Saturday, June 30, 2012

मानवी संस्‍कृतीचे ऐतिहासिक अवशेष

भारतीय लोक एका महान संस्कृतीचे वाहक आहेत. आज असलेल्या संविधानाच्या उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायची असलेली व्यवस्था ही पुरातन आहे. ही संस्कृती मातृसत्ताक होती. या महान संस्कृतीचे अवशेष आजही मोहोजोंदाडो, हडप्पा याठिकाणी दिसतात.

राजधानी दिल्लीत इंडिया गेटच्या जवळ राष्ट्रीय संग्रहालय आहे. हे पाहिल्यावर महान भारतीय इतिहासाचा ठेवा जीवंत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. दिल्लीतील माझे सर्वात आवडीचे ठिकाण म्हणजे राष्ट्रीय संग्रहालय येथे आल्यावर मन हरपून जाते, ते इतिहासाच्या पानात !

15 ऑगस्ट 1949 ला राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय संग्रहालय स्थापित केले होते. नंतर संग्रहालयाकरिता नवीन इमारतीचे निर्माण करण्यात आली. याठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने वास्तुंची मांडणी करण्यात आली. 18 डिसेंबर 1980 ला हे संग्रहालय जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

मध्य एशियाई पुरावशेष


राष्ट्रीय संग्रहालयातील भारतीयेत्तर संकलनांमध्ये मध्य एशियाई कलांचे संकलन गुणवत्ता आणि परिणाम, दोन्ही दृष्टीने समृध्द आहे. या संकलामध्ये उत्कृष्ट भित्तीचित्र, रेशीम चित्रीत बैनर, काष्ठ आणि गच निर्मित मूर्ती तसेच मृण्मूर्ती, शिक्के, पोर्सीलेन, मृदभांड, सोने आणि चांदीचे मौल्यवान वस्तू, धार्मिक आणि लौकिक प्रकारचे दस्तावेज आहेत. या संकलनाला 20 व्या शतकातील अग्रण्य पुरातत्वक सर ऑरेल स्टाइनव्दारे 1900-1901, 1906-1908 आणि 1913-1916 च्या तीन प्रमुख अभियानामधील प्रमुख उत्खननात 800 वस्तु येथे ठेवल्या आहेत.

तंजावर आणि म्हैसूरचे चित्र


हे कक्ष तंजावर आणि म्हैसूर या जगप्रसिद्ध दोन शैलींकरिता आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत. येथे पौराणिक कथा, महाकांव्याचे व्याख्यान विविध देवी-देवतांची 50 चित्र प्रदर्शित आहेत. जे दक्षिण भारतीय कलांचे पांरपारिक आणि अध्यात्मिकतेचे सुंदर समिश्रण प्रस्तुत करतात. सात वेगळया चित्रांनी तंजावूर शैलीची निर्मितीचे सुंदर चित्रणही येथे दिसते.

काष्ठ उत्कीर्णन


काष्ठ उत्कीर्ण कक्षात मुख्यत: इ.स. 17 ते 19 शतकातील भारतीय काष्ठ उत्कीर्ण पंरपरेला दाखविण्यात आले आहे. यामध्ये 16 कालाकृती आहेत. येथे राजस्थान, गुजरात, ओरिसा आणि दक्षिण भारताची अनेक काष्ठ उत्कीर्ण शैलींचे उदाहरण दिसते. सर्वाधिक महत्वपूर्ण कलाकृतींध्ये गुजरात मधील 17 वी शताब्दीचे सुक्ष्म उत्कीर्ण आणि चित्रित मंदिर मंडप आहे. येथे उत्कीर्णित रंगविलेले फलक, हस्तीदंताने जडलेला डबा, दैनिक उपयोगांच्या वस्तू, खिडक्या, दरवाजे, आणि कार्तिकेयचे वाहनाचे मोर येथे पाहण्यास मिळते. या कक्षातील प्राचीन कलाकृती म्हणजे 13 वी शताब्दीतील सुंदर उत्कीर्णित दरवाजा आणि स्तंभ जे कटरमल (जिल्हा अलमोड़ा उत्तराखंड) चे सूर्य मंदिर जे मध्यकालीन आहे.

भारतीय वस्त्र


दुस-या मजल्यावरील वस्त्र कक्षात मुगल काळातील भारतीय पारंपरिक वस्त्राचे सुंदर संकलन प्रदर्शित आहेत. इथे एकूण 134 रंगविलेले, हातकाम असलेले सुती, रेशमी, ऊनी वस्त्र ठेवलेली आहेत. यांना अलंकार पद्धतीने व्यवस्थीत प्रदर्शित ठेवलेले आहे. हातमांगानी तयार केलेले उत्कृष्ट चंदेरी, मध्य प्रदेशातील 17 वी शताब्दी चे कलात्मक डिजाइन ने छपील चित्रीत सूती आवरण आणि विभिन्न वस्त्रांना त्यांच्या विविध उपयोगांसह कक्षात ठेवण्यात आले आहे.

