राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) सहकार्यातून राज्यातील पहिला इकोऍ़ग्रो टुरिझम कंपनी उभारण्याची किमया सातारा जिल्हातील तापोळा येथील धरणग्रस्त शेतकरी युवकांनी केली.एवढेच नाही तर गेल्या दीड वर्षात नऊ ते दहा लाख रुपयांचा व्यवसाय करण्याबरोबरच गावातील २५ कुटुंबाना रोजगार मिळवून दिला आहे.
महाबळेश्वरला आलेला पर्यटक आता आवर्जून तापोळयाला बोटींगची हौस पूर्ण करण्यासाठी जातो. या ठिकाणी स्वयंचलित बोटी पर्यटकांचे आर्कषण ठरले आहे.याचाच फायदा येथील धरणग्रस्त तरुणांनी घेण्याचा निश्चय केला.अपुऱ्या शेतीला पर्यटनाची जोड देत आथिक उन्नती या युवकांनी साधली आहे.
गणेश उतेकर, किसन शिंदे, रमेश धनावडे, संदीप उतेकर, सिध्दार्थ गायकवाड, नितीन गायकवाड, दीपक शिंदे,या तरुणानी नोकरीच्या शोधात मुंबईस जाण्याच्या परंपरागत रुढीला बगल देऊन परिसरातील तरुणांपुढे नवा आदर्श व आर्थिक विकासाची दिशा दिली आहे.कोयनेच्या पाणलोट क्षेत्राच्या तीरावर २० गुंटे जागेत तापोळा इथे हा प्रकल्प सुरू केला आहे.
घनदाट हिरव्यागार वनराईने नटलेला निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या निसर्गरम्य अशा या परिसरात सतत पावसाळ्यात धुवाधार पाऊस पडतो. तर पावसाळयानंतर धुक्याचा दुलईत हरवलेले इथले डोंगर आणि परिसर पाहण्याची मजा काही औरच असते. शिवसागरच्या जलाशयात उन्हाळयातही इथले निसर्ग सौंदर्य पर्यटकांना भुरळ घालते. महाबळेश्वरला आलेला पर्यटक तापोळयाला जातोच. याचे भान ठेऊन या तरूणांनी केवळ बोटींगपुरताच हा व्यवसाय मर्यादित ठेवला नाही. नाबार्डच्या माध्यमातून या युवकांना टुरिझमचे ३० दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केले.त्यानंतर या तरुणांनी 'महाबळेश्वर कृषी दर्शन' ही राज्यातील पहिली नोंदणीकृत संस्था स्थापन केली.
प्रारंभी स्वत:चे तर काहींनी कर्जरुपाने भांडवल उभे करुन मोबाईल तंबू खरेदी केले. त्यानंतर जिल्हा बँकेकडून तीन लाख रुपयांचे कर्ज घेतले.यातून तंबूची संख्या वाढविली. पर्यटकांना याची माहिती 'कोयना ब्लॉग स्पॉट' या संकेतस्थळावर दिली आहे. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्लीतील सुमारे एक हजार पर्यटकांनी या ठिकाणास भेट दिली आहे. पुणे-महाबळेश्वरहून तापोळा किंवा सातारा -बामणोली- तापोळा या मार्गे तापोळयाला जाता येते.
एका पर्यटकासाठी ७०० ते १२०० रुपये एका दिवसासाठी आकारले जातात यात राहण्याची व्यवस्था दोन वेळचे जेवण व अल्पोपहार याचा समावेश आहे.या परिसरातील किल्ला वासोटा, कोयना अभयारण्य, नागेश्वर लेणी, कोयना, साळशी, कादांटी, तेहरी नदयाचा संगम, आमलँट पॉईट, दत्त मंदिर, शिवार फेरी, शेततळयातील मासेमारी यांचा आनंद पर्यटकांना लुटता येतो. अधिक माहिती www.tapolaecoagrotourism.com या संकेतस्थळावर अधिक उपलब्ध आहे.
No comments:
Post a Comment