखवून दिले आहे.
No comments:
Post a Comment