चंद्रपूर जिल्ह्यातील कान्पा या गावातील माई महिला स्वयंसहायक बचतगटामध्ये शकुंतलाबाईंना अध्यक्ष म्हणून नेमलेले होते. दोन मुली व एक मुलगा असा त्यांचा परिवार आहे. त्यांच्या पतींच्या मृत्युला दहा वर्षे झाली. पती गेल्यानंतर त्यांना जबर धक्का बसला. त्या धक्क्यातून सावरणे सहजसाध्य नव्हते. परंतु समोर मुलांचे पूर्ण आयुष्य उभे होते. मुलांचे शिक्षण आणि इतर जबाबदाऱ्या हे सगळे करता असताना त्यांची तारेवरची कसरत होत असे.
संसाराचे ओझे वाहत असताना त्या कधी कधी निराश व्हायच्या. असेच एकदा बचतगटाची बैठक होती. या बैठकीमध्ये वेगवेगळ्या योजना किंवा उदरनिर्वाहाकरिता काय करावे याबाबत चर्चा आणि मार्गदर्शन होत होते. यातून शकुंतलाबाईंनी आपणास काही करता येणे शक्य आहे का, याची चाचपणी सुरू केली. काही तरी करायचेच अशी मनात गाठ बांधून त्यांनी निर्धार केला, आता आपल्याला जगायचे असेल व समाजात ताठ मानेने वावरायचे असेल तर काही तरी धडपड केल्याशिवाय शक्य नाही.
आपल्या परिसरात कुठला व्यवसाय चालू शकेल याचा त्यांनी अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी किराणा दुकान या व्यवसायाकडे वळावे, असे ठरविले. पण किराणा दुकान म्हटले की पैसा हवा असतो. त्यासाठी त्यांना पैशाची चणचण भासायला लागली. या अडचणीमध्ये काय करावे सुचत नसताना आणखी एकदा बचतगटाच्या बैठकीत सहभागी व्हायची संधी मिळाली. त्या बैठकीत त्यांनी आपली समस्या मांडली. गटातील इतर महिलांनी ती समस्या सोडविण्यासाठी चर्चा करून त्यांना किराणा दुकानाकरिता बँकेकडून कर्ज घेण्याचा पर्याय सुचविला. तसा प्रस्ताव बचत गटामार्फत बँकेस सादर करण्यात आला.
बँकेने 20 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यानंतर शकुंतलाबाईंनी त्या पैशाद्वारे किराणा दुकान थाटले. त्या दुकानामध्ये नित्योपयोगी सामान लावले. त्याला गावतून प्रतिसादही चांगला मिळाला. आता त्यावर त्या आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागल्या आहेत. या व्यवसायामधून जमा झालेल्या रकमेतून त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. बँकेचे सर्व कर्ज सुद्धा त्यांनी परत केले आहे. आज त्या समाधानाने जगत आहेत, अर्थातच त्यांच्या आयुष्यात आलेल्या बदलासाठी बचतगटाला धन्यवाद देतच...
No comments:
Post a Comment