Wednesday, September 14, 2011

ज्योतीने साकारला कोसा उद्योग

बचतगट हा महिलांच्या विकासाला दिशा देणारा शब्द. बचतगटामुळे महिलांची संघटनशक्ती ही मजबूत होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना बचत ते स्वावलंबनाचे धडे बचतगटामुळे मिळू लागले आहे. त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांचा विकास घडून येत आहे. कौतुकाची थाप पडली अन् सहकार्याचा हात पुढे केला तर महिलांच्या प्रगतीला भरारी येते. हे बचतगटाने दाखवून दिले आहे.

भंडारा जिल्हयातील साकोली तालुक्‍यामधील ब्राम्हणटोला नावाचं ८०० लोकवस्तीचं गाव. गावातील असंघटीत व कष्टकरी दारिद्रय रेषेखाली जीवन जगणाऱ्या १५ महिलांनी एकत्र येवून श्रध्दा बचतगटाची स्थापना केली. राष्ट्रीय सम विकास योजनेअंतर्गत या महिलांना स्वबळावर उभे राहण्याचा हात देण्यात आला.

बचतगटातील ज्योती नामक महिलेने सुरुवातीला शिवणकाम व्यवसाय सुरु केला. तेव्हा कृषी विभागाकडून कोसा व्यवसायाची माहिती मिळाली. या व्यवसायासाठी गुंतवणूक आणि मिळणारे उत्पन्न लक्षात घेता कोसा उत्पादनासाठी ज्योतीने मानसिकता तयार केली.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने कोसा तयार करण्याचे अळीचे अंडे आणून घरीच किडे संगोपनाला सुरुवात केली. अळयापासून कोसा बनविण्यासाठी घरीच एक शेड तयार करुन कीडयांची देखभाल करण्यात आली. या कीडयांपासून तयार झालेला कोसा कृषी विभागाला दिला.

१० हजार रुपयांच्या कोसाच्या उत्पादनातून ४ ते ५ हजार रुपयांचा निव्वळ नफा ज्योतीबाईला झाला. कुटूंबाच्या अर्थोत्पादनात ज्योतीबाईने हात दिला. बचतगट स्थापन्यापूर्वी कुटूंबाच्या अडीअडचणीच्या कामात इतरांकडून ८ ते २० टक्के व्याज दराने पैसा घ्यावा लागत होता. मात्र बचतगटातील अल्प व्याजदरामुळे वैयक्तिक व कौटुंबिक अडचणी सोडविण्यास मदत होत आहे. श्रध्दा बचतगटातील सदस्य झाल्यामुळेच ज्योतीला स्वावलंबनाचा मार्ग सापडला एवढं मात्र निश्चित.

No comments:

Post a Comment