सुपे येथील चारा डेपोस भेट द्यायला जात असताना माझ्या
मनात चारा डेपो म्हणजे चाऱ्याच्या थप्या लावलेल्या असलेले एक ठिकाण असे
चित्र होते. परंतु मला तिथे असे काही दिसले नाही. चारा डेपोच्या ठिकाणी
गेले असता मला तिथे चाऱ्याच्या गाड्या चारा वाटपासाठी जाण्याच्या तयारीत
असलेल्या दिसल्या. मी माझ्या बरोबर असलेल्या छायाचित्रकाराला लगेचच फोटो
काढण्यास सांगितले.
मला तिथे हनुमान सहकारी दूध उत्पादक संस्था
हातवळणचे सचिव श्री. सागर फडके चारा वाटपाचे व्यवस्थापन करताना दिसले.
मी त्यांना विचारले इथे चाऱ्याची साठवण नाही का? त्यावर ते म्हणाले, चारा
एका ठिकाणी ठेवल्यास नियोजन करता येत नाही. भांडणे होतात. सगळे लोक लगेच
चारा मागतात. इतक्या लोकांना एका वेळी चारा वाटप करणे शक्य नसते. चारा
शेतातूनच वजन करुन आणला जातो गावाच्या मागणीनुसार गाड्यांमध्ये भरला जातो
व मागणी असलेल्या गावांमध्ये चारा पोचल्यावर तहसिलदार यांच्या आदेशानुसार
तात्काळ चारा वाटप करतो. यामुळे चारा वाटपाचे नियोजन व्यवस्थित होते.
सध्या
१५ दिवसाला पुरेल इतका चारा आम्ही पशु पालकाला देत आहोत. परंतू कडक ऊन
असल्यामुळे चारा वाळला जातो. त्यामुळे सात दिवस पुरेल एवढा चारा
देण्याबाबत विचार विनीमय सुरुआहे.
मी त्यांच्याशी या विषयावर बोलत
असताना तिथे वढाणे गावच्या तलाठी श्रीमती बी. जे. शिंदे व बाबुर्डीचे
ग्रामसेवक भेटले. ते दोघे आपआपल्या गावच्या चारा वाटपाची चौकशी
करण्यासाठी आले होते. त्यांना श्री. फडके यांनी त्यांच्या प्रश्नांना
समाधानकारक उत्तरे दिली.
संस्थेला ३० मे पर्यंत चारा वाटप
करण्याचा आदेश आला आहे चारा वाटपाचे काम उरकत आले असल्याचे त्यांनी
सांगितले. यापुढे चारा टंचाई जाणवनार नाही असे त्यांनी सांगितले.
बारामती
तालुक्यामध्ये अवर्षणस्थितीमुळे निर्माण झालेल्या चारा टंचाईच्या
अनुषंगाने तहसिलदार यांच्या आदेशानुसार तांदूळवाडी, सुपा, लोणी भापकर,
सुपा, मोरगाव, तांदुळवाडी व मुर्टी येथील चारा डेपोतून शासन निर्णयानुसार
शेतकऱ्यांकडून बी. पी. एल. शिधापत्रिकाधारकांकडून १० टक्के प्रमाणे व
सर्वसाधारण शिधापत्रिकाधारकांना १५ दिवसाच्या चाऱ्याची रक्कम घेऊन ती
कोषागारात चलनाने भरण्यात आली आहे.
तहसिल कार्यालयाच्या
आदेशानुसार हनुमान सहकारी दूध उत्पादक संस्था हातवळण, (ता. दौंड जि. पुणे)
यांच्याकडून गावांच्या मागणीनुसार चारा वाटप करण्यात येतो. यावेळी समन्वय
अधिकारी म्हणून तलाठी व ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत व तहसिलदार यांच्या
आदेशानुसार गावाच्या मागणीनुसार चारावाटप करण्यात येतो. हनुमान सहकारी
दूध उत्पादक संस्था बारामती तालुक्यातील १२ गावांना चारा वाटप करते असे
सांगितले.
टंचाई परिस्थितीत पिकाच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या
चाऱ्यांचा प्रश्न देखील महत्वाचा असतो. ठिकठिकाणी चारा वाटपाचे नियोजन बघून
आनंद झाला.
No comments:
Post a Comment