राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजार या आदर्श गावासारखे मन्याळी गावही आदर्श करण्याच्या उद्देशाने गावातील संतोष गावळे हा तरूण प्रेरित झाला होता. गावाचा नियोजनबद्ध विकास साधण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले होते. त्याच्याच प्रयत्नाने संपूर्ण गावकऱ्यांना विश्वासात घेऊन विकास साधण्याचे समाधानकारक चित्र उभे राहिले. उद्योगपती अंतिम डहाणूकर यांच्या सहकार्यातून पाच लाख रूपये किंमतीचे नेट शेड उभारण्यात आले. गावकऱ्यांच्या सहभागातून आंबा, चिंच, आवळा, बोर, सीताफळ, कडूनिंब, हातगा, निलगिरीसह विविध वृक्षांची रोपे तयार करण्यात आली. सध्या येथे २५ हजार रोपटी तयार झाली आहेत.
गावकऱ्यांनी श्रमदानातून पिशव्या भरणे, बी रोपण करणे, रोपांना पाणी घालणे आदी कामे केली. विशेष म्हणजे ही सर्व रोपे मन्याळी व परिसरातील शेतकऱ्यांना नि:शुल्क दिली जात आहेत. रोपांची काळजीपूर्वक जोपासना हीच एक अट आहे. केवळ १२०० लोकसंख्येच्या मन्याळी गावाने निसर्ग संवर्धनाची चळवळ उभारली आहे. गावाला भेट दिल्यास रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावल्याचे दिसून येते. प्रत्येक झाडाचे पालकत्व गावकऱ्यांकडे सोपविले असून यामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे, हे विशेष. पर्यावरण रक्षण आणि संवर्धनाच्या दृष्टीने मन्याळीने इतर गावांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
No comments:
Post a Comment