Wednesday, September 14, 2011

मामाचं गाव

“ झुक झुक… झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहू या ” कोकणातील गावांचे रास्त वर्णन कवितेतील या ओळीतून केले आहे. या काव्यपंक्तीमुळे ग्रामीण लोक जीवन शेती व्यवसाय आणि बदलते ऋतुचक्र आणि बदलत्या काळानुसार गावा-गावात एकतेतून साकारलले बदल आज सर्वांना भावतात.वाढत्या शहरीकरणामुळे आजची खेडी बरी म्हणण्याची वेळ आली आहे.

शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात शासनामार्फत नागरी सुविधा पुरविण्यात येत आहेत. गावा-गावात स्त्री-पुरुष यातील समतेचा विचार मान्य करीत स्वच्छतेतून समृध्दीकडे वाटचाल करीत असलेले गावकरी, असे चित्र आजच्या समाजासमोर उभे करण्यात आले आहे. पूर्वीचे मामाचे गाव आणि आताचे गाव स्वच्छतेतून, समानतेतून, एकतेतून एकत्र आलेले आहे.

गाव म्हटले की, आपल्या समोर साधी राहणी, सरळ स्वभाव, कष्टाळू जीवन जगणारी माणसे असे चित्र डोळयासमोर उभे राहते. आज खेडी विकासासाठी शासनामार्फत ग्रामपंचायतीला जादा अधिकारदेण्यात आले आहे. राज्यभर ग्रामस्वच्छता अभियान, निर्मळ ग्राम योजना, स्वच्छ पाणी पुरवठा, आरोग्य शिक्षण, रोजगार हमी योजना, कृषि क्षेत्रातील रोजगार स्वयंरोजगार इत्यादी योजना गाव विकासासाठी राबविण्यात येत आहेत. या विकास कार्यात एकटा राव काहीही करु शकणार नाही, तर एकतेतून, सहभागातून गावकरी करु शकतील म्हणून ‘गाव करील ते राव काय करील’ अशी म्हण प्रचलीत आहे. गावाच्या विकासाला एकतेतून आणि लोकसहभागातून गाव विकास स्पर्धेची गती मिळाली आहे. शहरांपेक्षा खेडी सुरक्षेच्या दृष्टीने श्रेष्ठ व सरस ठरत आहे. एकमेकांविषयी आपुलकी व माणुसकी जोपासणारी माणसे गावातच पहायला मिळतात. शहरातले जीवन अत्यंत दगदगीचे व एकलकोंडीपणाचे आहे. गाव व शहर यातील फरक पाहिल्यास गडया आपला गाव भला असेच म्हणावे लागेल.


पूर्वी गावात धनीक वर्गाकडे एकाधिकार होते.ती पध्दत मोडीत निघाली. गावातील ग्रामपंचायतीला ग्राम सभेचा दर्जा प्राप्त झाला. विविध जाती धर्मातील स्त्री पुरुष यातील भेदभाव, जातपात हे विसरुन सर्वांनाच समानतेचा हक्क मिळाला आहे. यामुळे गावाच्या सर्वागीण विकासासाठी सरपंच पदाचे अधिकार दुर्बल घटकातील महिलांना मिळत गेले. गावातील सामान्य नागरिकांनासुध्दा मान सन्मानाची वागणूक लोकशाही पध्दतीमुळे मिळत आहे. महिलांच्या पुढाकारामुळे बचतगट स्थापनेस प्रोत्साहन मिळाले आहे. या महिला बचतगटाच्या माध्यमातून गावातील दारुबंदी सारखे विधायक कार्य महिलांच्या हातून होत आहेत. एकेकाळी महिलांच्या हातात पाळण्याची दोरी होती. आता महिलांना सरपंच पदाचे अधिकार प्राप्त झाल्याने राष्ट्रध्वज फडकविण्याची दोरी महिलांच्या हातात आली आहे. महिला सरपंचाच्या अधिकारात ग्राम सभा भरवली जाते. त्यावेळी महिला बचतगटाचे मार्गदर्शनही घेतले जाते. महिलांना कुटुंबात पैसा संचय करण्याचा अधिकार बचत गटाच्या माध्यमातून मिळाला आहे. यामुळे महिलांची समाजात आर्थिक पत निर्माण झालेली आहे. गावातील महिला बचत गटामुळे आर्थिक लाभ तर मिळतोच. पण समाजात पत निर्मितीसाठी पैश्याचा संच करण्याचा अधिकारही बचत गटाद्वारे मिळालेला आहे. या बचत गटाद्वारे महिलांना आपल्या संसारात हातभार लावण्याची संधी मिळाल्याने कुटुंबातील तिचा दर्जा वाढलेला आहे.

