राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत भूजलावर आधारित स्त्रोत शाश्वत व सुरक्षित ठेवण्यासाठी स्त्रोत बळकटीकरणाचा अभिनव उपक्रम अमरावती जिल्ह्यात राबविण्यात आला. यासाठी दोन कोटी ९० लाख रुपये खर्च झाले आहेत. जिल्ह्यातील ५० गावांत ९० उपाययोजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात आली यामध्ये १३ सिमेंट बंधारे, ०८ नाला खोलीकरण, ११ रिचार्ज शॉप, १६ जलभंजन कार्यक्रम, ०७ गॅब्रियन बंधारे, तलावातील गाळ काढणे, अपारंपरिक उपाय योजनांसह पाऊस पाणी संकलन करणे, गावात स्टोअरेज टँक, दुहेरी पंप योजना आदी उपक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत बळकटीकरणामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील सातेफळ, सुपलवाडा, वरुड तालुक्यातील मोरचुद, शेंदुरजना, तारुबांधा (चिखलदरा), काजणा, भंगुरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे पावसामुळे भूजल पुनर्भरण यशस्वी झाले आहे. परिणामी भूजलात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे.
धारणी तालुक्यातील चोपवण, खामदा, बुलुमुगव्हाण, धोकडा, कोपमार, किन्ही खेडा या अतिदुर्गम आदिवासी गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी विद्युत पुरवठा नसल्यामुळे केवळ इतर स्त्रोतावर अवलंबून रहावे लागत होते. उन्हाळ्यात या गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई असल्यामुळे विंधन विहीर खोदून या विंधन विहीरीवर सोलरच्या सहाय्याने दुहेरी पंपावर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना तसेच हातपंप बसवून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नियमित करण्यात आला. त्यामुळे या गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.
दुहेरी पंपावर आधारित लघु नळ पाणी पुरवठा योजना लहान गावांना वरदान ठरत आहे. विंधन विहिरीवर हातपंप तसेच विजेवर आधारित १ हॉर्सपॉवरचा पंप बसवून सिंगल फेजवर ही योजना कार्यान्वित होत असल्यामुळे जिल्ह्यात २८ गावांना या योजनांचा लाभ मिळाला आहे. गावाची लोकसंख्या कमी असल्यामुळे ३० ते ४० घरांसाठी ही योजना उपयुक्त असून ग्रामपंचायतींना विद्युत आकारापोटी दरमहा सरासरी २०० रुपये भरावे लागतात. ज्या गावांमध्ये तसेच वनक्षेत्रात असलेल्या आदिवासी गावांमध्ये विद्युत पुरवठा नाही अशा १५ गावांसाठी सोलरवर आधारित ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
अमरावती तालुक्यातील पारडी, शेखापूर, अचलपूर तालुक्यातील शिवणी, कोहळा, चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरोडा, नांदगाव खंडेश्वर येथे विजेवरील दुहेरी पंप बसवून ही योजना यशस्वी करण्यात आली आहे. यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला आहे.
भूजल स्त्रोताचे बळकटीकरण करण्यासाठी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतर्फे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत यावर्षी नव्याने ८५ गावात १८८ उपाययोजना प्रस्तावित केल्या आहेत. यामध्ये १२ सिमेंट बंधारे, ६२ रिचार्ज शॉप, २२ ठिकाणी नालाखोलीकरण, ३३ सोलर दुहेरी पंप, १६ जलभंजन, ३१ गॅब्रियन बंधारे, ०३ तलावांचे गाळ काढणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोत बळकटीकरणासाठी ५ कोटी ४५ लाख रुपये खर्च येणार असून १९ गावांमध्ये ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी सुरू असून या उपक्रमाचा लाभ प्रत्येक गावात घेण्यासाठी लोकसहभागही महत्वाचा असल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक अरविंद वडस्कर यांनी दिली. भूगर्भातील जलस्त्रोत वाढविण्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक अजय कर्वे, वरिष्ठ भूवैज्ञानिक अरविंद वडस्कर, सहायक भूवैज्ञानिक महेंद्र कुटाते, महेश देशमुख व कनिष्ठ अभियंता अनिल लव्हाळे यांचा चमू जिल्ह्याच्या भूजलाचा अभ्यास करुन पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विशेष उपक्रमांची अंमलबजावणी करत असल्यामुळे अमरावती जिल्हा हा टँकरमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
No comments:
Post a Comment