फार दिवसांपासून माथेरानला भेट देण्याची अनिवार इच्छा होती. माथेरान पाहिले आणि तेथील निसर्गाचे चमत्कार पाहून अचंबित झालो होतो. पावसाळा नसल्यास नेरळ येथून छोटया आगगाडीने माथेरानला जाता येते. अथवा नेरळहून रस्तामार्गेही जाता येते. माथेरानला जाण्याचा दुसरा रस्ता पनवेलहून जातो. मी पनवेल मार्गे जाणं पसंत केलं. पनवेल एस टी स्टॅन्डवरुन कर्जतसाठी बसेस सुटतात. सकाळी सात वाजताच पनवेल गाठले. कर्जतला जाणारी बस सुटण्याच्या तयारीत होती. सकाळची वेळ आणि सुटीचा दिवस असल्याने बसमध्ये ब-यापैकी प्रवाशी होते. मला खिडकीतील जागा मिळाली. हमरस्त्यावरुन मात्र बसने वेग घेतला. पुढे रस्त्यावर दुतर्फा वनराई आणि भोवताली भात शेती यामुळे सर्वत्र हिरवेगार वातावरण बसने आता चांगला वेग घेतला होता आणि ती कर्जतकडे कुच करीत होती. सर्वत्र हिरवेगाव डोंगर आपले स्वागत करताना दिसतात.
कर्जतला उतरताच माथेरानला जाणारी बस दिसली. महामंडळाची बसही हिरव्या रंगाची. बसमध्ये बसताच नेरळमार्गे बस निघाली. अरुंद परंतु चांगले रस्ते आणि आजूबाजूला हिरव्यागार उंच पहाडांचे दर्शन दुर्मिळच. माथेरानचा चढ सुरु झाला तेव्हा निसर्गाची अवर्णनीय शोभा दिसत होती. डोंगराच्या कडेवरुन बस चढण चढत होती. बसचे स्वागत डोंगरावरुन रस्त्यावर येणारे लालसर पाणी करत होते. डोंगरावरुन वेगाने खाली येणारे पाणी डोळयांचे पारणे फेडीत होते. या पाण्याच्या पायघडयावरुन बसने एकदाचे माथेरान गाठले. प्रवेश तिकीट घेऊन पुढे चालत माथेरान प्रवास सुरु केला. मुळात हा परिसर इको सेन्सिटीव्ह म्हणून जाहिर केल्याने रस्ते नाहीत, आहे ती मोठी पायवाट. पावसाळयात पायवाट चिखलाने-पाण्याने माखलेली शिवाय लहान दगडाची होती. त्यावरुन मार्गक्रमण करीत असताना टांग्यासारख्या छोटया हातगाडीवरुन माणसांची ने आण करणा-या गाडया, घोडे आणि तुरळक पर्यटक आपल्याला दिसतात यामुळे परिसर निरव शांत जाणवत होता.
खडकळ चिखलाचा रस्ता, डोंगरावरुनखाली खळाळत वाहणारे पाणी, पानांची सळसळ मधून मधून, जोरात पडणारा पावसाचा शिडकारा आणि आजूबाजूला दाट धुके यामुळे केवळ दोन ठिकाणांनाच भेटी देता आल्या. प्रवेश द्वारावरुन सात-आठ मिनिटावर एका ठिकाणी चहा घेऊन माथेरानकडे कूच केली. सुमारे दोन कि.मी.खडकाळ दगड-गोटयातून चालत माथेरान रेल्वे स्टेशन व बाजारपेठ गाठली. तोपर्यंत दमछाक झाली होती. तेथे एका छोटया हॉटेलमध्ये नास्ता करुन पुढे शार्लोट लेक कडे कुच केली. तेथील अफाट पाणी पाहून डोळे विस्फारले गेले. हॉटेलमधील गरमा गरम बटाटे वडे आणि चहामुळे उत्साह द्विगुणीत झाला. आजुबाजूला गर्द झाडी, गर्द धुके आणि जोरात पडणा-या पावसात चिंभ भिजत माथेरान पाहिले. हे पावसाळी पर्यटन कायम मनात घर करुन राहणारे असेच आहे.
या परिसरात फिरताना बारकाईने पाहिलं तर आतापर्यंत बरसलेल्या पावसामुळे दगड-गोटयांवर निर्माण झालेले शेवाळ, झाडांच्या फांद्यावर जमा झालेले शेवाळ आणि त्यातून तयार झालेली कोवळी पालवी, काही फांद्यावर दिसणारी दुर्मिळ छोटी पांढरी फुलं आपल्याला वेगळाच आनंद देऊन जातात. आपण मार्गक्रमण करीत असताना झाडांच्या फांद्यावरुन उडया मारणा-या, किंचाळणारा माकडयांच्या झुंडीही दिसतात.
पावसाळयात माथेरान पाहायचं असेल तर छत्र्या घेऊ नका. बरोबर घ्या रेनकोट, टोपी आणि गमबूट किंवा स्पोर्टस् शूज आणि मग खरी मजा अनुभवा माथेरानच्या पावसाची, निसर्गाची !
No comments:
Post a Comment