शासनाच्या जवाहर योजनेतून विहीर मिळाली आणि आता शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या 'नाविन्यपूर्ण' योजनेतून त्यांना कायमस्वरुपी हक्काचे उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी शारदा पाटील या महिलेची ही यशोगाथा.
सुरूल हे एक डोंगराळ गाव. या परिसरात पाऊस पडला तरच चारा आणि धान्य उत्पादन होते. बहुतांशी जमिनी खडकाळच. सभोवती डोंगर असणारे हे गाव तुटपुंज्या उत्पन्नाचे गाव म्हणून ओळखले जाते. गावापासून तीन किलोमीटर पश्चिमेला आणि मुख्य रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटर आत शारदा पाटील यांनी पशुसंवर्धन विभागाच्या 'नाविन्यपूर्ण' योजनेतून गायींचा गोठा विकसित केला आहे.
सन २००६ पर्यंत श्रीमती पाटील व त्यांचे पती मोलमजुरी करीत होते. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. सध्या त्यांचा मुलगा लष्करी सेवेत आहे. पै-पैची बचत करीत त्यांनी ८१ गुंठे जमीन खरेदी केली. माणिक पाटील यांच्या बरोबरीने शारदा त्यासाठी अव्याहतपणे राबल्या. प्रचंड कष्टानंतर शेतात फुललेले पीक त्यांच्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करुन देणारे ठरले. खरेदी केलेली जमीन गावात पहिल्यांदाच माणिक पाटील यांनी आपल्या पत्नीच्या नावे केली. हा निर्णय इतरांसमोर आदर्श ठरला. केवळ एवढ्यावरच न थांबता पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे विस्तार अधिकारी डॉ.व्ही.टी.देशमुख यांच्या प्रयत्नाने पशुसंवर्धन विभागाच्या 'नाविन्यपूर्ण' योजनेसाठी त्यांनी प्रस्ताव दिला. त्यासाठी ढीगभर प्रस्ताव होते. मग जिल्हाधिकारी कार्यालयात ड्रॉ पद्धतीने लाभार्थी निवडले गेले. त्यातून श्रीमती पाटील यांना लागलेली लॉटरी त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली.
या योजनेअंतर्गत गायी खरेदीसाठी तीन लाख ४३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येते. त्यापैकी ५० टक्के अनुदान पशुसंवर्धन विभागामार्फत मिळते. विस्तार अधिकारी डॉ.देशमुख यांनी सातत्याने डोंगरकपारीचा रस्ता तुडवत पाटील यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले. पाटील यांनी कर्नाटकातून सहा संकरित गायी खरेदी केल्या आहेत. त्यापैकी चौघींना कालवडी झाल्या आहेत. पाटील यांना लागलेली ही दुसरी लॉटरी ठरली. त्याद्वारे पाटील यांना सध्या प्रतिदिनी १०० लिटर दूध उपलब्ध होत आहे. शेतातील पिकाचा वापर प्रामुख्याने जनावरांच्या चाऱ्यासाठी केला जात आहे. डॉ.देशमुख यांनी त्यांना विशेष बाब म्हणून शंभर टक्के अनुदानावर आफ्रिकन टॉलचे बियाणे दिले आहे. तो प्लॉटही बहरला आहे.
वैरण टंचाईच्या काळात हा चारा प्रमुख आधार ठरत आहे. २० फूट लांब व १० फूट रुंदीचे एक, २० फूट लांब व १४ फूट रुंदीचे दुसरे शेड या योजनेअंतर्गत बांधण्यात आले आहे. स्वखर्चातून १४ फूट रुंद व ४० फूट लांबीचे शेड श्रीमती पाटील नव्याने उभारणार आहेत. दूध उत्पादनाचा पसारा वाढवण्याचा तसेच स्वतंत्र दूध संकलन केंद्र निर्माण करण्याचा त्यांचा मानस आहे. पाटील दाम्पत्य कोणत्याही कष्टासाठी सज्ज आहे. रोजच्या रोज गायींना आंघोळ घातली जाते. गोठ्यालगतच असणाऱ्या शेतातून पाटील दाम्पत्य वैरण उपलब्ध करते. कापलेली वैरण चापकटरद्वारे श्रीमती पाटील स्वत: बारीक करतात. धष्टपुष्ट गायी आणि दर्जेदार दूध उत्पादनासाठी ओल्या-सुक्या चाऱ्याचा पुरेसा पुरवठा आणि पोषण आहाराची योग्य ती मात्रा गायींना दिली जाते. कालवडींना प्रत्येकी पाच लिटर दूध प्रतिदिनी दिले जाते. गायींची धार शारदा पाटील स्वत: काढतात. राजारामबापू दूध संघाची गाडी वाकडी वाट करून दूध नेण्यासाठी त्यांच्या गोठ्यावर पोहोचते.
इस्लामपूर येथील 'आयडीबीआय' बँकेनेही श्रीमती पाटील यांना अर्थसहाय्य केले आहे. उत्पादनातून प्रतिदिनी सध्या सर्व खर्च जाता ही महिला सरासरी दोन हजार रूपये मिळवित आहे. एवढ्या सगळ्या उलाढालीत केवळ हे जोडपे पूर्ण क्षमतेने घाम गाळत आहे. डोंगरी भाग असूनही शारदा पाटील आणि त्यांच्या पतींनी फुलवलेली शेती आणि बहरलेला त्यांचा गायीचा गोठा संपूर्ण जिल्ह्यात आदर्श ठरला आहे.
No comments:
Post a Comment