या कार्यक्रमानंतर सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ - ताकारी प्रकल्प महाराष्ट्रात सर्वदूर ओळखला जावू लागला. जत तालुक्याच्या वेशीवर आज पाणी आल्यामुळे अनेक वर्षाचे स्वप्न साकार झाले आहे. या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील अनेक गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. अशा या लोकोपयोगी प्रकल्पाबद्दलची माहिती देत आहोत खास महान्यूजच्या वाचकांसाठी ...
म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ तालुक्याचा पश्चिम आणि दक्षिण भाग आणि तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील टंचाईग्रस्त भागाचा कायापालट होत असल्याचे चित्र या परिसरात दिसू लागले आहे. म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यामुळे यंदा १६ हजार एकर क्षेत्रास लाभ झाला आहे. त्यातून ६५० कोटी रुपयांचे उत्पादन निघाले आहे. द्राक्ष व इतर पिकांमुळे दुष्काळी दैन्य हटल्याचे चित्र दिसत आहे.
कायम टंचाईग्रस्त असलेल्या कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भाग आणि तासगाव पूर्व भागासाठी म्हैसाळ पाणी योजना जीवनदायी ठरली आहे. यंदाच्या भीषण टंचाई परिस्थितीत माणसांना जगणे मुश्किल झालेले असताना 'म्हैसाळ' चा लाभ क्षेत्रातील पाणी पोहचलेली गावे नदीकाठचे जीवन जगत असल्याचे चित्र दिसत आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणाऱ्या गावांमध्ये शेती हिरवी दिसत आहे. पावसाळ्यापेक्षा जास्त क्षेत्र उन्हाळ्याच्या आणि टंचाईच्या काळात हिरवे झाले आहे.
द्राक्षबागा जगल्या... उत्पन्न वाढले
या टंचाईग्रस्त पट्ट्यात द्राक्षबागांचे क्षेत्र मोठे आहे.तीन तालुक्यात म्हैसाळ योजनेचा लाभ झाल्यामुळे १६ हजार १५७ एकरातील द्राक्षबागा जगल्या आहेत. यामुळे सुमारे २ लाख ४२ हजार २५५ टन द्राक्षांचे उत्पादन निघाले आहे. दरवर्षी द्राक्षबागा जगविण्यासाठी कोट्यावधी रुपये टँकरवर खर्च होतात. यंदा हे पैसे वाचले आहेत. द्राक्षबागेतून ६०५ कोटी रुपयांचे उत्पादन निघाले आहे. टॅंकरचा खर्च वाचल्यामुळे निव्वळ उत्पन्नात वाढ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दुष्काळ पडला की, द्राक्षबागा काढून टाकल्या जातात. म्हैसाळ योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये बागा काढल्याचे यंदा ऐकीवात नाही. यंदा बागा वाचल्या आहेतच. शिवाय पुढील वर्षीच्या खरड छाटणीसाठी या पाण्याचा उपयोग अत्यंत चांगल्या प्रकारे होणार आहे.
द्राक्षाबरोबर हळद, डाळिंब, ऊस आणि भाजीपाला पिकासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे. सुमारे १० हजार एकर क्षेत्रावरील या पिकांसाठी म्हैसाळच्या पाण्याचा लाभ झाला आहे. त्यातून सुमारे ४० कोटी रुपयांचे उत्पादन मिळाले आहे.
चारा मिळाला... जनावरे जगली
टंचाई परिस्थितीत या तीनही तालुक्यात पशूधन जगविणे सर्वात मोठा प्रश्न झाला होता. दुष्काळी काळात जनावरे जगविण्यासाठी आवश्यक असलेला चारा म्हैसाळच्या पाण्यातून उपलब्ध झाला आहे. तीनही तालुक्यात सुमारे ६ हजार एकर क्षेत्रावर चारा लावण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दारातील पशुधन वाचले आहे.
मका, शाळू पिकाचा कडबा, कडवळ, हत्तीग्रास आदी चारा पिकांची लागवण करण्यात आली आहे. त्यामुळे तीन तालुक्यातील सुमारे ७५ हजार मोठी आणि सुमारे एक लाख छोट्या जनावरांच्या चाऱ्याची सोय झाली आहे. त्यामुळे चारा डेपोवरील ताण कमी झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
म्हैसाळ योजनेमुळे तलाव, बंधाऱ्यामध्ये पाणी सोडण्यात आले. त्याचबरोबर तालुक्यातून वाहणाऱ्या अग्रणी नदीमध्ये पाणी वाहत असल्याचे चित्र बहुतांशी ठिकाणी दिसते. त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पाण्याचा तसेच नाले, ओढ्यातून पाणी असल्यामुळे त्या त्या भागातील शेतीस फायदा झाला आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांनी कालव्यावर मोठ्या प्रमाणात विद्युत पंप, जनरेटर बसवून आणि सायफाव्दारे पाणी उचलून शेतीस नेले आहे. शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सामुहिक पध्दतीने पंप बसवून पाच किलोमीटरपर्यंत पाणी नेले आहे.
म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेमुळे या तीनही तालुक्यातील जवळपास ५० पाझर तलाव, २५ लघु पाटबंधारे तलाव, व १५ मध्यम प्रकल्पामध्ये पाणी सोडून सर्व तलाव भरुन घेण्यात आले. त्याशिवाय या तालुक्यातून वाहणाऱ्या अग्रणी नदीतही पाणी सोडल्यामुळे या नदीवरील १२ बंधारेही पाण्याने तुडुंब भरल्याचे चित्र दिसत आहेत.
ताकारी - म्हैसाळ प्रकल्पाबाबतची अधिक सविस्तर माहिती वाचा पुढील भागात ...
(क्रमशः)
No comments:
Post a Comment