मी सौ. छाया प्रमोद थुल, हिन्दनगर, वर्धा येथील तपस्वी स्वंय सहाय्यता बचत गटाची सचिव म्हणून कार्य करीत आहे. गोडेगाव या छोट्याश्या गावात वास्तव्यास असणारे माझे कुटुंब, माझे वडील सांभाजी ढाले, आमची परिस्थिती फार गरीबीची होती. आमच्या कुटुंबात एकूण आठ सभासद आहेत, त्यात दोन भाऊ, चार बहिणी, मी तीन नंबरची मुलगी आहे.
माझे लग्न हिंगणघाट या गावी प्रमोद थुल यांच्याशी झाले. माझ्या सासरची परिस्थिती फार हलाखीची होती. लग्न झाल्यानंतर काही दिवसातच सासुरवास सुरु झाला. सोबत पतीही छळ करु लागले. माहेरचे स्वातंत्र्य हे काही दिवसातच संपले असे जाणवू लागले. घरातील मंडळी बाहेर कुठेही जाण्यास मनाई करायची, पती दारु पिऊन मला शिवीगाळ करायचे, मारायचे, टोचून बोलायचे, वाद करायचे ही रोजची दिनचर्या झाली होती. त्यामुळे माझी मानसिकता ढासळायला लागली. मला एक मुलगी आहे. मुलगी चार वर्षाची होईपर्यंत बराच त्रास सहन करावा लागला. परंतु आता आपल्या मुलीला भरपूर शिकवायचे आहे, हे माझे स्वप्न होते. त्या करीता पतीची साथ असणे गरजेचे होते. परंतु आपणच काही तरी काम करावे, म्हणून मी मुलीला घेवून हिंगणघाट वरुन वर्धा हिंदनगर येथे राहण्यास आली. मनात एक जिद्द होती की,आपल्या मुलीला चांगले शिक्षण द्यायचे.
एक दिवस मी माझ्या शेजारी राहणारी पवित्रा पाटील यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घरी ब-याच महिला एकत्रित आलेल्या होत्या. माविमच्या सहयोगीनी महिलांना गटाची संकल्पना व माहिती सांगत होत्या आणि मी ते लक्ष देवून ऐकत होते. नंतर मी सहयोगीनीला विचारले की, मला सुध्दा गटात येण्याची इच्छा आहे. सहयोगीनीताई यांनी मला लगेच गटात समाविष्ट केले व गटातील सचिव या पदाची जबाबदारी मला देण्यात आली.
नविन काही तरी शिकायला मिळणार ह्याच उद्देशाने मी होकार दिला व पुढाकार घेण्यास तयार झाले. माविम च्या सहयोगीनी यांच्या मार्गदर्शनाने मी बँकेचे व्यवहार उत्तमरित्या शिकली. यातून माझा आत्मविश्वास वाढला. गटाचे हिशेब बघणे व इतरही कामे करु लागली.
मी लग्नापूर्वी शिवणकाम कोर्स केलेला होता. शिवणकाम मला चांगल्या प्रकारे येत होते. मी गटाकडून कमी व्याज दराने कर्ज घेतले व शिलाई मशिन खरेदी करुन शिवणकाम सुरु केले. आता माझा शिवणकामाचा उद्योग चांगल्या प्रकारे सुरु आहे. उद्योगामुळे मला पैसे मिळू लागले आणि घरच्या परिस्थितीत सुधारणा होऊ लागली.
त्यामुळे माझे पती व इतर सासरतील मंडळीचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदललेला आहे. माझ्या मुलीला चांगल्या शाळेत पाठवू शकले. त्याच प्रमाणे घर खर्चात हातभार लावीत आहे. बचतगटामुळेच माझा शिवणकलेचा उद्योग भरभराटीस आला. त्यामुळे माविम व सहयोगिनींचे मनापासून आभार मानते. बचतगटाने दाखविलेले आशेचे किरण, कष्टानेच वळविले माझे जीवन.
No comments:
Post a Comment