Thursday, June 21, 2012

मानवी संस्‍कृतीचे ऐतिहासिक अवशेष

भारतीय लोक एका महान संस्कृतीचे वाहक आहेत. आज असलेल्या संविधानाच्या उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायाची असलेली व्यवस्था ही पुरातन आहे. ही संस्कृती मातृसत्ताक होती. या महान संस्कृतीचे अवशेष आजही मोहोजोंदाडो, हडप्पा याठिकाणी दिसतात.

राजधानी दिल्लीत इंडिया गेटच्या जवळ राष्ट्रीय संग्रहालय आहे. हे पाहिल्यावर महान भारतीय इतिहासाचा ठेवा जीवंत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. दिल्लीतील माझे सर्वात आवडीचे ठिकाण म्हणजे राष्ट्रीय संग्रहालय येथे आल्यावर मन हरपून जाते, ते इतिहासाच्या पानात !

येथे वेगवेगळे भाग केले आहेत. तळ मजल्यावर अनेक कक्ष करण्यात आले असून यामधील एका कक्षात मोहोनजोदाडो, हडप्पा, मौर्य, शुंग, सातवाहन वंशाच्या कलांचे अवशेष आहेत. दुस-या कक्षात कुषाणकालीन अवशेष आहेत. ज्यामध्ये गांधार, मथुरा, कलांचे नमुने आहेत. गुप्त कालीन कला, गुप्त कालीन मृण्मूर्ती (दगडाला कोरून बनविलेली मुर्ती) तसेच प्रारंभिक मध्यकालीन कला, कांस्य प्रतिमा, बौध्द कला, भारतीय लघु चित्रकला, भारतीय लिपी व शिक्क्यांची प्रदर्शनी, सुसज्ज कला भाग एक व दोन हे तळमजल्यावर आहेत.

दुस-या मजल्यावर सुसज्ज कला व वस्त्र, पूर्व कोलंबियाई कला, पश्चिमी कला, ताम्रपत्र, काष्ठ उत्कीर्णन (बारीक कोरीव काम) भाग एक व दोन वाद्ययंत्र, जनजातीय जीवन शैली, अस्त्र शस्त्र व कवच आदी प्रदर्शन येथे आहेत.

१५ ऑगस्ट १९४९ ला राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय संग्रहालय स्थापित केले होते. नंतर संग्रहालयाकरिता नवीन इमारत निर्माण करण्यात आली. याठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने वास्तूंची मांडणी करण्यात आली. १८ डिसेंबर १९८० ला हे संग्रहालय जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

राष्ट्रीय संग्रहालयातील संग्रहात भारतीय आणि विदेशी अशी एकूण २,०६,००० च्या पेक्षा अधिक उत्कृष्ट कलाकृतीपूर्ण वस्तू आहेत. ज्यामध्ये भारतीय सांस्कृतिक परंपरेचा ५००० वर्षापूर्वीपासूनच्या अधिक काळाचा इतिहास समाविष्ट आहे. विविध सृजनात्मक पंरपरेंचे तसेच शैलींचे प्रतिनिधीत्व करणा-या वस्तूंमध्ये विविधतेत एकतेचे प्रतिक दिसते. या कलाकृतींमध्ये इतिहास जीवंत झाला आहे. आज देशी-विदेशी पर्यटकांचे हे आवडीचे पर्यटन स्थळ झाले आहे.

