अल्पसंख्याकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या
योजनांच्या माध्यमातून अनेकांनी व्यवसाय थाटले आहेत. यात महिलांचा देखील
समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजातील काही महिला शिलाई
मशिनचे प्रशिक्षण घेऊन स्वावलंबी झाल्या आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेअंतर्गत अल्पसंख्याक समाजातील दारिद्र्य
रेषेखालील महिलांसाठी २०१०-११ आणि २०११-१२ या वर्षांत शिलाई मशिन
प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला महिलांचा चांगला
प्रतिसाद मिळाला. २०१०-११ या मध्ये ३६ तर २०११-१२ मध्ये ३२ महिलांनी
प्रशिक्षण घेतले.
जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील
हमदर्द विकास मंडळ या सेवाभावी संस्थेवर प्रशिक्षण देण्याची जबाबदारी
सोपविण्यात आली होती. या संस्थेचे अध्यक्ष नजीर अहमद पुसेगावकर यांनी
लाभार्थी महिलांच्या निवडीसाठी बैठक घेऊन मान्यतेसाठी गटविकास अधिकारी,
हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ यांना कळविले. त्यानंतर संबंधितांनी सर्व
बाबींची पडताळणी करुन हिंगोली पंचायत समितीने नर्सी (नामदेव), सेनगाव
पंचायत समितीने पुसेगाव व औंढा पंचायत समितीने औंढा व जवळा बाजार गावातील
लाभार्थी महिलांची निवड केली. पुसेगाव, जवळा बाजार, नर्सी नामदेव, औंढा
नागनाथ येथे प्रशिक्षणाची सोय करण्यात आली होती.
तीन महिन्यांच्या
प्रशिक्षणासाठी संस्थेने शिलाई मशिनची व्यवस्था केली होती. प्रशिक्षण काळात
महिलांना तज्ज्ञ व्यक्तींकडून शिवणकलेचे संपूर्ण ज्ञान देण्यात आले. विशेष
म्हणजे ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बशीर पटेल तसेच
श्री.मोडके, श्री.घाडगेपाटील यांनी प्रशिक्षणस्थळाला भेट देऊन प्रशिक्षणाची
वेळोवेळी माहिती घेतली तसेच मार्गदर्शन केले.
प्रशिक्षण काळात
लाभार्थी महिलांना ३०० रूपये मानधन तसेच प्रशिक्षण संपल्यानंतर लाभार्थी
महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रशिक्षण घेतलेल्या महिलांपैकी पन्नास
टक्के महिला स्वावलंबी झाल्या आहेत. त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला
आहे, यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र
ग्रामीण बँक, पुसेगाव या शाखेकडून दहा महिलांना २५ हजार रूपये प्रमाणे
रेडीमेड गारमेंट व शिवणयंत्रासाठी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यामध्ये
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून ७,५०० रूपये प्रमाणे प्रति लाभार्थी
अनुदान मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे पुसेगाव येथील अल्पसंख्याक
समाजातील महिलांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या या
उपक्रमामुळे अल्पसंख्याक समाजातील महिला अर्थिकदृष्ट्या सबल होण्यास
निश्चितच मदत होत आहे.
No comments:
Post a Comment