या भागात नेहमीच जानेवारी ते जून या काळात पाण्याची टंचाई असते. मात्र यावर्षी पाणीटंचाईची तीव्रता अधिक असल्याचे सरपंच दादाभाऊ शेंडगे यांच्याशी बोलताना जाणवले. अशा परिस्थितीतही प्रशासनाच्या वतीने दररोज टँकरच्या तीन खेपा वाडीवर होत असल्याने वाडीतील लोकांची तहान भागते. पाण्यावाचून कोणीही वंचित नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाऊस कमी झाल्याने बारामती तालुक्यातील ६४ गावात टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई तसेच चारा टंचाई संदर्भात दैनंदिन नियोजन आणि सनियंत्रणासाठी तहसिल कार्यालयात एका नायब तहसिलदारांच्या अधिपत्याखाली टंचाई कक्ष स्थापन करण्यात आला आहे. प्रशासनाच्या वतीने २८ टँकरद्वारे १५ गावे आणि १६९ वाडयावस्त्यांवरील ४८ हजार ४७२ लोकांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. गरजेप्रमाणे गावात टँकरच्या खेपा कमी-जास्त करण्यात येत असल्याचे तहसिलदार हिम्मतराव खराडे यांनी स्पष्ट केले.
चारा टंचाई लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने बारामती व इंदापूर तालुक्यात चारा डेपो सुरू केले आहेत. ३५१ मेट्रीक टन चाऱ्याचे वाटप करण्यात आले आहे. १६ मे पासून आजतागायत ३५१.२५ मेट्रीक टन चाऱ्याचे वाटप चारा डेपोंमधून करण्यात आले आहे. बारामती आणि इंदापूर तालुक्यातील १३ गावांमधील जनावरांसाठी आजवर १० लाख ३६ हजार १८८ रूपयांचा चारा शासनाच्या वतीने पुरविण्यात आला आहे. तालुक्यातील साखर कारखाने, दुध उत्पादक संस्था या कामी प्रशासनास मनापासून मदत करीत असल्याचे तहसिलदार खराडे यांनी आवर्जुन सांगितले.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यात सध्या १० कामावर १३ मजूर काम करीत आहेत. बारामती तालुक्यात वैयक्तिक विहिरींची १४० कामे सुरू असून त्यावर ८२५ मजूर काम करीत आहेत. कोणताही माणूस कामावाचून वंचित राहणार नाही, याची दक्षता प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहे.
झाडांची कमी संख्या हे कमी पाऊस पडण्याचे महत्वाचे कारण असल्याचे ध्यानात घेऊन प्रशासनाच्या वतीने यावर्षी १ कोटी झाडे लागवडीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने बारामती तालुक्यात ५० लाख वृक्षांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण, गटविकास अधिकारी, लागवड अधिकारी आणि वनविभागाच्या वतीने याचे नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत १ लाख ९३ हजार ३८८ खड्डे घेण्यात आले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी बारामती यांच्यातर्फे ३ ठिकाणी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून काशीद, चिंच, शिवण, लिंब, बाभुळ इत्यादी प्रकारची ३ लाख ७५ हजार रोपे तयार करण्यात आली आहेत.
अशासकीय संस्था व खाजगी उद्योजकांतर्फे १ लाख झाडे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यात टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना, नळपाणी पुरवठा विशेष दुरूस्ती, नवीन विंधन विहीर, विहीर अधिग्रहण करणे आदी उपाय योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. तालुक्यातील साखर कारखाने, विविध सहकारी संस्था, लोकप्रतिनिधी या कामी प्रशासनास सहकार्य करीत असल्याचे चित्र दिसून आले.
No comments:
Post a Comment