नागभीड तालुक्यातील खडकी हे गाव. या गावातील महिला पंचशील महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या सदस्य आहेत. त्यातीलच एक निर्मलाताई एकादश मेश्राम यांचे शिक्षण चौथीपर्यंतचे. पती, दोन मुली आणि एक मुलगा असा त्यांचा परिवार. शेतीची कामे संपली की, हात रिकामे असायचे. तेव्हा पोटापाण्याचा प्रश्न तीव्र व्हायचा. कामासाठी अनेक कुटुंब बाहेरगावी जायची. त्याला मेश्राम कुटुंबही अपवाद नव्हते. बाहेरगावात कामासाठी गेल्यावर मुलाबाळांची जबाबदारी दुसऱ्यावर टाकणे हा एकच पर्याय त्यांच्यासमोर असायचा. यात मुलाबाळांची मोठी हेळसांड व्हायची. या त्रासावर विजय मिळवायचा कसा हा विचार निर्मलाबाईंच्या डोक्यात घोळत होता, पण मार्ग दिसत नव्हता.
शेवटी बचतगटाच्या सभेमध्ये त्यांनी आपली अडचण मांडली. चर्चेनंतर बांगड्या व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या व्यवसायासाठी त्यांनी बचतगटातून कर्ज घेतले. त्यानंतर त्यांचा संघर्ष सुरू झाला. गावोगावी जाऊन त्यांनी बांगड्या विकणे सुरू केले. आता त्यांचा हा व्यवसाय वाढला आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांनी बचतगटाकडून घेतलेले कर्ज परत केले आहे. आपली मुले शिक्षणात समोर असल्याचे निर्मलाताईंनी ओळखले होते. निर्मलाताईंनी आपल्या मुलीस शिक्षणाकरिता ब्रम्हपूरीला पाठविले. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाचा खर्च या व्यवसायातून भागविला जातोय. इतर मुलांचेही शिक्षण त्या करीत आहेत. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रदर्शन भरले. त्यातही त्या सहभागी झाल्या.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने हे सर्व करता आल्याचे निर्मलाताईंनी सांगितले. या कामात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनींचे वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन मिळाले. जिल्हास्तरावर महामंडळाच्या माध्यमातून दरवर्षी प्रदर्शन भरविले जाते. या प्रदर्शनात मला भाग घ्यायचा आहे, त्यात मला माझ्या बांगड्यांची विक्री करायची आहे, निर्मलाताई आता विश्वासाने बोलू लागल्या आहेत.
No comments:
Post a Comment