स्त्री ही अबला व व्यवहारशून्य असते अशी मानसिकता मोडीत
काढून ग्रामीण भागातील महिला बचतगटांच्या सदस्यांनी या मानसिकतेला जबरदस्त
तडाखा देत नवऱ्याचे सर्व व्यवहार सांभाळल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत
आहे. पेरणीसाठी सावकाराचे उंबरठे झिजवणारा शेतकरी आता बचतगटाच्या पैशांवर
आपली नड भागवू लागला आहे. बचतगटाच्या माध्यमातून कौटुंबिक अडचणींवर मात
करण्याबरोबरच ग्राम विकासातही महिला बचतगटांनी भाग घेण्यास सुरुवात
केल्याने भावी काळात महिला बचतगट हा ग्रामीण विकासाचा प्रमुख मार्ग ठरणार
आहे.
मागील काही वर्षांपासून राज्यामध्ये महिला सक्षमीकरणाचे वारे
जोरात वाहत असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गावागावात
महिला बचतगट तयार झाले आहेत. मुख्य म्हणजे हे महिला बचतगट सुरुवातीला
तुटपुंज्या रोजगारावर मोलमजुरी करणाऱ्या महिलांनीच स्थापन केले होते. या
महिलांनी तुटपुंज्या मिळकतीतून दरमहा ५० ते १०० रुपये जमा करुन ते बँकेत
टाकले. पै, पै साठवून जमा केलेली रक्कम वर्षभरात मोठी झाल्याने इतरही
महिलांना याचे महत्व कळून आज ग्रामीण भागात महिला बचतगटांचे जाळे निर्माण
झाले आहे.
प्रत्येक गावातील ५० टक्के महिला, बचतगटाशी जोडल्या
गेलेल्या आहेत. महिलांचे पती देखील या उपक्रमात त्यांच्या पाठीशी उभे राहत
आहेत. या महिला बचतगटांच्या भरवशावर अनेक जण व्यवहाराची आखणी करू लागले
आहेत. ग्रामीण भागामध्ये दरवर्षी पेरणीचे दिवस आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये
खते व बी-बियाण्याची जुळवाजुळव करण्याकरिता धांदल उडते. कोणाकडून उसनवारी
करुन प्रसंगी दामदुप्पट व्याजाने सावकाराकडून पैसे घेऊन पेरणीची नड भागविली
जात होती. परंतु आता गेल्या पाच वर्षापासून महिला बचत गटाच्या माध्यमातून
साठवलेला पैसा ऐन निकडीच्यावेळी मिळत असल्याने गावात सावकाराकडे जाणाऱ्या
शेतकऱ्यांची संख्या रोडावली आहे. महिला बचतगटाच्या पैशावर नाममात्र व्याज
आकारले जात असल्याने शेतकऱ्यांचे सावकारांच्या घशात जाणारे पैसे वाचत आहेत.
हा पैसा ते आता इतर कामासाठी वापरत असल्याने महिला बचतगट ग्रामीण भागात
विकासाची कामधेनू ठरत आहे.
शासनाने महिला बचतगटाला विविध
योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचे धोरण अवलंबिले आहे. गावागावात
अंगणवाडीतील पोषण आहार, स्वस्त धान्य दुकानातील धान्य वाटप, केरोसीन वाटप
याचे परवाने आता महिला बचत गटांना मिळू लागले आहेत. महिला बचत गटांच्या
महिला ही सर्व कामे हे एक आव्हान म्हणून करीत असून घराचा उबंराही न
ओलांडलेली महिला आज जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन बँकेचा व्यवहार मोठ्या
हिमतीने सांभाळत आहे. महिला सक्षमीकरणाला खऱ्या अर्थाने बळकट करावयाचे
असल्यास व ग्राम विकास साधावयाच्या असल्यास महिला बचत गटांना आणखी प्रभावी
करणे आवश्यक आहे.
No comments:
Post a Comment