Saturday, June 30, 2012

महिलांनी स्‍वकर्तृत्‍वातून साधला विकास

राज्‍यामध्‍ये महिला सक्षमीकरणाचे वारे जोरात वाहत आहे. सर्वच क्षेत्रात महिला खंबीरपणे पुढे येऊन पुरुषांच्‍या बरोबरीने काम करु लागल्‍या आहेत. आपल्‍या कर्तृत्‍वाने कामात आगळावेगळा ठसा उमटवू लागल्‍या आहेत. महिलांना हा मान सन्‍मान शासनाच्‍या विविध योजना, निर्णय, उपक्रमांमुळे मिळू लागल्‍याचे चित्र सर्वत्र दिसू लागले आहे. बचत गट हे त्यापैकीच एक माध्यम आहे.

दारिद्र्याच्‍या विळख्‍यात जीवन जगत असताना आपले जीवनमान उंचावण्‍यासाठी कुणीतरी मदत करील काय? या अपेक्षेने समाजाकडे पाहून आपली वाटचाल करणारी अनेक कुटुंबे दिसून येतात. मेहनत, जिद्द व निष्‍ठेने काम करण्‍याची तयारी असणाऱ्‍या महिलांना योग्‍य मागदर्शन व मदतीची गरज असते. महिला बचत गटातून त्‍यांच्‍या उमेदीला समर्थपणे साथ मिळाली तर महिला स्‍वकर्तृत्‍वाने आपल्‍या पायावर उभ्‍या राहू शकतात. अहमदनगर जिल्‍ह्याच्‍या जामखेड येथील सामानामीर बाबा महिला बचत गटातील महिला हे याचेच एक उदाहरण आहे.

जामखेड येथील इंदिरानगर वस्‍तीत राहणाऱ्‍या दारिद्र्य रेषेखालील 15 महिलांनी 15 मे 2009 रोजी सामानामीर बाबा महिला बचत गट स्‍थापन केला. श्रीमती ताराबाई शिवाजी माने यांच्‍या अध्‍यक्षतेखाली स्‍थापन झालेल्‍या या बचत गटाने आपल्या बचतीतून प्रारंभी पारंपरिक पद्धतीने चालणारा काथवट, बेलणे, पोळपाट आदी लाकडी वस्‍तू तयार करण्‍याचा व्‍यवसाय सुरू केला. दररोज काबाडकष्‍ट करुन स्‍वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्‍या या महिलांना स्‍वतःच्‍या पायावर उभे राहण्यास बचत गटाची मोलाची मदत झाली.

या व्‍यवसायाला खेळते भांडवल म्हणून 25 हजार रूपये मिळाल्‍यानंतर व्‍यवसायात वाढ झाली. उत्‍पादनातही वाढ झाली. तयार केलेला माल खेडोपाडी जाऊन विक्री होऊ लागला. परिसरातील गावातील यात्रा-जत्रांमध्‍ये जाऊन मालाची विक्री करण्‍यास त्यांनी सुरुवात केली. त्‍यामुळे गटास चांगले उत्‍पन्‍न मिळू लागले. त्‍यातून त्यांची प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल सुरू झाली, महिलांमध्ये आत्‍मविश्‍वास निर्माण झाला. उत्‍साहाने त्‍या व्‍यवसायवृद्धीकडे लक्ष देऊ लागल्‍या.

सन 2010 मध्‍ये अहमदनगरच्‍या जिल्‍हास्‍तरीय व नाशिक येथील विभागीय बचत गटाच्‍या प्रदर्शनात तसेच सन 2011 च्‍या व 2012 च्‍या अहमदनगर येथील विभागीय बचत गटाच्‍या प्रदर्शनात या गटाने सहभाग घेऊन मालाची विक्रमी विक्री केली.

या बचत गटाच्‍या कार्याची दखल घेऊन या गटाचे व्दितीय मूल्‍यांकन झाले. गटाने लाकडी व्‍यवसाय, काथवट, पोळपट, रवी, लाकडी खेळणी, बेलणे, चाटू आदी उत्पादन सुरू केले. त्‍यासाठी जामखेड येथील स्‍टेट बँक ऑफ इंडियाकडे कर्ज प्रस्‍ताव सादर केला आहे. दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्‍या या महिलांनी आपल्‍या कर्तृत्‍वावर या व्‍यवसायात बचत गटाच्‍या माध्‍यमातून गरुड झेप घेतली आहे.

महिला आता ग्रामीण व शहरी विकासाच्‍या प्रक्रियेतही सहभागी होत आहेत. चूल आणि मूल एवढ्यापुरत्‍या मर्यादित न राहता महिला पुरुषांच्‍या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत.


  • दिलीप गवळी, माहिती अधिकारी, अहमदनगर
  • No comments:

    Post a Comment