गडचिरोली जिल्ह्याची दर हेक्टरी भात पिकाची उत्पादकता इतर जिल्ह्याच्या तुलनेत फारच कमी आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड न देता पारंपरिक पध्दतीचा अवलंब करणे होय. या बाबीचा विचार करुन सुधारित लागवड तंत्राचा वापर केल्यास भात पिकाची सरासरी उत्पादकता वाढविण्यास मदत होईल. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कृषि विभागामार्फत सन २००९-२०१० या वर्षी आत्मा अंतर्गत भात पिक प्रात्याक्षिकामध्ये चारसुत्री पध्दतीने भात पिकाची लागवड करुन भात पिकाखालील उत्पादन वाढविण्याकरीता काही शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्याक्षिके आयोजित करण्यात आली. त्याकरीता कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी चांदाळा येथे सभा आयोजित केली. शेतकऱ्यांशी संपर्क करुन त्यांना चारसुत्री पध्दतीने भात पिकांची लागवड कशी करावयाची हे पटवून दिले.
त्यांनी दिलेल्या माहितीने प्रभावीत होऊन चारसुत्री पध्दतीचा अवलंब करण्याचा मानस शेतकऱ्यांनी व्यक्त केला. त्यानंतर प्रात्याक्षिक लाभार्थी म्हणून गावातील काही शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. तांत्रिक माहितीचा अवलंब करुन ०.४० हेक्टर क्षेत्रावर भात लागवड केली गेली.
भात लागवडीखालील चार सुत्रापैकी पहिले सुत्र म्हणजे भात पिकांच्या अवशेषाचा फेरवापर होय. या सुत्रानुसार साठवून ठेवलेल्या भाताचा तुस व पेंढा जाळून त्यांची राख गादीवाफ्यासाठी वापरण्यात आली. त्यामुळे रोपांची वाढ चांगली झाली. तसेच साठवून ठेवलेली तणस नांगरणी करुन शेतजमिनीत गाडली. अशाप्रकारे उपलब्ध असलेल्या भातपिकाच्या अवशेषाचा पुनर्वापर केला.
चारसुत्रीपैकी दुसरे सुत्र म्हणजे हिरवळीच्या खताचा वापर होय. गावातील शेतकऱ्यांनी शेतातील बांधावर गिरीपुष्पाची लागवड केलेली आहे. हे झाड बहुवार्षिक असल्यामुळे दरवर्षी या झाडापासून हिरवा पाला सहज मिळतो. चिखलणीपूर्वी गिरीपुष्पाची झाडे जमिनीपासून दोन फुटावर छाटली गेली व फांद्या छाटून त्या खचरामध्ये पसरविल्या गेल्या. चिखलणीच्या वेळी या फांद्या जमिनीत गाडून संपूर्ण क्षेत्राची चांगली चिखलणी करुन घेतली गेली. नंतर रोवणीपूर्वी चिखलातील संपूर्ण पाणी काढून घेतले. नंतर दुसऱ्या दिवशी रोवणी करण्याकरीता २५x२५ से. मी. अंतरावर मार्गदर्शक दोरीच्या आधाराने फुलीचे चिन्ह करुन त्यावर रोपे अलगद ठेवली. लगेच युरिया ब्रिकेट रोवून घेतल्या.
अशाप्रकारे नियंत्रित लागवड आणि युरिया ब्रिकेटचा वापर हे दोन सुत्रं शेतकऱ्यांनी अवलंबिली. २४ तासानंतर रोपे चिखलात स्थिर झाली. त्यानंतर फक्त हलके ओलित केले. शेतात पाणी साचू दिले नाही. पाणी साचले नसल्यामुळे निंदण अधिक झाले व त्यावरील खर्च वाचला. मात्र एका चुडातील एका रोपास २५ ते ३० फुटाचे ओलित केल्यामुळे पिकांची वाढ उत्तम प्रकारे झाली.
एक एकरात सुवर्णा जातीचे १०.३० क्विंटल धान झाले व त्याच जातीचे पारंपारिक पध्दतीने लागवड केलेले धान ८ क्विंटल झाले. एकंदरीत काय तर शेतकऱ्याला परवडणारी कमी भांडवलाची पण हेक्टरी जास्तीत जास्त उत्पादन देणारी चारसुत्री भातशेती तंत्रज्ञान अनमोल देणं आहे.
No comments:
Post a Comment