मेंढवण गाव हे पालघर तालुक्याचे शेवटचे टोक. गावचा उंबरा फक्त १८१ इतका. इथे १९७२ पासून ग्राममंडळ अस्तित्त्वात आहे. चार पाड्यांमध्ये विभागले गेलेल्या या गावात मूलभूत सुविधांचा तसा अभावच आहे. त्यातच उन्हाळ्यात पाणी मिळवणे, हे त्यांच्यासाठी अतिकष्टाचे काम. अगदी गेल्या वर्षीपर्यंत पाण्यासाठी भटकंतीच त्यांच्या नशीबात होती. पण, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे श्री. मनोज प्रजापत यांनी ही समस्या मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. गेल्या वर्षी योगायोगाने ते काही कामानिमित्त या गावात आले होते. तेव्हा येथील समस्यांनी त्यांना अंतर्मुख होण्यास भाग पाडले. त्यांनी गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून घेतली आणि ती समस्या सोडविण्यासाठी त्यांचे विचारचक्र सुरू झाले.
मेंढवण गावाच्या जवळील टेकडीवर एक झरा आहे. त्याच्या जवळपास आंब्याची झाडे असल्याने त्याला आंब्याचे पाणी असे म्हटले जाते. हे आंब्याचे पाणी गावापासून जवळपास ३५०० ते ४००० फूट उंच डोंगरात आहे. तेथे पुरेसा पाणीसाठा आहे. पण, योग्य नियोजनाअभावी उन्हाळ्यात आणि पाणीटंचाईच्या काळात पाणी उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण व्हायची. त्यामुळे मुबलक पाणी असूनही येथील ग्रामस्थ डोंगरावरून पाणी आणण्यापेक्षा जवळपास २-३ किलोमीटरवरून नदी, नाले किंवा खड्डा खणून, जिथून मिळेल तिथून पाणी आणत असत.
श्री मनोज प्रजापत यांना आंबा टेकडीवरील हे पाणी गावापर्यंत आणण्याची कल्पना सुचली. इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी झेलमा लाजरस यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. ग्रामदान मंडळाचे सरपंच श्री. बिस्तुर शिडवा कुवरा यांनीही ती कल्पना उचलून धरली. त्याला आर्थिक पाठबळ दिले ते एचडीएफसी फायनान्सने. यासंदर्भात अभियंता श्री. गोखले आणि त्यांच्या टीमने सर्वेक्षण केले. त्यानंतर ४ महिने परिश्रम घेऊन आंबा टेकडीवरील पाणी असलेल्या ठिकाणी सिमेंट, काँक्रिट आणि जाळीचे बंधारे टाकण्यात आले. तेथे झऱ्यातील पाणी अडविण्यासाठी टाकी बांधण्यात आली.
जवळपास साडेतीन हजार ते चार हजार फूट उंचीवरील या टाकीतील पाणी जलवाहिनीद्वारे वासुदेव पद्धतीने खाली आणण्यात आले आहे. तेथून २ दिशेने जलवाहिनीद्वारे पाण्याचा प्रवाह वळविण्यात आला आहे. एक गावासाठी आणि एक आश्रमशाळेसाठी. अशा पद्धतीने आता मेंढवणच्या ग्रामस्थांना २४ तास पाणी उपलब्ध झाले आहे आणि तेही विनामूल्य. इतकेच नव्हे तर जलपुनर्भरणासाठी टाकीजवळ भूमिगत बंधारे बांधण्यात आले. त्याचा चांगला परिणाम होऊन गावात असलेल्या जुन्या विहिरींची भूजल पातळी उन्हाळ्यात सुद्धा वाढली आहे.
मेंढवण गावाला आंब्याचे पाणी मिळाले आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि शासकीय आश्रमशाळा येथील जवळपास ३०० ते ४०० विद्यार्थ्यांना २४ तास पाणी उपलब्ध झाले आहे. गावाची तहान भागविण्याबरोबरच इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनने गाव हगणदारीमुक्त करण्याच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे. याचाच एक भाग म्हणून गावात नवीन पद्धतीची १० शौचालये बांधण्यात आली आहेत. शौचालय उपलब्ध झाल्याने गावाची वाटचाल व्हायला मदत होणार आहे. या सगळ्या खटाटोपीसाठी जवळपास ८ ते १० लाख रुपये खर्च आला. पण, त्याचे मूल्य मेंढवणवासियांसाठी अनमोलच राहणार आहे.
No comments:
Post a Comment