जागेची योग्य निवड : शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपलब्ध असलेल्या खोलगट भागात योग्य आकारमानाचे व आकाराचे शेततळे करावे. जागा निवडताना शेतातील सर्व पाणी त्या निवडलेल्या जागेजवळ एकत्रित येईल, याप्रमाणे वळवावे. शक्यतोवर खोलगट, शेताच्या खालच्या बाजुची जमीन निवडावी. पाण्याच्या प्रवाहाच्या मार्गावरील जागा निवडू नये. कारण अशी जागा निवडल्यास तळे गाळाने लवकर भरते. त्यामुळे शेततळे प्रवाहाच्या बाजुला थोड्या अंतरावर खोदावे.
शेततळ्याचे प्रकार : शेततळी ही दोन प्रकारची असतात. एक म्हणजे खोदून खड्डा तयार करणे व त्याचा तलाव करणे. तर दुसरे म्हणजे नाल्यात आडवा बांध घालून पाणी अडवून तयार केलेला तलाव. शेतातील चांगली जमीन वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
इनलेट व आऊटलेट : प्रवेशद्वाराच्या अगोदर साधारणत: दोन मीटर अंतरावर २ x २ x १ मीटर आकाराच्या सिल्ट ट्रॅपचे (गाळ काढणारा पिंजरा) खोदकाम करावे. तसेच शेततळ्याच्या दोन्ही द्वारांजवळ दोन मीटर लांबीपर्यंत दगडाची पिंचिंग करावी. शेततळ्याला काटेरी तार किंवा लाकडाचे कुंपन करावे.
शेततळ्यातील पाण्याचा कार्यक्षम वापर : शेततळ्यात साठवलेल्या पाण्याचा पुनर्वापर सुलभरित्या करण्यासाठी पंपसेट पाईपलाईन व तुषार किंवा ठिबक सिंचनाचा वापर करावा. जेणे करून कमीत कमी पाण्याचा उपयोग जास्तीत जास्त क्षेत्रावर कार्यक्षमरित्या करता येईल. पाणी देताना ते केव्हा, कसे व किती प्रमाणात द्यावे याही गोष्टीचा विचार करावा. त्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली येईल. त्यामुळे निश्चित उत्पादन मिळून शेतकरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहील.
शेततळ्याची निगा राखणे : शेततळे हे काळ्या खोल जमिनीवर तयार केले असेल तर अशा जमिनीत पाणी जास्त झिरपते म्हणून शेततळे बनविण्यापूर्वी मृद व जलसंधारणाचे उपाय करावेत. जेणे करून पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याबरोबर गाळ वाहून येणार नाही. तसेच शेततळ्यात गाळ येऊ नये म्हणून पाण्याचा प्रवाह ज्या ठिकाणी शेततळ्यात प्रवेश करतो, त्या अगोदर २ x २ x १ मीटर आकाराचे खोदकाम करावे आणि पाणी ज्या बाजूने निर्गमित होते, त्याठिकाणी गवत लावावे त्यामुळे गाळ खड्डयामध्ये साचेल.
शेततळ्यासाठी अस्तर : शेततळ्यातील पाण्याचा पाझर कमी करण्यासाठी शेततळ्यास अस्तरीकरण करावे. अस्तरासाठी बेन्टोनाईट, माती सिमेंट मिश्रण, दगड विटा चिकन माती किंवा प्लास्टिक फिल्मचा वापर करावा. प्लास्टिक वापरताना त्याची जाडी ३०० ते ५०० जीएसएम असावी. तसेच सिमेंट व मातीचे प्रमाण १:८ व जाडी ५ से.मी. ठेवावी
No comments:
Post a Comment