ग्रामीण भागातील शेतकरी असलेले अशोक घुले यांच्याकडे वडिलोपार्जित ३.२० हेक्टर शेती असून संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. दरवर्षीच पुरेसा पाऊस होत नाही. त्यामुळे शेती उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. गेल्या काही वर्षातील अपुऱ्या पावसामुळे सतत नापिकी होत असून मिळत असलेल्या कमी उत्पन्नात घर खर्च चालविणे कठीण जात होते. त्यातून दिलासा मिळावा म्हणून ते शेतीसोबतच टेलरिंगचा व्यवसाय करून कुटुंब चालवित होते.
शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांची माहिती घेण्यासाठी ते एकदा उमरखेड येथील पंचायत समिती कार्यालयात गेले असता त्यांची गाठ तेथील कृषी अधिकाऱ्यांशी पडली. त्यावेळी घुले यांना विशेष घटक योजनेअंतर्गत दिल्या जात असलेल्या विहीर व मोटरपंपसंबंधी माहिती मिळाली. कृषी अधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी २००५-०६ मध्ये सिंचनासाठी विहीर, इलेक्ट्रीक मोटर पंपासाठी अर्ज केला. तो मंजूरही झाला. शेतात सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने जीद्द आणि चिकाटीने घुले यांनी शेती करण्यास सुरूवात केली. आता आपण पावसाच्या पाण्यावर अवलंबून न राहता कापूस, सोयाबीन तसेच रब्बी हंगामात गहू, हरभरा, उन्हाळी भुईमुग असे निरनिराळ्या प्रकारचे पीक घेत असल्याचे ते सांगतात.
घुले यांना पूर्वी कोरडवाहू शेतीतून वार्षिक ३० ते ३५ हजार रुपयांचे उत्पन्न होत होते. परंतू आता ओलिताची व्यवस्था झाल्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न वर्षाला तीन लाखांपर्यंत गेले आहे. ओलिताच्या किफायतशीर वापरासाठी त्यांनी शासकीय अनुदानावर तुषार सिंचन योजना सुद्धा घेतली आहे. यामुळे आता कमी पाण्यात जास्त क्षेत्राला पाणी देणे शक्य होत आहे. या शेती करण्याच्या पद्धतीमुळे आजुबाजूचे शेतकरी शेतावर येऊन माझे मार्गदर्शन घेत असल्याचे ते अभिमानाने सांगतात.
शासनाच्या विशेष घटक योजनेमुळे मला व माझ्या कुटुंबाला चांगलाच आर्थिक हातभार लागला. माझी आर्थिक परिस्थिती चांगली सुधारल्याने मुलांना जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवू शकलो, असे ते आनंदाने आणि अभिमानाने सांगू लागले आहेत.
No comments:
Post a Comment