...हे सगळं सांगायच कारण म्हणजे लहानगी श्वेता मस्तपैकी दोन शेंड्या बांधून शाळेच्या गणवेशात नमस्कार करायला आली तेव्हा लक्षात आलं आज शालेय शैक्षणिक सत्राला सुरूवात झाली. (जरा जड शब्द झाले) मुलांच्या भाषेत आता शाळेचा पहिला दिवस...मज्जाच मज्जा...खरंच शाळेचा गणवेश घातल्यावर जगातलं प्रत्येक मुलाचं सौंदर्य खुलून दिसतं. 'मुलं ही देवाघरची फुलं' असं का म्हणतात ते उमगतं. काळा-गोरा, गरीब-श्रीमंत, असा काहीच फरक त्यांच्यात जाणवत नाही. खरं तर त्यांच्या लेखी सर्वजण मित्र-मैत्रिण असतात. आपणचं वर्गवारी ठरवतो. सुदैवाने या चिमुकल्यांच्या मनात असं सांगितलेलं रुजत नाही आणि म्हणूनच ती निष्पाप भावनेने मित्र जोडू शकतात...
...शाळेचा पहिला दिवस म्हटल्यावर बालपणच्या आठवणी डोळ्यासमोरून तरळल्या. काणेबाईंचा हसरा चेहरा..पाठीवरून हात फिरवून केलेली विचारपूस...शाळा याचसाठी हवी असते. शिक्षणासोबत येणारा संस्काराचा धागा जीवन घडविणारा असतो. आपण मात्र मुलांना पुस्तकात अडकवितो...शाळेभोवती फेरफटका मारताना मुलांमध्ये लहानपणचे सवंगडी दिसू लागले...
पाठीवर दप्तर, हातात वॉटरबॅग, रंगेबेरंगी पोषाख अशा रुबाबात मुले शाळेकडे जात होती. रस्त्यात मित्र भेटल्यावर दुरून हात देतांना चेहऱ्यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता. मित्र भेटल्यावर सोबत आई-बाबा सोडायला आले आहेत हे विसरून मित्राच्या हातात हात घेतांना त्यांच स्वतंत्र विश्व तयार झालं होतं. त्यावेळी सुटीतील मज्जा, मामाकडचं शिकरण-पुरी, वॉटरपार्क, आनंदमेळा हे सर्व जणू त्यांनी खुप मागे टाकलं आहे असंच वाटलं.
शहर असो की गाव शाळेच्या परिसरात उत्साह ओसंडून वाहत होता. रिक्शा, व्हॅन आणि खाजगी वाहनानेदेखील विद्यार्थी येत होते. रिक्शावाल्या काकांशी मुलांचं नातंही काही निराळचं. एका मुलीने तर त्यांच्यासाठी चक्क 'गावाहून' कॅडबरी आणली होती. ए पळायचं नाही हं, दुपारी इथचं यायचं, ही वॉटर बॅग कुणाची...काकांच्या सूचना सुरूच... मुलांच्या पालकांचे शाळेच्या दारातही सूचना देणे सुरूच होते. ग्रामीण भागातील विद्यार्थी आकाशातील ढगांची तमा न करता पायी चालत शाळेत आले होते. काय रे गावाला गेला होतास का, बाबा आले वाटतं सोडायला...शाळेतली शिक्षक मंडळी मधूनच विद्यार्थ्यांशी गप्पा मारतांना दिसत होती. वर्गात बसलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर यावर्षी काय नवे करायचे बरं, असेच भाव होते. गुण, स्पर्धा या शब्दांपासून ती कोसोमैल दूर होती.
वर्गातला विशिष्ठ गंध त्यांच्या आनंदात भर घालत होता. हा गंध होता कोऱ्या करकरीत कागदांचा..नव्या पुस्तकांचा. पहिल्याच दिवशी नवी पुस्तके मुलांच्या हाती पडली. रत्नागिरी जिल्ह्यातील २ लाख ५ हजार ३८५ विद्यार्थ्यांसाठी १३ लाख ६७ हजार २१२ पुस्तके आणि ६८ हजार १५४ स्वाध्याय पुस्तके प्राप्त झाली आहेत. यात मराठी माध्यमाची १ लाख ९१ हजार, ऊर्दु माध्यमाची १३ हजार २०३ आणि सेमी इंग्रजी माध्यमाची १२ हजार ४४६ पुस्तके शाळांना वितरित करण्यात आली. पहिल्याच दिवशी मुलांचे स्वागत या नव्या पुस्तकांनी केले जात होते.
मित्रांची भेट होताच पोमेंडीच्या मनिष साबळेचा चेहरा आनंदला. डॉक्टर व्हायचे त्याचे स्वप्न आहे. पुस्तकातील चित्रे पाहण्यात नाचणे येथील जि.प.शाळेतील ईशा गोताळेदेखील रमली होती. तिला इंजिनिअर व्हायचंय. कुवारबाव येथील ४ थीच्या वर्गातील मुलींना शिक्षिका आवडतात. म्हणून त्या सर्वांना शिक्षिकाच व्हायचं आहे. बरं केवळ बोलणं नाही तर आत्मविश्वासही त्यांच्या डोळ्यात चमकतो. खरचं ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील कल्पनेच्या पंखांवर स्वार होऊन विद्यार्थी उंच झेप घेऊ पाहत आहेत. त्यांचं पुस्तकाशी असलेलं अतूट नातं त्यांच्या आनंदी चेहऱ्यावर प्रतिबिंबीत झालं होतं. ठिकठिकाणी पहिलीच्या मुलांचं स्वागत औक्षण करून आणि पेढा भरवून केल जात होतं. हा आनंद देण्यासाठी आणि त्यातून जीवनाचा मजबूत पाया रचण्यासाठीच शाळा असते. दुर्देवानं काही मुलांना शाळेपासून दूर ठेवलं जातं. हे आनंदाचे क्षण लुटण्याचा आणि त्यातून नवी दिशा शोधण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेतला जातो. का अजूनही या चिमुकल्यांच्या हातात पाटी-पुस्तकाऐवजी चहाची किटली, प्लास्टीक बाटल्यांनी भरलेली गोणी किंवा गाडी पुसायचं फडकं यावं? संवेदनशील माणसाला व्यथीत करणारा प्रश्न आहे...
...मुलांना शिक्षणाचा हक्क त्यांना कायद्याने मिळवून देण्यासाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा २००९ मध्ये लागू करण्यात आला आहे. मात्र कायद्याबरोबरच प्रत्येक मूल शाळेत गेलेच पाहिजे असे प्रयत्न समाजाकडूनही होणे आवश्यक आहे. पुस्तकातील पाप-पुण्याच्या संकल्पने पलिकडे जाऊन निरक्षरतेचं पाप धुवून काढताना एका मुलाचं स्वप्न फुलविण्याचं पुण्य पदरी पडल्यावर मिळणारं समाधान काही निराळचं असेल. तुमच्या प्रेमळ स्पर्शाने उत्साहीत झालेलं ते बालमन 'स्कूल चले हम'च्या थाटात तुमच्याकडे पाहिल ना तेव्हा 'स्वर्ग इथच आहे' याचा प्रत्यय तुम्हाला येईल. तुमच्या मुलांनाही आयुष्यभर प्रेम करणारा मित्र मिळेल. मग बघा सभोवती एखादा चिमुकला 'अंकुर' किंवा निष्पाप 'जाई' तुमचं बोट हातात घेण्यासाठी इतरांप्रमाणेच फुलण्यासाठी, बागडण्यासाठी तुम्हाला आवाज देताय...
No comments:
Post a Comment