परभणीच्या मराठवाडा कृषी विद्यापीठाने शेतक-यांच्या हितासाठी विकसित केलेले नवीन तंत्रज्ञान, पीक प्रात्यक्षिक तसेच बिजोत्पादन प्रक्षेत्राला भेट देण्याचा योग आला. नेहमीप्रमाणे दिवसाची सुरुवात झाली असली तरी सकाळी ९.३० च्या दरम्यान कृषी विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करताच मन प्रफुल्लीत झाले. प्रवेश द्वाराजवळच असलेल्या कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्रात प्रवेश केला आणि शेतीसंबधीची माहिती देणारी विविध पोस्टर्स आणि कडधान्य तसेच इतर पिकांची बियाणे नजरेस पडली. विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आर. बी. काळे स्वागतासाठी हजर होते. मी तसेच जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी, दूरचित्रवाणी माध्यमांचे प्रतिनिधी सर्व हळूहळू एकत्र झाले.
स्वागत कक्षामध्ये अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. सभागृहाच्या मध्यभागी साकारण्यात आलेल्या शेती तंत्रज्ञानाच्या मॉडेलमध्ये पृथ्वीच्या संरक्षणाचा देखावा उभारण्यात आला होता. मग सर्वांचा मोर्चा टच स्क्रीन सुविधा केंद्राकडे वळला. येथे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद गोरे यांनी टच स्क्रीन उपकरणाबद्दल माहिती दिली. विद्यापीठातर्फे नव्यानेच विकसित करण्यात आलेल्या या उपकरणाचा फायदा शेतक-याला प्रत्यक्षात घेता येतो. शेतीसंबंधात पाहिजे ती माहिती या उपकरणात मराठीत समाविष्ठ करण्यात आली आहे. बँकेच्या ‘एटीएम’ मशीनसारखे हे उपकरण असून खते, बियाणे, पिकांवरील विविध रोग, किटकनाशक, पिकांची माहिती, भाजीपाला, फलोत्पादन, फुलशेती, तृणधान्य आदींवर बोटाने स्पर्श केला तर लगेच संबंधित माहिती डोळ्यासमोर येते. ही मशीन इतरही ठिकाणी लावण्याचा विद्यापीठाचा मानस असून यात आवाजाची सुविधा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यानंतर विद्यापीठाने संपूर्ण परिसर आणि पीक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी वाहन उपलब्ध करून दिले होते. दोन्ही बाजूला असलेल्या हिरव्यागार शेतातून गाडी समोर जात होती. काही अंतर पार केल्यानंतर मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांनी पीक प्रात्यक्षिक आणि पीक उत्पादन तंत्रज्ञानाबाबत माहिती दिली. विद्यापीठाच्या २६ हेक्टर जागेमध्ये विविध संशोधन केंद्र उभारण्यात आले असून यासाठी ९ ब्लॉक तयार करण्यात आले आहे. यात कापूस संशोधन केंद्र, ज्वारी संशोधन केंद्र, करडी संशोधन केंद्राचा समावेश असून येथे वेगवेगळ्या प्रयोगशाळासुध्दा विकसित करण्यावर भर असल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या सहाय्याने विशेष पीक संरक्षण मोहीम आणि ‘विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्याला सरासरी चार दिवस याप्रमाणे विद्यापीठातील शास्त्रज्ञ पिकांवरील रोग, किडींचा प्रादुर्भाव, किटकनाशक आदींबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करीत आहेत. शेतावर जावून शेतक-यांच्या अडचणी सोडविण्यात येत असल्याने शेतकरी समाधानी असल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले.
कपाशीच्या शेतात प्रवेश करताच एक-दीड फूट उंचीच्या कपाशीला चांगलीच बोंडे लागलेली आढळली. यात एन एच ६१५ (अनुसया), एन एच ४५४, पी एच ३४८ (यमुना), पी ए २५५ (परभणी तुराब) आदी वाणांबाबत माहिती देण्यात आली. यानंतर काही अंतरावर असलेल्या ज्वारीच्या पिकांकडे लक्ष गेले. येथे डॉ. चव्हाण यांनी ज्वारी वाणांबाबत माहिती दिली. सात-आठ फूट उंचीचे ज्वारीचे पीक आणि सभोवताली असलेल्या काळ्या मातीचा स्पर्श एक वेगळाच अनुभव होता. सी. एस. एच. -२५ (परभणी साईनाथ) या वाणामुळे दाणे आणि कडबा यांचे अधिक उत्पादन येत असून भाकरीची प्रतही उत्तम आहे. या वाणापासून प्रति हेक्टर ४२-४५ क्विंटल धान्य तर १०५-११० क्विंटल कडबा तयार होत असल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
यानंतर सोयाबीनच्या शेतात प्रवेश करताच एमएयूएस-४७ परभणी सोना या वाणाची उगवण क्षमता जाणवली. हे वाण आंतरपिकास तसेच दुबार पिकास योग्य असून पाने गुंडाळणारी अळी, खोडमाशी व पाने खाणा-या अळीस प्रतिकारक आहे. यावेळी एमएयूएस – ६१ प्रतिकार, एमएयूएस -६१-२ प्रतिष्ठा, एमएयूएस – ७१ समृध्दी, एमएयूएस – ८१ शक्ती, एमएयूएस – १५८, एमएयूएस – १६२ पूर्व प्रसारीत वाण यांची माहिती देण्यात आली. विविध पीक क्षेत्राची पाहणी केल्यानंतर बिजोत्पादन क्षेत्र, फलोत्पादन प्रक्षेत्र, कापूस संशोधन केंद्र, कृषी विद्या विभाग, अनुभवातून शिक्षण पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय केंद्र आदींबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली. दुग्ध व्यवसाय केंद्रात दुधाचे शुध्दीकरण, त्यापासून खव्याची निर्मिती, पनीर बनविण्याचे यंत्र आदी गोष्टी डॉ. मिटकरी यांनी समजावून सांगितल्या. तेथील सुगंधी दुधाची चव अजूनही जिभेवर तरंगत आहे.
संपूर्ण कृषी विद्यापीठाचा परीसर तीन – चार तासात पाहिल्यानंतर येथील विश्रामगृहात कुलगुरू डॉ. के. पी. गोरे यांच्यासोबत भोजनाच्या आस्वादासोबतच कृषी संबंधात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. काळ्या मातीत हिरव्या शेतासाठी विद्यापीठाने विकसीत केलेले नवीन तंत्रज्ञान बळीराज्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रत्येकाचे म्हणणे होते.
No comments:
Post a Comment