Wednesday, June 6, 2012

वन्यनप्राण्यांसाठी राबतात गुरुजींचे हात

उन्हाच्या अती तीव्रतेने जंगलातील वृक्ष-वेली कोमेजली आहेत. माणसांना व पाळीव प्राण्यांना पाणी चारा उपलब्ध केला जात आहे. पण वन्यप्राणी, पक्षी चारा पाण्यासाठी भटकत आहेत. त्यांच्या जीवघेण्या या लढाईत अहमदनगर जिल्ह्यातील वन्यतप्रेमी शिक्षक तुकाराम कातोरे यांनी स्वखर्चातून पाणी व चारा उपलब्ध करुन त्यांना मायेचा आधार दिला आहे.

अहमदनगर पासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर डोंगरकुशीत वसलेले कामरगाव नगर व पारनेर तालुक्याचच्या सरहद्दीवर आहे. या गावातील वन्यप्रेमी व शिक्षक तुकाराम कातोरे गुरूजी वन्यप्राणी पक्षांसाठी चारा व पाणी उपलब्धी करून देण्याचा उपक्रम गेल्या दोन वर्षापासून राबवित आहेत. त्यांची डोंगराच्या कुशीत स्व:मालकीची शेतजमीन व विहीर आहे. सततच्या कमी पावसामुळे विहिरीच्या पाण्याची पातळीही खोल गेल्याने उन्हाळ्यात विहिरीला पाणी नसते. त्या‍मुळे वन्यप्राणी, पक्षांचे वेड असणाऱ्या गुरूजींना या जंगलात राहणाऱ्या हरीण, ससे, तरस, लांडगे, खोकड आदी प्राण्यांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न भेडसावत होता.

वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यांनी सिमेंटचा पाईप कापून त्याचे दोन पाणवठे तयार केले. जवळच पाणी साठविण्यासाठी सिमेंटची मोठी टाकी ठेवली आहे. टँकरमधून त्यात पाणी सोडले जाते. निर्जन भाग असल्याने जंगलातील प्राण्यांचा येथे मुक्त संचार आहे. पाणी व चाऱ्यासाठी सुर्योदयापूर्वी व सुर्यास्ताच्या वेळी हे सर्व वन्यप्राणी या ठिकाणी येऊन आपली तहान व भूक भागवितात. त्या बरोबर पाळीव प्राणीही या ठिकाणाच्या सुविधेचा लाभ घेतात.

मागील वर्षी कातोरे गुरुजी यांनी स्वातःच्या मालकीच्या विहिरीतून २५ हजार रुपये खर्च करुन एक हजार फूट जलवाहिनी टाकून वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे विहिरीचा उद्भव संपलेला आहे. असे असले तरी यावर्षी त्याच ठिकाणी कातोरे गुरुजी यांनी स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी आणून पाणवठा सुरूच ठेवला आहे. त्या बरोबर हिरवा चाराही त्या ठिकाणी ठेवला आहे. हे काम ते स्वेतः करीत आहेत.

सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. या काळात शिक्षक इतरत्र सहलीला जाऊन आनंद लुटत असतात. परंतु कातोरे गुरूजी वन्यप्राण्यांची तहान भूक भागविण्या्चे कार्य करीत आहेत. बुऱ्हाणनगर येथे केंद्र प्रमुख म्हणून ते काम करीत आहे. ते केंद्र प्रमुख संघटनेचे अध्यक्षही आहेत. अशा अनेकविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना वन्यन प्राण्यांच्या सेवेचे व्रत घेऊन जीवनाचा आगळावेगळा आनंद ते लुटत आहेत.

  • दिलीप गवळी, माहिती अधिकारी, अहमदनगर
  • No comments:

    Post a Comment