आषाढपर्यंत पाऊसधारांनी चिंब भिजलेली सृष्टी श्रावणाला हळूवार स्पर्श करते ते हिरवं लेणं लेवूनच. मेळघाटच्या घाटवळणातून प्रवास करत होतो. दूरदूरपर्यंत संबंध वृक्षवनस्पती नखशिखान्त हिरव्या झालेल्या दिसत होत्या.सततच्या पावसामुळं काही झाडांच्या खोडांवरही हिरव्या शेवाळाने आपलं बस्तान साम्राज्य वाढविलं होतं. काळया जमिनीवर तृणवर्गीय वनस्पतींचा हिरवा मोरपिसारा फुलला होता. काही वेळातच दिगंतरातील कृष्णमेघांची दाटी काहीशी पांगायला लागली. उन-पावसाचा लपंडाव सुरु झाला. तोच नभात इंद्रधनु अवतरला आणि ओठावर बालकविंचे शब्द फुटू लागले – हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे . . .
निसर्गाचं खरं पावसाळी रुप अनुभवायचं असेल तर पर्वतराजीत. द-याखो-याच्या डोंगरवनात भटकावं.सारी सजीवसृष्टी हिरव्या अथांग सागरात पांघरलेली दिसते.
रानवा-यामुळे यावर हिरव्या सागरलाटा उसळल्यागत दिसून येतात.झुळूझुळू वाहणारे निर्झर, खळाळत वाहणा-या सरीता हया सृष्टीच्या जीवनरेखा बनून आपला प्रवास करतांना
दिसतात. सागरभेटीसाठी त्यांची ही ओढ जीवनाचा अर्थ सांगत असते. कारण जीवन हाही एक प्रवाह आहे. ते सतत प्रवाहासारखं सुरु राहिलं पाहिजे. तरच हा जीवन प्रवास सुखकर होतो. थांबवलं तर ते संपून जातं. सरीतेचा शेवट म्हणजे सागरात विलिन होणे. तसं माणसाचा जीव हाही कशात तरी विलीन होत असावा काय?
रिमझिम वर्षाधारेत हिरव्या – हिरव्या पर्वतराजीत चोहीकडे कसं चैतन्य ऊफाळून आलं होतं. डोंगर शिरावर पडलेलं पाणी धारेनं धबधबा बनून खाली धडाडत कोसळत होतं. हिरव्या शालूतील सृष्टी या पांढ-या शुभ्र फेसाळ पाण्याच्या अवतरणाने निसर्गहास्य फुलवित होती. दगडी शीळांवर आदळत आपटत हया पाऊसधारा जेव्हा जमिनीवरच्या दगडांवर पडत होत्या. तेव्हा त्याच्या प्रचंड घर्षणाने तेथे उर्जा निर्माण होते होती. मग बाष्पीकरणाचे ढग तेथे तयार होत होते. ते हळूवारपणे अलगद वर येवू लागताच या ढगांच्या पदराआडून दिसणार भिमकुंडचा धबधबा निसर्गसृष्टीचं स्वर्गीय रुप दाखवित होता. अशाच ठिकाणाहून मग एखाद्या सरितेचा उगम होतो. जन्म होतो. हीच नदी पुढे मग असंख्य सजीवसृष्टीला वाढवत आपला प्रवास करत असते. वर्षा ऋतुत चिखलद-यात आलेल्या पर्यटकाचं प्रमुख आकर्षण असतं ते “भिमकुंडाचं देणं”.
सातपुडा पर्वतराजीतील असेच एक ऊंच ठिकाण म्हणजे चिखलदरा होय.विदर्भाचं नंदनवन म्हणून ते अख्या महाराष्टभर सुपरिचीत आहे.सातपुडयाच्या विस्तीर्ण रांगा येथून दिसतात. धामणगावगढी मार्गाने चिखलद-याच्या अलीकडे सात-आठ किलोमीटर अंतरावर पाण्याचा असाच एक प्रचंड उत्पात दिसतो. तो म्हणजे भिमकुंड होय. इंग्रजी व्ही आकाराच्या पर्वतावरुन कोसळणारा भिमकुंड नावाचा जलप्रपात निसर्गसृष्टीला एक अलौकिक सौंदर्य प्राप्त करुन देतो. हिरव्या खो-यात ऊफाळून आलेलं हे पांढरं चैतन्य येथे भेट देणा-या पर्यटकांना आकर्षित करते.अबोल करुन टाकते.त्यातही धबधब्यावर पांघरलेलं ढगं रानवा-याच्या एखाद्या झुळकीमुळं अलगद दूर होवू लागतात आणि भिमकुंडच्या धबधब्याचं स्वर्गीय रुप दिसू लागतं. ते दृश्य पाहणा-याच्या मनाला अनामिक उर्जा देत असते. मेळघाटच्या पावसाळी भटकंतीत निसर्गाची अशी अनंत रुपं ब-याच ठिकाणी पहायला मिळतात. मी ते वेळोवेळी अनुभवत असतो.
चिखलदराजवळच्या या भिमकुंडाला ऐतिहासिक आख्यायिकाही आहे ती म्हणजे पांडव जेव्हा येथील विराट राजाच्या वैराट नगरीत राहत होते. तेव्हा किचकाची वाईट नजर द्रौपदीवर पडली. संतापलेल्या भिमाने किचकाचा वध करुन त्याला एका दरीत फेकले ही दरी म्हणजे किचकदरी म्हणजेच आजचा चिखलदरा होय.आणि किचकाच्या वधाने भरलेले हात ज्या कुंडात भिमाने धुतले तोच हा भिमकुंड होय.
जीवनाचं दुसरं नाव संघर्ष आहे.जसं दु:खाशिवाय सुखाला महत्व नाही तसं संघर्षाशिवाय जीवन नाही. तरच त्या जीवनात अर्थ असतो. अन्यथा ते साचलेल्या डबक्यासारखं होवून जाते. सृष्टी आपल्याला हे प्रत्येक ऋतुत हरगडीला शिकवित असते.
वसंत,ग्रीष्म,वर्षा,शरद,हेमंत,शिशिर या सहा ऋतुत ते आपल्याला अनुभवता येतं. मात्र त्यात समरस होता आलं पाहिजे.नव्हे ते शिकलं पाहिजे.कारण आपणही निसर्गाचाच एक घटक आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.शरदात फुलांचा उत्सव सुरु होतो. हेमंतात फळांचा बहर दिसून येतो आणि शिशिर पुन्हा आपली पावलं सृष्टीवर टाकून केशसंभार उतरवतो. पानगळीला सुरुवात होते. ती असते वसंत ऋतुच्या नवअंकुरांसाठी. वसंत पालवीनंतर येणारी फुलं,फळं त्यानंतर ग्रीष्मात झालेली पानगळ सृष्टीला बोडखं करुन रानावनाला समाधीस्त करुन टाकते. त्यानंतर उन्हामुळे तप्त झालेली सृष्टी वर्षाधारांनी न्हावून निघते आणि पुन्हा हिरवं लेणं लेवून बसते.असं हे ऋतुचक्र जीवनाचा अर्थ सांगत असते नव्हे जीवन जगायला बळ देत असते. ते असतं पर्यटकांचं प्रमुख आकर्षण असलेलं सातपुडयातील वर्षा ऋतुतील “भिमकुंडाचं लेणं”.
No comments:
Post a Comment