पूर्व कोलंबियाई आणि पश्चिमी कला


पूर्व कोलंबियाई आणि पश्चिमी कलांच्या संकलीत कलाकृतीमधील बहुतेक कला संयुक्त राज्य अमेरीकेतील श्रीमती आणि श्री नस्ली हीरामानेक यांनी उपहारस्वरूप दिली आहेत. या वास्तू इ.स़. 1492 च्या जवळपासच्या आहेत. जेव्हा भारत आणि दक्षिणी पूर्व एशियामध्ये समुद्र मार्गाने क्रिस्टोफर कोलंबस अजानता या क्षेत्रात पोहोचले. त्याकाळातील हे वास्तू आहेत. बहुतेक वास्तू मेक्सिको, पेरू, माया, इंका, अमेरिकच्या उत्तर-पश्चिमी किनारा, पनामा, कॉस्टारिका आणि अल सल्वाडोर ची आहे. या व्यतिरीक्त इंडोनेशिया, इराण, इराक, मिस्त्र, जर्मनी आणि फ्रांसचीही काही कलाकृती याठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. असे एकूण 252 कलाकृती येथे प्रदर्शित आहेत.

वाद्ययंत्र


संग्रहालयामध्ये वाद्ययंत्रांचे विशाल संग्रह आहे. यामध्ये जनजातीय आणि शास्त्रीय समूहाचे वाद्ययंत्र येथे आहेत. या प्रदर्शनीत ठेवलेली वाद्ययंत्रांमध्ये पद्यश्री शरण राणी बाकलीवाल यांच्याव्दारे 1980,1982, व 2003 मध्ये संग्रहालयात दानस्वरूपात दिली गेलेली वाद्य आहेत. 19 व्या शतकातील पश्चिम शैलीचे वाद्ययंत्रदेखील येथे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहे. येथे ठेवलेल्या तार वाद्ययंत्रांमध्ये विणा, सितार, संतूर थाप देऊन वाजविणा-या वाद्ययंत्रामध्ये तबला, ढोलक, फुंकुण देऊन वाजविणा-या वाद्ययंत्रामध्ये बासरी, तुरही असे वर्गीकृत करून ठेवण्यात आली आहे. यामध्ये एकूण 207 वाद्ययंत्र प्रदर्शनार्थ ठेवण्यात आली आहेत.

अस्त्र-शस्त्र आणि कवच


संग्रहालयात भारतीय अस्त्र-शस्त्रांचे उत्कृष्ट संकलन आहे. यामध्ये अणकुचीदार शस्त्र, प्रक्षेपास्त्र, मानव आणि पशुंचे कवच, अलंकृत शस्त्र, आग्नेयस्त्र आणि युध्द संबंधी आतिरिक्त सामग्री प्रदर्शनार्थ ठेवलेली आहे. यामध्ये मुख्य रूपे मुगल अस्त्र-शस्त्र प्रदर्शित आहे. या व्यतीरीक्त मराठा, शिख, राजपूत आणि हिंदू राजे वापरीत असलेले अस्त्र-शस्त्र मांडण्यात आली आहेत. येथे दमिश्की काम, मीनाकारी, जाळीदारकाम, अथवा मौल्यवान रत्नांनी कोरलेले अंलकार असे एकून 500 कलाकृती प्रदर्शनात ठेवलेली आहेत.

भारतीयांकरिता रूपये 10/- प्रति व्यक्ती तिकीट तर विदेशी पर्यटकांकरिता रूपये 300/- लागतात. छायाचित्र कॅमेरा असेल तर भारतीयांकरिता प्रतिव्यक्ती 20/- रूपये लागतात. आणि विदेशी पर्यटकांरिता रूपये 300 /- लागतात. याठिकाणी व्हिडियो कॅमे-याला अनुमती नाही. मंगळवार ते रविवारपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंतची वेळ आहे.

असे हे संग्राहालय इतिहासाची साक्ष देत भविष्याची बांधणी करण्यासाठी सर्वसामान्याकरिता उपलब्ध आहे. दिल्लीत आल्यावर या संग्रहालयाला जरूर भेट दयावी.

  • - अंजू निमसरकर कांबळे उपसंपादक, मपकें, नवी दिल्ली
  • No comments:

    Post a Comment