बुलडाणा जिल्हयाच्या मोताळा तालुक्यतील खरबडी गावात मुलगी जन्माला आली की, तिच्या नावे एक हजार रुपयाचा बॉन्ड फिक्स करण्याचा अनोखा निर्णय या ग्रामपंचायतीने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे.
खरबडी ग्रामपंचायतीकडून गेल्या वर्षभरापासून विविधउपक्रम राबविणे सुरु आहेत. ग्रामपंचायतीच्या पदाधिका-यांना ड्रेसकोड लागू करणारी जिल्हयातील ही पहिली ग्रामपंचायत ठरलेली आहे. संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम, पर्यावरण संतुलीत ग्राम समृध्दी योजनेला या गावाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. गावातील प्रत्येक कुटंबाला एक फळझाड वाटप व ऑक्सीजन पार्क असे विविध उपक्रम गाव राबवित आहे.
आता मुलींच्या जन्माचे स्वागत करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. तसा ठरावही ग्रामपंचातीच्या पदाधिका-यांनी सर्वसंमतीने घेतला आहे. गावात मुलगी जन्माला येताच तीच्या नावे एक हजार रुपये बॅकेत फिक्स करण्याचा हा उपक्रम आहे. यामुळे मुलींचा जन्मदर वाढण्यास मदत होईल. जिल्हयात लेक माझी अभियान सुरु असून या अभियानालाही खरबडी ग्रामपंचायतीच्या अभिनव उपक्रमामुळे हातभार लागणार आहे.
जिल्हयात मुलींचा जन्मदर बराच खालावला असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळें सर्वत्र मुलीच्या जन्मदराची चर्चा होत आहे. वास्तविक या मुद्यावर सकारात्मक काम हाती घेण्याची गरज आहे. इतरांपेक्षा खरबडी ग्रामपंचातीने केवळ चर्चा न करता कृतीतून आपले कार्य सुरु केले आहे. त्यातूनच हा आगळा-वेगळा उपक्रम पुढे आला आहे.
अशाचप्रकारे जिल्हयातील इतर ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेण्याची गरज आहे. खरबडी येथे उपक्रम राबविण्यासाठी सरपंच पुष्पा सोळंके, उपसरपंच उषा किनगे, सदस्य सुपडा राणे, रमेश राणे, सोनल पुरकर, अंजना इंगळे, लता इंगळे, गणेश किनगे, सोप्नील नाफडे, ग्रामसेविका छाया बशिरे यांनी पुढाकार घेतला.
No comments:
Post a Comment