नाशिक जिल्ह्यातील शेरपाडा प्राथमिक शाळेत पोहोचण्यासाठी कश्यपी नदी ओलांडावी लागते. पावसाळ्यात पुरामुळे नदी पार करणे अशक्य होते. या परिस्थितीत स्वाती वानखेडे यांनी स्वत: पुढाकार घेत ट्रॅक्टरच्या टायरवर फळी टाकून शाळेत जाणे सुरु केले. याच पद्धतीने त्या पहिली ते चौथीच्या सुमारे ५० ते ६० मुलांना शाळेत घेऊन येत असत. मागील वर्षी रोटरी क्लबने त्यांना एक बोट उपलब्ध करुन दिली. तर शासनाने आता तेथे पूलही उभारला आहे. त्यांच्या या कार्याची दखल न्युझीलंड येथील कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग या संस्थेने घेतली आणि २००४ मध्ये वानखेडे यांचा एक्सलेन्स अवार्ड देऊन गौरव केला.
मूळच्या पुणे जिल्ह्यातील असलेल्या स्वाती वानखेडे गेल्या वीस वर्षापासून अतिदुर्गम आदिवासी भागात मुलींना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून झटत आहेत. त्या शेरपाडा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत १६ वर्षे व गेल्या वर्षभरापासून नाशिक जवळील तिरडशेत शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून काम करीत आहेत. शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत पाड्यांवरील स्त्रिया व पालकांमध्ये मिसळून त्या शिक्षणाचे महत्व सांगतात. यामुळे या दोन्ही गावात शाळेतील मुलींच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
स्वाती वानखेडे वर्षभर शैक्षणिक जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवितात. त्यात अक्षरगुढी उभारणे, अक्षर मंदिर, अक्षर दिंडी व आदिवासी माती मैत्री यांचा समावेश आहे. त्यांच्या या धडपडीला मिळालेले यशही वाखाणण्याजोगे आहे. शेरपाडा येथील शाळेला शासनाने आदर्श शाळा म्हणून गौरविले आहे. येथे त्यांनी स्वअध्ययन खोली सुरु केली, त्यामुळे मुलींची संख्याही बारावरुन पंचवीसवर पोहोचली आहे. तिरडशेत येथेही याच पद्धतीने मुलींना शिक्षणाकडे वळविण्यात त्यांना यश आले आहे. त्याचबरोबर मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यावर वानखेडे यांचा भर आहे. अनेक पाड्यांवर त्यांना लहान मुलांना शिक्षणाचे धडे देण्यापूर्वी स्वच्छतेचे महत्व पटवून द्यावे लागले. त्यासाठी त्यांनी मुलांना दात घासून देण्याचे, नदीवर नेऊन आंघोळ घालण्याचे कामही केले आहे.
आदिवासी महिलांसाठी त्या ८ सप्टेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत वर्ग भरवितात. यात शिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रति आठवडा २५/- रुपये दिले जातात. तर या महिलांना शिकविण्याची जबाबदारी उचलणाऱ्या इयत्ता १० वी मधील विद्यार्थिनींना १००/- रुपये मानधन दिले जाते. त्यांचा हा उपक्रम सध्या पाड्यांवर सुरु असून लवकरच तो त्यांच्या सावित्रीबाई फाऊडेशन या संस्थेच्या माध्यमातून १५० गावात राबविला जाणार आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श घेत त्यांच्या विद्यार्थिनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षिका म्हणून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत.
शिक्षणासोबतच आदिवासी माता आरोग्य, व्यवसायामुळे उद्भवणारे आजार याबाबतही स्वाती वानखेडे प्रबोधन करतात. मुलींचे घटणारे प्रमाण लक्षात घेऊन त्याबाबतही त्या जनजागृती करीत आहेत. त्यासाठी मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी त्या 'कन्या औंक्षण उपक्रम' राबवितात.
आधुनिक सावित्रीच्या या कार्याचा आदर्श सर्वांनी घेतला तर साक्षरतेचे प्रमाण निश्चितच वाढेल. प्रत्येकाने किमान एक आदिवासी महिला वा तरुणास सुशिक्षित करण्याचा मानस केला तर, या सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी शासन करीत असलेल्या प्रयत्नांना यश येऊन या आधुनिक सावित्रीचे स्वप्नही साकार होईल यात शंका नाही.
No comments:
Post a Comment