शंकरपूर हे गाव देसाईगंज तालुक्यातील असून गाढवी नदीच्या पलीकडे वसलेली आहे. सन १८२७ साली रयतवारी गाव म्हणून वसाहत झाली. सन १९६० साली शंकरपूर ग्रामपंचायतीची स्थापना झाली. आजतागायत गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही. भविष्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी वाढीव नळ पाणी पुरवठा योजना प्रस्थापित केले अशी माहिती ग्रामपंचायतीचे सचिव व्ही. टी. गडपायले यांनी भेटी दरम्यान दिली.
गडचिरोली जिल्हा हा नक्षलग्रस्त असून नक्षलवाद्याच्या कारवाया कमी करण्यासाठी विविध उपक्रमातून प्रयत्न केले जात आहेत. नक्षलवाद्यांना गावात येऊ देवू नये यासाठी नक्षलगाव बंदी योजना या गावात राबविण्यात येत आहे. नक्षलबंदी योजने अंतर्गत मौजा डोंगरमेंढा येथे विहिरीवर बोर मारुन दुहेरी पंपावर आधारित योजना घेण्यात आली आहे. शंकरपूर ग्रामपंचायतीतील १२३ बीपीएल धारक कुटुंब असून सर्वांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
डोंगरमेंढा येथे एक महादेवाचे मंदिर असून मोठया संख्येने भाविक दर्शनाला जातात. तेथे पिण्याच्या पाण्यासाठी वाटसरुंना व जनावरांना प्रशासनाच्या वतीने हातपंप बांधले असून शेल्दा लांबे या रिठी स्थळी देखील हातपंप बसविण्यात आले आहे.
या गावात पाण्याची मुबलकता असून वैयक्तिक शौचालय ३१० असून व सार्वजनिक शौचालये १५ आहेत. या गावाने शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेतला आहे. येथे स्वजलधारा योजना यशस्वी झाली आहे. यशवंत ग्रामसमृध्दी योजना राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, पर्यावरण संतुलीत ग्राम समृध्दी योजना, मागासक्षेत्र अनुदान निधी, आणि दलित वस्ती सुधार योजना राबविण्यात येत आहे.
शंकरपूर ग्रामपंयायतीत समाविष्ट गावे शेती व दुग्ध व्यवसायावर अवलंबून आहेत. येथील मुख्य पीक धान ( तांदुळ ) असून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. सिंचनाची सोय व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तलावाचे खोलीकरण, बोडीचे नुतनीकरण, कोल्हापुरी बंधारा, सिंचन विहीरी इत्यादी घेऊन मजुरांना रोजगार उपलब्ध करुन सिंचनाची सोय केली आहे. मजुरांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जलसंधारणाची कामे केली जातात.
No comments:
Post a Comment