मग चला प्रवेशव्दारापासून राष्ट्रीय संग्रहालयाची सुरूवात करूया. प्रवेश व्दाराजवळ भगवान विष्णुला समर्पित शालच्या लाकडांचे अष्टपार्श्वीय रथ प्रदर्शनार्थ आहे. हे दक्षिण भारतातील तामिळनाडूच्या कुंभकोणम येथील आहे. १९ व्या शतकाच्या मध्य काळातील हे मंदिर असून मंदिराचा रथ सहा चाकांचा आहे. यामध्ये ४२५ उत्कीर्णित (बारीक नकाशी) फलक, ब्रैकेट, कोणांनी युक्त असा हा रथ आहे. याचे वजन जवळपास २,२०० कि.ग्रॅ. आहे. पाच तलातील या रथात बाहेरील भीतींवर सुक्ष्म उत्कीर्णित लघुफलकांनी सुसज्ज आहे. ज्यामध्ये भगवान विष्णुचे विविध रूपे आहेत. जसे लक्ष्मी-नारायण, राम, नृसिंह, कृष्ण अवतारांचे जीवन दृश्य अंकित आहे. याशिवाय काही प्रतिमा देखील प्रवेशव्दाच्याबाहेर सजवून ठेवलेली दिसतात.

सभ्यतेचे दर्शन

भारतीय पुरातत्व संर्वेक्षण आणि राष्ट्रीय संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोंजोदाडो-हडप्पा सभ्यतेचे दर्शन येथे घडते. या संस्कृतीचे जवळपास ३,८०० वस्तू येथे आहेत. त्‍यामध्येही पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे १,०२५ उत्खननात सापडलेल्या वस्तू आहेत. जेथे-जेथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष आहेत. त्या ठिकाणाहून सापडलेले शिल्प, मृदभांड, (मातीचे भांडे) मुद्रा, गुटिका, वजन व मापक, आभूषण, छोटी मृण्मूर्ती, खेळाचे भांडे, इत्यादी वस्तू येथे आहेत. याशिवाय हडप्पा स्थळातील कुल्हडिया(मातीचा ग्लास), छेनी, चाकू, हे ही दर्शनीय स्थळावर ठेवले आहेत. हे बघत असतांना हजारो वर्षापूवी आम्ही किती प्रगत होतो लक्षात येते.

पुरातत्व

तळमजल्यावर असणारे आणखी एक कक्ष हे पुरातत्वाशी संबंधित आहे. ते म्हणजे मुर्तीं ठेवण्यासाठी यामध्ये ८५० मूर्ती आहेत. मूर्ती या कक्षासह सर्व परिसरात लावल्या आहेत. यामध्ये प्रस्तर मुर्ती, कांस्य प्रतिमा, तसेच मृण्मूर्ती आहेत. या इ.पु. तीस-या शताब्दीपासून तर १९ व्या शताब्दीपर्यंतच्या आहेत. या सर्व मूर्ती भारतातील सर्व प्रमुख क्षेत्र, काला आणि शैलींचे प्रतिनिधीत्व करतात.

बौध्द कला

आणखी एक आकर्षणासह पुज्य वस्तु येथे आहे, ते म्हणजे भगवान बुध्द यांचे अस्थीकलश. त्याशिवाय उत्तर प्रदेशातील सिध्दार्थ नगर जिल्ह्यामध्ये उत्खननादरम्यान बरेच अवशेष आढळले. त्यापैकी ८४ मूर्ती येथे आहेत. यामध्ये प्रस्तर, कांस्य, मृण्मय, गच, काष्ठ या मुर्तीचां समावेश आहे. या मुर्ती हिनयान, महायान, आणि वज्रयान या पंथाचे प्रतिनिधीत्व करतात. यामध्ये कपर्दिन बुध्द (अहिच्छत्र), बुध्दपाद (नागार्जुनकोंडा, जनपद गुंटूर, आंधप्रदेश), बुध्दांचा जीवन-दृश्य (सारनाथ्, उत्तर प्रदेश) तसेच हिमालयकडील क्षेत्रातून प्राप्त आणखी काही वस्तू. येथे आहेत. या कलाकृती उपासना, समर्पण आणि मानवतेच्या प्रती प्रेम भावनेला जागृत करतात. हे बघत असतांना त्याकाळात बुध्द धम्म आपल्या सर्वोच्च शिखरावर असल्याचे जाणवते.

(क्रमश:)

  • अंजू निमसरकर कांबळे उपसंपादक, मपकें, नवी दिल्ली
  • No comments:

    Post a Comment