Wednesday, June 27, 2012

विश्वासाचे सामर्थ्य

मंत्रालयातील अग्निप्रलयानंतर मंत्रालयाच्या जनताजनार्दन प्रवेशद्वारावर सुरु करण्यात आलेल्या विविध विभागांच्या संपर्क कक्षात नागरिकांची वर्दळ सुरु होती. शासनाने नागरिकांना केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देण्यास जनतेने सुरूवात केली आहे. राज्याच्या विविध भागांमधून लोक येथे येत आहेत.

ठाणे जिल्हयातील एक 69 वर्षीय वयोवृध्द महिला पाय ओढत ओढत्‍ा शोधत होती सहकार विभागाचा संपर्क कक्ष. आपला अर्ज येथे नव्याने दिल्यानंतर आपल्याला लवकर न्याय मिळेल या आशेसह. बीड जिल्हयातील ऊसतोड कामगार संघटनेचा कार्यकर्ताही आपल्याला न्याय मिळावा म्हणून आपले निवेदन घेवून सर्वांना भेटत होता.

नंदुरबार जिल्हयातील एक आदिवासी कुटुंब. आपल्या जमिनीच्या कागदपत्रांच्या झेरॉक्ससह नव्याने अर्ज दाखल करावयास आलेला. जमिनीची गेली 10 वर्ष सुरु असलेली फाईल आता अंतिम टप्प्यात होती. शुक्रवारी अंतिम सुनावणी होती. लवकरच न्याय मिळेल अशी ग्वाही खुद मंत्री महोदयांनी दिलेली होती. पण या आगीत सगळं संपलं. आता काय? विचारानं घाबरलो होतो. समोर सगळा अंधार असतानाही शासनानं केलेल्‍या आवाहनाचं समजलं अन एक उमेद जाणवली. कुठलीही काळजी न करता थेट मंत्रालयात पोहोचलो. एकदा मंत्रालय सुरळीत सुरू झाले की आम्हाला ही न्याय मिळेल हा आशावाद श्री. गावित यांच्या बोलण्यात जाणवत होता. येथे येणारा प्रत्येकजण विवंचनेत होता. खरंच मंत्रालय पूर्ववत सुरू झाले आहे का? या अर्जाचे पुढे काय करणार? किती कालावधी लागेल असे नाना प्रश्न संबंधित संपर्क अधिका-यांना विचारले जात होते. हे अधिकारीही अतिशय शांतपणे या सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. त्यामुळे अर्ज जमा करेपर्यंत साशंक असणारा प्रत्येकजण ते दिल्यानंतर आपले काम होईल अशा खात्रीने परतत होता.

या आगीच्या तांडवांनंतरही शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना न्याय देण्यासाठी कटिबध्द आहे. ही जमेची बाजूच आमचा शासनावरील विश्वास दृढ करीत आहे, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया मंत्रालयात आलेल्या नागरिकांची आहे.

शासनाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. शासनाला नियमानुसार आवश्यक ती कागदपत्रे सादर करून सहकार्य केले तरच आपल्याला न्याय मिळू शकतो याची जाणीव सर्वसामान्यांना आहे. याची साक्षच या संपर्क कार्यालयांत जमा झालेल्या अर्ज, निवेदनांच्या माध्यमातून जाणवत होती. अवघ्या दीड दिवसात या कार्यालयांमध्ये चारहजारापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत

आपली कर्मभूमी जळत असल्याचे बघताना अतोनात दु:ख झाले. पण या संकटातून आपल्याला बाहेर निघायचे आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे. हे लक्षात घेवून कक्षाची ही पर्वा न करता आम्ही काम करणारच आहोत असे कक्ष अधिकारी कापडणीस यांनी सांगितले. या घटनेनंतर तीन दिवसांत पूर्ववत सुरु झालेले मंत्रालय हे शासन, जनता आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांप्रती दाखविलेल्या दृढ विश्वासाचेच यश आहे. कोणत्याही आपत्तीला न डगमगता राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेली शपथ लक्षात ठेवूनच सुरु झालेली ही वाटचाल आणि त्याला मिळणारा जनतेचा प्रतिसाद नक्कीच प्रेरणादायी आहे.


  • मनीषा पिंगळे
  • No comments:

    Post a Comment