वाळवा तालुक्यात १९८६ मध्ये उत्पादन शंभर टक्के निर्यात करण्याच्या जाचक अटीवर ओपन एंड सुतगिरणीला मान्यता मिळाली. चात्यांच्या गिरणीत वाया जाणाऱ्या सुताचा वापर करुन हा प्रकल्प चालवावयाचा होता. १९९० ला ही गिरणी सुरु झाली. ५७२ रोटर्सचा चार कोटीचा हा प्रकल्प होता. शासनाने दोनच कोटी दिल्याने ३३६ रोटर्सवर गिरणी सुरु केली. अनेक अडचणींवर मात करीत १९९३ अखेर या गिरणीतून ३० ते ३५ लाख किलो सुत वेगवेगळ्या देशात निर्यात केले गेले होते. मुळात वाया जाणाऱ्या कच्च्या मालापासून सुतनिर्मिती, माल मिळविणे, पूर्ण निर्यात करणे आणि कापूसच उपलब्ध नसणे, या अडचणींमुळे काही काळ ही गिरणी बंद होती.
ग्रामविकास मंत्री जयंत पाटील व राज्याचे वस्त्रोद्योग महासंघाचे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांच्या पुढाकाराने राज्य बँक व अन्य ठिकाणाहून कर्ज उभे करुन पुन्हा गिरणी सुरु केली. निर्यातीची अट रद्द होण्यासाठी पाठपुरावा केला. स्थानिक बाजारपेठ मिळविली त्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत वाढले.
सुतनिर्मितीबरोबरच स्वत:ची बाजारपेठ निर्माण करण्याच्या कल्पनेतून २००३ ला जयंत टेक्स्टाईल, २००४ मध्ये इंद्रप्रस्थ निटिंग हे प्रकल्प सुरु केले. त्यानंतर शेतकरी विणकरी सुतगिरणीचा २५ हजार चात्यांच्या ३० कोटींच्या प्रकल्पाला मान्यता मिळाली. सहा हजार चात्यांनी सुरु झालेल्या या गिरणीत आज २५ हजार चात्या आहेत. २००६ मध्ये नंतर वर्षभरात प्रेरणा यार्न डाईंग, प्रतिबिंब व परिवर्तन हे प्रकल्प सुरु झाले. सुताला आपणच रंग दिला तर त्याची किंमत वाढेल, होजिअरीवर रंग कामासाठी निटिंग प्रोसेस आणि भविष्यात आपला स्वत:चा एखाद्या ब्रँड असावा, यासाठी परिवर्तन गारमेंटचा प्रकल्प सुरु झाला त्यातून अनेक गरजू आणि गरीब महिलांच्या हाताला काम मिळाले आहे.
राजारामबापू संकुलाने चार कोटीच्या एका प्रकल्पा पासून सुरुवात केली. आज १३० कोटीची येथे गुंतवणूक आहे. चाळीस कामगारांपासून आज दीड हजार लोकांच्या हातांना काम मिळाले आहे. वस्त्रोद्योग वाढीला लागून छोटे-मोठे उद्योजक निर्माण झाले आहेत. वर्षाकाठी पंधरा ते वीस कोटींची उलाढाल वाढली आहे. सुमारे सत्तर ते ऐशी खाजगी छोटे-मोठे उद्योजक वस्त्र उद्योगाशी संबंधित उत्पादने निर्मिती, विक्री करण्याचे काम करीत आहेत. शिवाय विव्हिंग व निटिंग ही कामे स्वतंत्रपणे करणारे काही लोक याच व्यवसायातून जवळपास चार ते पाच कोटी रुपयांची उलाढाल दरवर्षी करत आहेत. तालुक्यात बाम्बे रेयॉन सारखा मोठा प्रकल्प सुरु झाला आहे. यातून या व्यवसायात जवळपास दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक वाढली आहे.
No comments:
Post a Comment