पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा कृषी प्रधान तालुका आहे. तालुक्यातील पाच धरणांमुळे येथील बहुतांशी जमीन बागायती बनली आहे. या बागायती क्षेत्रामध्ये खते, बी - बीयाणे, तयार झालेला शेतमाल बाहेर आणणे यासाठी शेतांमधील पाणंद रस्त्यांना अनन्य साधारण महत्व आहे.
पाणंद रस्त्यांचा अरुंदपणा, वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेता महाराष्ट्र सुवर्ण जयंती महोत्सव अंतर्गत जुन्नर तालुक्यात पाणंद रस्ते विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. १ मे २०११ रोजी ओतूर येथे रस्ते बांधणीचा कार्यक्रम सुरु झाला. पहिल्या टप्प्यात अवघ्या तीन महिन्यात १५० रस्त्यांचा टप्पा पूर्ण झाला. यासाठी येथील तहसिलदार दिगंबर रौंदळ, प्रांताधिकारी थोरवे व जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या कल्पकतेने शासकीय योजना ही एक ग्राम चळवळ बनल्याचे चित्र जुन्नर तालुक्यात दिसू लागले आहे. राज्य पातळीवर दखल घेण्याइतपत या चळवळीला महत्व प्राप्त झाले आहे. आज रोजी तालुक्यात सुमारे ३१७ पाणंद रस्ते तयार झाले आहेत.
पाणंद रस्ते विकासाअंतर्गत पहिला टप्पा पूर्ण झाला. मात्र या पहिल्या टप्प्यात महत्वाची अडचण आली, ती म्हणजे शेतकऱ्यांची मानसिकता बदलणे. वर्षानुवर्ष बागायती पिक घेत असलेला शेतकरी आपली सोन्यासारखी जमीन पाणंद रस्त्यासाठी देण्यास साहजीकच आडकाठी घालत होता आणि हीच पाणंद रस्ते विकासातील मोठी अडचण होती. त्या दृष्टीने तहसिलदार , प्रांताधिकारी, मंडल अधिकारी, तलाठी यांनी पाणंद रस्त्यांचे महत्व व फायदे शेतकऱ्यांना समाजावून देऊन त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणला.
दुसरी अडचण होती ती म्हणजे रस्त्यांसाठी लागणाऱ्या पोकलेन उपलब्धतेची. पहिल्या टप्पयात ७०० ते ८०० रुपये प्रती तासाने शेतकऱ्यांना पोकलेनसाठी खर्च करावा लागत होता. दुर्गम गावपातळीवर तालुक्याच्या ठिकाणावरुन पोकलेन नेणे अडचणीचे ठरत होते. दरम्यान टाटा मोटर्सच्या सामाजिक निधी विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी श्री. रौंदळ यांचा संपर्क झाला. तालुक्यातील रस्ते विकासासाठी टाटा मोटर्सकडून एखादा पोकलेन मिळविण्यासाठी प्रांताधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून कंपनीकडे प्रस्ताव देण्यात आला. त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या टप्प्यातील पूर्ण झालेल्या रस्त्यांची पाहणी करुन येथील शेतकऱ्यांची दळण-वळणाची तीव्र समस्या जाणुन घेतली व एक पोकलेन तालुक्यासाठी देण्यात आला आणि पोकलेन लोकार्पण सोहळाही पार पडला.
दुसऱ्या टप्प्यामध्ये जोमाने पाणंद रस्ते बांधणीची कामे हाती घेण्यात आली. यामध्ये चिंचोली - ११ रस्ते, निमगांव तर्फ म्हाळुंगे - १२ रस्ते, खोडद-९, मांजरवाडी-७, टिकेकरवाडी-६, तळावणे-१५, राजुरी- ७, उंचखडक-३, ओतूर-५ अशा पध्दतीने रस्त्यांची संख्या वाढतच गेली. रस्ते विकासाची ही चळवळ अधिक व्यापक बनत गेली. ग्रामपंचायतीचे अनेक प्रस्ताव येऊ लागले व अजुन एका पोकलेनची गरज निर्माण झाली. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यात आला व प्रयत्नांती दुसरा पोकलेन टाटा मोटर्सकडून देण्यात झाला. या पोकलेनला लागणारा डिझेलचा खर्च हा लोकसहभागातून भागविला जात आहे. पोकलेन देखभाल, ड्रायव्हर, सुपर वायझर व हेल्पर यांच्यावरील खर्च टाटा कंपनीकडून देण्यात येत आहे.
जुन्नर तालुक्यात आज लोकसहभागातून सुमारे ३१७ पाणंद रस्ते पूर्ण झाले आहेत. या रस्त्यांची एकूण लांबी ३३६ कि.मी. इतकी आहे. या रस्त्यांचा तालुक्यातील साडेसात हजार शेतकऱ्यांना व पाच हजार हेक्टर क्षेत्राला लाभ झाला आहे. लोकचळवळीतून व लोकसहभागातून येथे ९६ लक्ष रुपयांची कामे पूर्ण झालेली आहेत.
शेती अवजारे, बी-बीयाणे आता थेट शेतापर्यंत नेणे शक्य झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पिक पध्दतीतही बदल केले आहेत. येथील शेतकरी नगदी पिके घेऊ लागला आहे. येथील पडीक जमीन पाण्याखाली येऊ लागली आहे. रस्ते बांधणीचे काम पूर्वी एका पाळीत होत होते ते आता दोन पाळ्यात सुरु होऊन सलग सोळा तास काम सुरु झालेले आहे. अजुनही २७ गावांमध्ये पाणंद रस्ते बांधणीचे प्रस्ताव ग्रामपंचायतीकडून आले आहेत.
या रस्त्यांद्वारे विकासाची चळवळ निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना शेतमाल थेट बाजारपेठत नेण्यासाठी ट्रक, ट्रॅक्टर सारखी वाहने शेतापर्यंत नेणे सुलभ झाले आहे. खते बी-बीयाणे शेतापर्यंत पोहोचवणे आता अधिक सोपे बनले आहे. टोमॅटो, केळी, कांदे, ऊस याबरोबरच नाशवंत शेतमाल शेतकऱ्यांच्या बांधावरुन बाजारपेठेत नेणे शेतकऱ्यांना आता सोयीस्कर झाले आहे. पाणंद रस्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
No comments:
Post a Comment