सांगली शहरापासून आटपाडी गाव १०० कि. मी. असून या तालुक्यातील टोकावर पडळकरवाडी गाव वसले आहे. पडळकरवाडी जेमतेम १०० उबंऱ्यांची मेंढपाळांची वाडी होय. पण या वाडीतून अफलातून हिरे निर्माण होऊन बाहेर पडू लागले आहेत. मेंढपाळांच्या या वाडीने एक नाही, दोन नाही तर तब्बल तीस डॉक्टर जन्माला घातले आहेत. ते आज वैद्यकीय क्षेत्रात तज्ञ व नामवंत म्हणून नावारुपास आले आहेत. राज्यातील मोठ्मोठ्या शहरातील दवाखान्यात ते सेवा करीत आहेत. यामुळे डॉक्टरांची वाडी अशीच ओळख पडळकरवाडीची होऊ लागली आहे.
पडळकरवाडी तशी साधीच. जेमतेम ५९५ लोकसंख्या. प्रत्येकाचा मेंढपाळीचा व्यवसाय. घरात मेंढपाळीचा पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे अज्ञान, दारिद्र्य व अशिक्षितपणाचे वातावरण होते. प्रत्येकाच्या दारात मेंढ्याची वागर, कुत्री, घोडी बांधलेली अशी ही वाडी म्हणजे साक्षात तात्याची बनगरवाडीच होय.
आज या वाडीने पूर्णपणे ओळख बदलली आहे. वाडीत एकेकाळी शिक्षक नाही, बस, वीज, पाणी, निवारा नाही असा एक काळ होता. पण आज या तात्याच्या बनगरवाडीचा इतिहास बदलला आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील डोंगराळ भागातील वाडीने आज तीस डॉक्टर निर्माण केले आहेत. एम.बी.बी.एस.पर्यंत शिक्षण घेऊन काही डॉक्टर तर काहींनी एम.डी. पर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तसेच काही जण विविध विषयांमध्ये विशेष तज्ञ झाले आहेत. पंढरपूर, सांगली, मिरज, पुणे, मुंबई या शहरांबरोबरच आटपाडी व झरे येथेही मोठमोठे दवाखाने उभारुन या व्यक्ती लोकांची चांगल्याप्रकारे सेवा करत असल्याचे चित्र दिसत आहे.
काही डॉक्टर रुबी, के.ई.एम. येथे तर काही सांगली जिल्हा रुग्णालयात कार्यरत आहेत. एकाने तर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत. एक जण तर कॉलेजचे प्राचार्य पद भूषवत आहे. विशेष म्हणजे या सर्वांचे पालक मेंढपाळी करत होते. काहींचे पालक आजही मेंढपाळ व्यवसाय करतात.
या गावातील पहिले डॉक्टर उत्तम पडळकर हे आटपाडी ग्रामीण रुग्णालयात आज सेवा करतात. त्यांचा आदर्श समोर ठेवून वाडीतील युवकांनी वाटचाल सुरु ठेवली आहे. उत्तम पडळकर यांच्यामुळे वाडीतील प्रत्येक मेंढपाळ चालकाने आपल्या मुलाला डॉक्टर बनविण्याची शपथ घेतली व यासाठी त्यांनी प्रसंगी मेंढ्या तर कधी शेताचा तुकडाही विकला. परंतु मुलं ही तशीच कर्तबगार व पात्रतेची निघाली. यामुळेच आज या गावची डॉक्टरांची यादी तीसवर गेली आहे.
जरी गावातील युवक डॉक्टर बनले असले तरी प्रत्येक डॉक्टरचा ओढा पडवळवाडीकडे कायम राहिला आहे. डॉक्टर बरोबरच एकजण पोलीस निरीक्षक, काही शिक्षक तर एक जण आय.आय.टी. मध्येही गेला आहे. शिक्षणाची गंगा या गावात अशीच सुरु राहील यात शंका नाही.
No comments:
Post a Comment