उस्मानाबाद जिल्हयात आतापर्यंत अशी दुदैवी घटना उघडकीस आलेली नाही ही आशादायक बाब आहे. मात्र, यापुढेही अशा घटना घडू नयेत यासाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या पुढाकारातून एक कल्पना जन्मास आली. ती म्हणजे, गेल्या वर्षभरातील जिल्हयाच्या विविध आरोग्य केंद्र, दवाखाने येथे दाखल झालेल्या गरोदर मातांची माहिती संकलित करण्याची! यामुळे या वर्षभराच्या काळात गरोदर मातांपैकी कुणी गर्भपात केला आहे का, याची माहिती मिळणार असून तो का केला, याचेही कारण उलगडणार आहे.
राज्यात दर हजारी मुलांमागे मुलींचे घटते प्रमाण ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. शासन आपल्या स्तरावरुन मुलींचे हे प्रमाण वाढावे यासाठी विविध उपायोजना करत आहे. उस्मानाबाद जिल्हयातही मुलींचे हे प्रमाण दरहजारी ८५० इतके घटले आहे. ही चिंताजनक बाब हेरुनच जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी यासंदर्भात ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्याचे ठरविले आणि त्यादृष्टीने कार्यवाहीस सुरुवात केली.
जिल्हयातील गरोदर मातांची माहिती घेण्याच्या या उपक्रमात परिचारिका, दाया अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्तींचा सहभाग असणार आहे. विशेषत: यापूर्वी मुलींना जन्म दिलेल्या आणि आता गरोदर असणाऱ्या महिलांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. पत्ता, मोबाईल क्रमांकाबरोबरच उपचार करत असणाऱ्या डॉक्टरांचे नाव आदीची माहिती यामध्ये असणार आहे. एक किंवा अधिक मुली असणाऱ्या गर्भवती मातांची नोंद ठेवून त्या महिलेची सर्व माहिती वारंवार भेटी देऊन संकलित केली जाणार असून ती आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडे पाठविली जाणार आहे.
यामुळे संबंधित गरोदर महिलेने उपचार कुठे घेतले, नियमितपणे तपासणी केली आहे का, वारंवार तपासणीस गैरहजर असेल तर तिच्या माहेरी-सासरी संपर्क साधून वास्तव जाणून घेणे, आदींची नोंद ठेवली जाणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हयात परिचारिका, दाया, अंगणवाडी सेविका आणि सरकारी डॉक्टरांचा एक मेळावाही घेण्यात आला. यात ही माहिती संकलन कसे करायचे, ही मोहीम कशी राबवायची या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.
या मोहिमे अंतर्गत गर्भवती महिला तसेच तिच्या कुटुंबियांकडूनही माहिती भरुन घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे, जिल्हयाबाहेरील गर्भवती महिला येथे उपचार घेत असतील आणि नंतर वारंवार त्या नियमित तपासणीसाठी गैरहजर राहिल्या असतील तर त्यांच्या सासरच्या पत्यावर संपर्क साधून तसेच त्या कार्यक्षेत्रातील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधला जाणार आहे. त्याठिकाणी ही महिला उपचारासाठी आली होती का, याचीही खतरजमा केली जाणार आहे. यामुळे त्या गर्भवती महिलांची सद्य:स्थिती समजणार असल्याने तिने गर्भपात केला किंवा कसे याची माहिती मिळणार आहे.
या उपक्रमात एकाच दिवशी यश मिळणार नसले तरी अवैध गर्भपातांना निश्चितच आळा बसणार आहे., त्याबरोबर गर्भलिंग निदानासारखे प्रकार करण्याऱ्या डॉक्टरांनाही वचक बसणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने उचललेले हे पाऊल म्हणजे जन्माला येणाऱ्या छकुलींसाठी स्वागताची पायघडीच म्हणायला हवी.
No comments:
Post a Comment