Saturday, June 2, 2012

दुर्गमतेवर इच्छाशक्तीने मात

नांदेड जिल्ह्यातील अतीदुर्गम व डोंगराळ भागातील रेणुका मातेच्या महिम्याने प्रसिद्ध असलेला तालुका म्हणजे माहूर या माहूर पासून सुमारे २० किमी अंतरावर डोंगराचे पायथ्याशी वसलेले संपूर्ण आदिवासी कुंटुंबाचे 'मेट' हे गाव. मेट गावाला पूर्वी होणारा पाणीपुरवठा हा विद्यूत पंप व हातपंपाद्वारे होता. परंतू या भागातील पाणी हे गुणवत्ताबाधीत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन लोक सहभागातून तो कायमचा सोडविण्याचा निर्णय घेतला. तसेच पाण्याच्या गुणवत्तेबाबत भुवैज्ञानिक यांचा सल्ला घेऊन गावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करण्याचे ठरविले.

पाणी पुरवठ्याचा प्रस्तुत कार्यक्रम हाती घेतला असता लोकसहभाग प्राप्त करुन घेण्याकरीता चावडी बैठका, प्रभाग बैठका, मंडळ बैठका, महिला बचत गटांच्या बैठका वारंवार आयोजित करुन ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली. सरपंच तसेच ग्रामपंचायती मधील सदस्यांची मदत लोकसहभाग प्राप्त करुन घेण्याकरिता लाभली. शासनास पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव देऊन ७ ऑक्टोबर २००८ रोजी भारत निर्माण योजनेद्वारे वर्धित वेग कार्यक्रमाअंर्तगत प्रस्तुत पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. या गावच्या पाणी पुवठा योजनेसाठी भुवैज्ञानिकांच्या मार्गदर्शनाने गावापासून सुमारे एक किमी अंतरावर विहीर घेऊन विहिरीचे बांधकाम केले. तसेच गावामध्ये २० हजार लि. क्षमतेच्या साठवण टाकीचे बांधकाम केले.

मेट गावाविषयी येथे प्रामुख्याने नमूद करावयाचे झाल्यास आदिवासी लोकसंख्येचे तद्वतच आर्थिक स्वरुपात शेतीवर अवलंबून असलेल्या गावंकऱ्यांनी एकत्र येऊन स्वेच्छेने शंभर टक्के नळ कनेक्शन बसवून घेतले. योजना कार्यान्वित करुन ग्रामपंचायतीला हस्तांतरित करण्यात आली. या आदिवासी गावातील ग्रामपंचायत पाणीपट्टीची वसुली शंभर टक्के आहे. तद्वतच शासनाचे २४ x ७ चे धोरण एका डोंगराळ भागातील गावाने लोकसहभागातून कार्यान्वित केले ही एक जमेची बाजू मांडावी लागेल. यामुळे गावकऱ्यांचा स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरुपी सुटला. तसेच आधी असलेले गावातील स्त्रोत फलोराईडयुक्त असल्यामुळे या फलोराईडमुळे होणारा फ्लोरोसीस सारखा कधीही दुरुस्त न होणाऱ्या रोगापासून गावकऱ्यांची कायमची मुक्तता होण्यास मदत झालेली आहे. पिण्यासाठी आता निर्जंतूक, स्वच्छ आणि फ्लोराईडमुक्त पाणी मिळत असल्याने या गावातील जनतेला फ्लोरोसीसचा रोग होणे बंद झाले आहे.

प्रस्तुत कार्यात पाणीपुरवठा व स्वच्छता समिती व ग्रामसेवक यांनी गावात जाणीव जागृती, शाश्वतता निर्माण करुन सुव्यवस्थित अंमलबजावणी सुरु आहे. मेट हे गाव शंभर टक्के हागणदारीमुक्त आहे. तसेच तंटामुक्तीकरिता प्रस्तावित असून तंटामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. एक स्वच्छ व सुंदर ग्राम निर्मितीचे स्वप्न साकार करण्यासाठी मेट हे आदिवासी ग्राम प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

ग्रामसेवक, ग्रामपंचायत आणि पाणीपुरवठा व स्वच्छता समिती व लोकसहभाग प्राप्त झाला तर कितीही दुर्गमतेला सुगमतेकडे घेऊन जाता येते हा संदेश प्रस्तुत गावकऱ्यांनी दिल्याचे दिसते.

  • तुकाराम माळी
  • No comments:

    Post a Comment