मामाच्या गावात बागायदार शेतकरी, कोरडवाहू शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी यांच्या शेतीमाल उत्पादनाची आर्थिक दरी कमी करण्याच्या हेतूने शासनाने कृषि खात्याच्यामार्फत सवलतीच्या दराने शेतक-यांना खते व बी बीयाणे पुरविणे, जवाहर विहिरी, फळझाडे लागवड, पडिक क्षेत्रात वृक्ष लागवड, कृषि सिंचन योजना पीक-औषधे आदि सवलतीच्या दरात पुरविली जाते. त्याचबरोबर उत्तम आरोग्य गावक-यांना लाभावे यासाठी लोकसहभागातून शासनाच्या स्वच्छ पाणीपुरवठा योजनेचा लाभ मिळत आहे. ग्रामपंचायतीद्वारे गावातील रस्ते, रस्त्यावरील दिवाबत्ती, घरातील सांडपाणी व्यवस्था आदी नागरी सुविधा गावक-यांना मिळाल्या आहेत. ग्रामस्थांचा शेती व्यवसाय असल्याने शेतीला पूरक असा पशुपालन व्यवसाय जोड भाजीपाला, दुधविक्रेता, फळविक्रेता आणि बारा बलुतेदारारीतील कामे व्यवाय रुपाने लोकांनाही रोजगार स्वयंरोजगाराच्या सोयी उपलब्ध झालेल्या आहेत. गावात नागरिकांच्या सोयीसाठी ग्रामसेवक, तलाठी, कार्यालये स्थापन्यात आल्यामुळे गावातल्या गावातच शेती आणि घराची कागदपत्रे प्राप्त करुन देण्याची सोय शासनाने केली आहे. गाव तिथे शाळा या शासनाच्या धोरणानुसार गावातील लोकसंख्येच्या आधारावर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेची सोय झाल्यामुळे ग्रामस्थांच्या पाल्यांना शिक्षणासाठी गावाबाहेर जावे लागत नाही. गावातील दुर्बल घटकांच्या
पाल्यांना शिक्षणाच्या सवलती शिक्षणाच्या सवलती, शिष्यवृत्ती गावातच मिळत आहेत. सामान्य विद्यार्थ्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी मागासवर्गीयांनासुध्दा समाज कल्याण खात्यामार्फत राज्यात व परदेशातील शिक्षण घेता यावे म्हणून शिष्यवृत्तीसारख्या योजना लागू केल्या आहेत. ग्रामीण मुली शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे.

एकात्मिक ग्रामविकास योजनेअंतर्गत शेतमजूरांना आपले छोटे-मोठे व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत देऊन कर्ज पुरवठा केला जातो. गावातील ग्रामसभेतून मंजूर झालेली रोजगार हमीची कामे गावातील काम करणा-यांना उपलब्ध करुन दिली जातात. यामुळे हाताला काम कामानुसार दाम उपलब्ध झालेला आहे.गावातील मजूरांना कामाच्या शोधात गावाबाहेर जाण्याची पाळी येत नाही. गावातील विविध समाजाचे धार्मिक सण एकत्रित येऊन साजरा केला जातो. यामुळे मामाचा गाव आता विकासातून समृध्दीकडे वाटचाल करीत आहे.

आदर्श गावकरी, आदर्श ग्रामपंचायत म्हणून पुढे येत आहेत. ही एक स्पर्धाच आहे की काय असे वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्गदर्शनाखाली गावातील घराघरात प्रसाधनगृहे बांधल्याने हगणदारी मुक्त गाव आणि गावातील रस्त्यांची स्वच्छता, रस्त्यालगत वृक्ष लागवड, लोकसंख्या नियंत्रण, आरोग्य प्रशिक्षण, आधुनिक शेती व्यवसाय प्रशिक्षण, गावातील पाणी टंचाई निवाणार्थ शिवकालीन पाणी साठवण योजना याद्वारे मार्गदर्शन व मदत दिली जाते. सभा, बैठका संबधी शासकीय खात्यामार्फत प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षित शेतकरी आधुनिक शेती व्यवसायाकडे अधिक उत्पादन काढण्यासाठी वळला आहे. रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या मार्फत गावातील सुशिक्षित बेरोजगारांना सेवा सोसायटयांच्या माध्यमातून दूध संकलन करणे, फळ, भाजीपाला विक्री, वीज देयक, शेतसारा, टेलीफोन बील, धान्य वाटप, सायकल दुरुस्ती, विद्युत मोटारी दुरुस्ती आदी कामे सेवा सोसायटयांच्या माध्यमांतून मिळाली असल्याने त्यांना रोजगार मिळाला आहे.

मामाच्या गावात संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, भूदान चळवळीचे समाजसुधारक विनोभा भावे यांच्या विचार धारेतून गावा गावात विकासाची समतेची नवी अनुभूती येत आहे. त्यातून मामाची गावे ख-या अर्थाने संपन्न आणि समृध्दीकडे वाटचाल करीत आहेत.

  • वि.प्र.साळुंके 
  • No comments:

    Post a Comment