बेलसनी या गावात महाराष्ट्र विकास मंडळाचे १० बचत गट आहेत. दहा गटांपैकी मंगला अनंता गोहणे या शारदा महिला बचत गटातील सदस्य. त्यांना दोन मुले. मध्यंतरीच्या काळात पतीचे निधन झाले. त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी मंगलावर आली. सुरूवातीला त्यांनी मोलमजुरी करून कुटुंबाची जबाबदारी पेलली. परंतु एवढ्यावर भागत नसल्याने त्या महिला बचत गटात सहभागी झाल्या. काही दिवसानंतर त्या गटाच्या अध्यक्षही झाल्या.
माविमच्या वतीने आयोजित प्रशिक्षणात मंगला यांनी शिवणक्लासचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी गटामधून चार हजार रुपये कर्ज घेऊन शिवणयंत्र घेतले. काही दिवस त्या फक्त ब्लाऊज आणि सलवार सूट शिवत होत्या. त्यांचा आत्मविश्वास जसजसा वाढत गेला तसतसा आणखी काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागला. आता पुन्हा त्यांनी गटातून पाच हजार रूपये कर्ज घेऊन पिको फॉल करण्याची मशीन विकत घेतली. त्यातून त्या पिको फॉलही करू लागल्या. या व्यवसायातून त्यांना चांगला आर्थिक लाभ होऊ लागला. कौटुंबिक गरजा भागवून मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करणे आता त्यांना शक्य होऊ लागले.
मविमच्या मार्गदर्शनामुळे आज मुलांना आपण चांगले शिक्षण देऊ शकतोय, असे त्या मोठ्या अभियानाने सांगतात. त्यांनी गटातून अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आता त्या व्हीएलसीच्या अध्यक्ष आहेत. व्हीएलसीमधून त्यांनी गावात ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रम राबविला. व्हीएलसीमधून दोन महिलांना ग्राम पंचायत निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठीही त्यांनी सहकार्य केले. त्या दोन्ही महिला माविमच्या गटामध्ये होत्या. त्या महिला आज ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांना काही अडचण आल्यास त्या मिटींग घेऊन त्यांना वेळोवेळी मदत करतात. एकेकाळी कौटुंबिक गरजा पूर्ण करण्यासाठी मजूरी करणाऱ्या मंगला गोहणे आज व्हीएलसी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे चालवू लागल्या आहेत. बचत गटामधून मिळालेल्या आत्मविश्वासाचाच हा परिणाम आहे, असे त्या आवर्जून सांगतात.
No comments:
Post a Comment