Thursday, June 21, 2012

मानवी संस्‍कृतीचे ऐतिहासिक अवशेष

भारतीय लोक एका महान संस्कृतीचे वाहक आहेत. आज असलेल्या संविधानाच्या उद्देशिकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्यायची असलेली व्यवस्था ही पुरातन आहे. ही संस्कृती मातृसत्ताक होती. या महान संस्कृतीचे अवशेष आजही मोहोजोंदाडो, हडप्पा याठिकाणी दिसतात.

राजधानी दिल्लीत इंडिया गेटच्या जवळ राष्ट्रीय संग्रहालय आहे. हे पाहिल्यावर महान भारतीय इतिहासाचा ठेवा जीवंत असल्याचा सार्थ अभिमान वाटतो. दिल्लीतील माझे सर्वात आवडीचे ठिकाण म्हणजे राष्ट्रीय संग्रहालय येथे आल्यावर मन हरपून जाते, ते इतिहासाच्या पानात !

१५ ऑगस्ट १९४९ ला राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये राष्ट्रीय संग्रहालय स्थापित केले होते. नंतर संग्रहालयाकरिता नवीन इमारतीचे निर्माण करण्यात आली. याठिकाणी वैज्ञानिक पद्धतीने वास्तुंची मांडणी करण्यात आली. १८ डिसेंबर १९८० ला हे संग्रहालय जनतेला पाहण्यासाठी खुले करण्यात आले.

भारतीय लघुचित्र

लघु चित्राकरिता आरक्षित कक्ष बघतांना आजची जी विकसित झालेली चित्रकला, ज्याने भारताला एम.एफ.हुसेन सारखे महान चित्रकार दिले त्याचा इतिहासाशी कसा संबंध आहे हे लक्षात येते. या कक्षात ई.स. १००० पासून तर १९०० व्या शतकापर्यंतच्या उत्कृष्ठ लघुचित्रांचे प्रदर्शन येथे दिसते. त्यामध्ये मुगल, दख्खन, मध्य भारतीय, राजस्थानी, पहाड़ी तसेच उपशैलींचे चित्र आहेत.

हे चित्र ताडपत्र, कापड, काष्ठ व चामडयावर चित्रित आहेत. या चित्रांमध्ये मुख्यत: जैन कल्पसूत्र, रामायण, महाभारत, महाकाव्य, भागवतपुराण, दुर्गासप्तशी, जयदेव रचित गीत-गोविंद, रागमाला, बारामासा, पंचतंत्र आणि विष्णूपूराण तसेच शाहनामा आणि बाबरनामा असे इस्लामिक पांडुलिपी देखील पाहायला मिळतात. या विशाल ठेव्यात मध्यकालीन राजांचे शासकांचे आणि संताची रूपचित्रही आहेत. येथे ३५२ चित्र प्रदर्शित करण्यात आली आहेत.

भारतीय लिपी आणि शिक्क्यांचा विकास

या भागात २६ मोठ्या-मोठ्या सुप्रकाशित काचेच्या पारदर्शक प्रदर्शनीत लिपी तसेच शिक्क्यांचा इतिहास दर्शविण्यात आला आहे. यामध्ये सुरूवातीच्या काळात कशा प्रकारची नाणी होती, काळाच्या ओघात त्यात होत गेलेला बदल, कश्या पद्धतीचा आहे, हे लक्षात येते. तसेच लिपीची तालिका बघते वेळी ‘ल’, ‘क’ ‘म’ या व इतर शब्दाचा झालेला जन्म आपल्या लक्षात येतो.

सुसज्ज कला दर्शनी

याकरिता दोन कक्ष आरक्षित ठेवण्यात आले आहेत. त्यामधील एका कक्षाचे सध्या नुतनीकरण सुरू असल्यामुळे ते बघता येत नाही. दुस-या कक्षात ३०४ दर्शनी सुसज्ज कला, जे मुगल काळापश्चातची १७ वी शताब्दीपासूनची भौतिक संस्कृती उद्कृत करते. विविध अंलकारणात्मकरितीने सुसज्जित हस्तनिर्मित कलाकृतींचे काष्ठ, कांच, सिरामिक, यशब, हस्तीदंत तसेच विविध धातुंनी ही बनलेली आहेत. बारकाईने उत्कीर्णित काष्ठनिर्मित रंगवेलेला मोर, पक्षीच्या आकाराचा चांदीचा हुक्का, चांदीचा इत्रदान, बिदरीचा काँडल स्टँड, संगमरमरने सजवलेली तश्तरी, रंगविलेल्या काचेचा कटोरा, हस्तदंतावर अंकित बुद्धांचे जीवन-दृश्य, हस्तदंत निर्मित मंदिर, यशबचे भांडे, सिरामिकच्या वस्तू, टाईल्स, हस्तीदंतांने आणि बहुमुल्य रत्नांनी निर्मित बुध्दीबळ त्यातील मोहरे, हे प्रदर्शित केली आहेत.

पांडुलिपी (नवीनीकरणाधीन)

राष्ट्रीय संग्रहालयात विविध भाषेतील आणि लिपीतील अनेक पांडुलिपी येथे उपलब्ध आहे. या पांडुलिपी चर्मपत्र, भूर्जपत्र, ताड़पत्र, कापड, कागद, धातू इत्यादीची आहेत. सुंदर चित्रे, आणि रोशनाईमुळे या पांडुलिपीचे सौदर्य आणखी उठून दिसते. दिनांकित पांडुलिपीमुळे भारतीय इतिहासाचे प्रमाणिक साक्ष मिळते.

सर्व प्रकारचे रहस्यात्मक ज्ञानांने परिपूर्ण भारतीय मूळची असलेली ही पांडुलिपी जेथे विविध आकारांचे पट्टचित्र, ताडपत्रांवर विभिन्न शैलींचे लेखन, रंगीन कागदांची पृष्ठभूमीवर स्वर्णीम अक्षरांनी आणि भूर्जपत्रांच्या नैसर्गिक प्रकाशामुळे पाहणा-या दर्शकांना आकृष्ट करते. तसेच शाही राज नाण्यांनी मोहरांनी(स्टॅम्प) युक्त दिनांकित अरबी पांडुलीपी इस्लामी जगत आणि इतिहासकरांच्या आठवणी जाग्या करते. प्रदर्शित पवित्र कुराण, शाही फरमान आणि अन्य सचित्र पांडुलिपी दर्शनीय आहे.

ही सर्व पांडुलिपी भारतीय उपमहाव्दीपातील विभिन्न धर्मांचे आणि संप्रदायांचे प्रतिनिधीत्व करतांना दिसते. यामध्ये ७ वी ते १९ वी शताब्दीपर्यंतची एकूण १५०० पांडुलिपि प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. ज्याचे कार्य सध्या नवीनीकरणाधीन आहे.

(क्रमशः)


  • अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक,
    महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली
  • No comments:

    Post a Comment